computer

'हमारा बजाज' परत येतेय. कधी, कुठे, कोणत्या रुपात? वाचा मग इथेच!!

बाईकची क्रेझ येण्यापूर्वीच्या काळात स्कूटरने लोकांना वेड लावलेलं. ही स्कूटर पण एकच होती. अहो ती जाहिरात नाही बघितली का “हमारा बजाज, हमारा बजाज”... हो तीच स्कूटर ‘बजाज चेतक’.

१९७२ साली बजाज कंपनीची चेतक नावाची स्कूटर रस्त्यावर धावू लागली. तिला चांगली प्रसिद्धीही मिळाली. पुढची ३३ वर्ष या स्कूटरने लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं, पण नवीन काळानुसार ट्रेंड बदलला आणि बजाज स्कूटर मागे पडली. २००५ साली या स्कूटरची निर्मिती थांबवण्यात आली.

आज हा इतिहास सांगण्याचं कारण म्हणजे बजाज चेतक परत येत आहे. बातमीनुसार आज म्हणजे १६ ऑक्टोबर रोजी बजाज चेतक नव्या रुपात लॉंच होणार आहे. हे नवीन रूप नवीन तंत्रज्ञान घेऊन येणार आहे. नवीन बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटर असेल.

नव्या स्कूटरचं नाव आहे ‘चेतक चिक इलेक्ट्रिक’. या स्कूटरची किंमत १ लाखापर्यंत असेल. बजाज कंपनीची ही पहिली इलेक्ट्रिक स्कूटर असणार आहे. ज्या कार्यक्रमात चेतक चिक इलेक्ट्रिकचं अनावरण होणार आहे त्या कार्यक्रमाला “हमारा बजाज” असं नाव देण्यात आलंय.

बजाज कंपनी सध्या त्यांची इलेक्ट्रिक उत्पादनं Urbanite या ब्रँडखाली एकत्र आणत आहे. बजाज चेतक सुद्धा या ब्रँडचा भाग असेल. 

तर मंडळी, बजाज चेतक सोबत तुमच्या कोणकोणत्या आठवणी आहेत? आमच्याशी नक्की शेअर करा !!

सबस्क्राईब करा

* indicates required