computer

चोरीचे फक्त वीस डॉलर्स जवळ ठेवून बाकी कचराकुंडीत फेकणारा चोर!! असं का करायचा तो?

२६ मे २००० ची सकाळ. शिकागोमधल्या हायलँड पार्कमधल्या एका बँकेत बेसबॉल कॅप आणि गॉगल लावलेला एक तरुण मुलगा कॅशियरच्या आसपास घुटमळत होता. काही वेळाने कॅशियरने त्याला काय हवं म्हणून विचारलं. त्याने काहीतरी शोधल्यासारखे आपल्या पँटचे खिसे चाचपडले, आणि काही क्षणांत एक कार्ड काढून तिच्यासमोर धरलं. त्यावर लिहिलं होतं, "बँकेवर दरोडा पडलाय. तुमच्या जवळचे सगळे पैसे पिशवीत टाका.'' ती महिला घाबरली. तिने घाईघाईने आपल्याजवळ असलेली कॅश त्याच्याजवळच्या प्लास्टिकच्या पिशवीत रिकामी करायला सुरुवात केली. तो तरुण शांतपणे बाजूला उभा होता. तिने पैसे जमा केल्यानंतर तिला थँक्यू म्हणत तो दाराकडे वळला. दोन मिनिटांत तो एका अंडरग्राउंड पार्किंग लॉटमधून बाहेर पडला. त्यावेळी त्याच्या एका खांद्यावर एक सायकल होती आणि दुसऱ्या खांद्यावर एक मेसेंजर बॅग. थोड्या वेळाने तो एका कचराकुंडीपाशी पोहोचला. नंतर त्याने वीस डॉलरच्या दोन कोऱ्या करकरीत नोटा काढून घेतल्या आणि बाकी सगळ्या कचराकुंडीत रिकाम्या केल्या. रिकामी मेसेंजर बॅग खांद्याला लावून तो निघाला. वरवर पाहता हे विचित्रच वाटत होतं. कोण होता तो? त्याचं नाव होतं टॉम जस्टीस, आणि ही याच विचित्र माणसाची गोष्ट आहे.

लहानपणी टॉम जस्टीसचा सायकल रेसिंगशी परिचय झाला. यात त्याला खूप रस निर्माण झाला. त्याला यामध्ये उत्तम गती होती. कदाचित यामुळेही त्याला या क्षेत्रात रस वाटत असेल. सायकलिंगमध्ये त्याने अल्पावधीत खूपच मजल मारली. स्थानिक स्तरावरच्या अनेक स्पर्धा जिंकल्या. बर्‍यापैकी नाव झालं. त्यानंतर कोलोरॅडो येथे होणाऱ्या ऑलिंपिक ट्रेनिंग कॅम्पसाठी त्याची निवड झाली. इथपर्यंत सगळं ठीक होतं. पण शाळा संपली आणि चित्र बदललं.

ट्रेनिंग कॅम्पला न जाता तो घरफोड्या करू लागला. मुख्यतः रिकामी घरं हे त्याचं लक्ष्य होतं. तिथे जाऊन तो आणि त्याचे मित्र सिगारेट ओढत नाहीतर बियर पीत बसायचे. मात्र टॉमच्या मनात खोलवर कुठेतरी मोठं होण्याच्या आशाअपेक्षा होत्या. सायकलिंगला सध्या रामराम ठोकला असला, तरी सायकलिंगशिवाय इतर कशाचीच त्याला फारशी आवड नव्हती. त्यामुळे मनात ऑलिम्पिक घोळवत त्याने लॉस एंजेलिस गाठलं. तेथे युएस ऑलिंपिक टीम साठी तो ट्रेनिंग देऊ लागला. मात्र थोड्याच दिवसात त्याची तिथून हकालपट्टी झाली.

परत एकदा शिकागो. परत नवीन नोकरी. यावेळची नोकरी जरा वेगळ्या प्रकारची होती. आता तो चक्क सोशल वर्कर म्हणून काम करत होता. लोकांना मदत करताना त्याला स्वतःचे प्रॉब्लेम्स कमी वाटायला लागले होते. पण ही अवस्था फार काळ टिकली नाही. परत एकदा पोकळी निर्माण झाली. मधल्या काळात ऑलिंपिकसाठी प्रयत्न करणं थोडं बाजूलाच पडलं होतं. मग त्याने सायकलिंगव्यतिरिक्त आपल्याला आवडणाऱ्या, थ्रिलिंग वाटणाऱ्या गोष्टींची यादी करायला सुरुवात केली. त्याच यादीत बँक रॉबरी हे लेबल जोडलं गेलं.

येस्स! यात जबरदस्त थ्रिल होतं!!!

मग त्याने एका विगच्या दुकानात जाऊन काळ्या केसांच्या वेण्या असलेला एक विग खरेदी केला आणि एका नव्या भूमिकेला सुरुवात झाली. आणि त्याचबरोबर सुरू झाला बँक लुटण्याचा सिलसिला!

त्याची काम करण्याची पद्धतही विशिष्ट होती. रिकामी मेसेंजर बॅग म्हणजे आपल्या बसकंडक्टरसारखी बॅग घेऊन निघायचं. सायकल घ्यायची. जी बँक लुटायची आहे तिच्यापासून काही अंतरावर ती पार्क करायची. मग जमेल तसं लपतछपत बँकेत शिरायचं. त्यावेळी आपला विग आणि गॉगल दोन्ही वापरायचं. बँकेत शिरल्यावर तो पूर्णवेळ हाताची घडी घालून वावरायचा, जेणेकरून त्याच्या बोटांचे ठसे कुठेही येणार नाहीत. तिथे गेल्यानंतर कॅशियरकडे जायचं. त्याला किंवा तिला ही चोरी आहे हे सांगणारं कार्ड दाखवायचं आणि आपल्या जवळच्या बॅगेत पैसे रिकामे करायला सांगायचं. पैसे मिळाले की तिथून निघायचं. हे सगळं काम करत असताना त्याच्या मनात संमिश्र भावनांची गर्दी व्हायची. त्यात आनंद, थ्रिल, हुरहुर, उत्सुकता, काहीशी काळजी, आणि खोलवर कुठेतरी दडवलेले दुःख यांचं एक विचित्र मिश्रण असायचं.

पहिल्या चोरीनंतर तर पैशांच्या ढिगाकडे बघून तो चक्क रडला. खूप दिवसांनी त्याने खूप महत्त्वाचं, सनसनाटी असं काहीतरी केलं होतं. काही महिने ते पैसे त्याच्या वडिलांच्या घरातच एका जिम बॅगमध्ये पडून होते. काही महिन्यांनी, त्या नोटांच्या आधारे पोलिसांना त्याचा माग काढता येईल या भीतीने त्याने या प्रसंगाची आठवण म्हणून स्वतःसाठी केवळ वीस डॉलर ठेवले, आणि बाकीचे पैसे काही कचराकुंड्यांमध्ये फेकून दिले. मग तो असंच करत राहिला. बँका लुटायच्या आणि नोटा कुठेतरी उधळून द्यायच्या. बहुतेकदा ज्या ठिकाणी बेघर, अनाथ लोक राहायचे अशा गल्ल्यांमध्ये तो या नोटा नेऊन टाकत असे. हे करतानाही त्याला एक वेगळंच समाधान मिळत होतं. पण परत एकदा ही अवस्था सरली. आयुष्य पुन्हा कंटाळवाणं वाटायला लागलं. ऑलिंपिकचं स्वप्न नव्याने भुरळ घालायला लागलं.

तो कॅलिफोर्नियाला आला ते आता परत बँका लुटायच्या नाहीत असं ठरवूनच. मग त्याने शिस्तीत रोज सकाळी उठून स्नायू ट्रेनिंगचे व्यायाम करायला सुरुवात केली. शरीर आकारात आलं. पण कुठेतरी माशी शिंकली. ट्रेनिंगचा एकसुरीपणा त्याला कंटाळवाणा व्हायला लागला.

एक दिवस सकाळी त्याची कंबर प्रचंड दुखायला लागली. कुठेतरी काहीतरी चुकलं होतं. त्यातून पूर्ण बरा होण्यासाठी काही आठवडे लागणार होते. ऑलिंपिक ट्रायल्समध्ये भाग घेणं रद्द झालं. हे स्वप्न मागे पडल्यावर परत लूटमार करण्याची इच्छा उफाळून आली. परत एकदा बँक लुटायला सुरुवात झाली. त्या काळात त्याच्या डोक्यावर कुठलं भूत बसलं होतं देव जाणे, पण एकामागून एक काही आठवडे त्याची लूट सुरू होती. २००१च्या उन्हाळ्यात टॉमने स्टीलमॅन सायकल खरेदी केली. आताशा त्याने लूटमार करून मिळालेली रोकड फेकून देणं बंद केलं होतं. ते पैसे आता तो स्वतःसाठी वापरत होता. त्याला ड्रग्जचं व्यसन लागलं होतं. त्यामुळे खर्चही वाढला होता.

२००२ च्या मार्च महिन्यात पोलिसांना वॉलनट क्रीक येथील युनियन बँक लुटल्याचा मेसेज आला. थॉम्प्सन नावाच्या पोलिसाला गाडी पार्क करत असताना मागून एक सायकलिस्ट वेगाने येताना दिसला. त्याची ऑरेंज कलर असलेली सायकल आणि त्याच्या खांद्यावरची मेसेंजर बॅग हे जरा वेगळं वाटल्याने त्याने त्याला हटकलं पण तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेला. हा तोच होता - टॉम जस्टीस.

थोडं पुढे गेल्यावर पोलीस आपल्या मागावर आहेत हे त्याला समजलं. त्यामुळे खाडीपाशी जाऊन त्याने आपली सायकल खाडीत फेकून दिली आणि स्वतः एका बोगद्यात लपून बसला. अंधार पडला तसा पोलिसांनी शोध थांबवला. टॉम हळूहळू बाहेर निघाला.

पण पोलीस गप्प बसले नाहीत. त्यांना त्याची सायकल मिळाली होती. ती सर्वसाधारण नव्हती. सायकलची फ्रेम कस्टमाइज्ड होती. शिकागोमधल्या एका दुकानात ती बसवली गेली आहे हे पोलिसांना समजलं. त्यावरून पोलिसांनी त्या सायकलच्या निर्मात्याचा शोध लावला. त्याचं नाव होतं स्टीलमॅन, ज्यामुळे सायकलच्या ब्रॅन्डचं नावही तेच होतं. त्याच्या कंपनीला फोन करून पोलिसांनी सायकलचा सिरीयल नंबर मिळवला आणि त्यावरून शोध घ्यायला सुरुवात केली. काही दिवसांनंतर शिकागोमधल्या एका बायसिकल शॉपच्या मॅनेजरने पोलिसांना फोन केला. त्याने सांगितलं, की १९९६ मध्ये त्याने अशी ऑरेंज कलरची बाईक असेंबल केली होती, आणि तो त्याचा मूळ मालक आणि ज्याने ती सेकंड हॅन्ड बाईक विकत घेतली होती तो मनुष्य अशा दोघांनाही ओळखत होता. त्यावरून पोलिसांनी त्याचा शोध घेतला आणि त्याला शिकागो येथून त्याच्या आई-वडिलांच्या घरातून ताब्यात घेतलं.

हातात बेड्या पडल्या तेव्हा टॉमला रडावंसं वाटत होतं. भीतीपोटी किंवा निराशेपोटी नाही, तर एका वेगळ्याच अनपेक्षित जाणिवेने. ती म्हणजे सुटका! खरोखर आतापर्यंतच्या दुष्कर्मामधून ही बेडीच त्याची सुटका करणार होती. न्यायालयाने त्याला दोषी ठरवत अकरा वर्षं तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. शिक्षा भोगून बाहेर आल्यावर टॉमने एका डोनट शॉपमध्ये नोकरी मिळवली. एका प्रवादानुसार त्याने तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर शिक्षण पूर्ण केलं. तो आता मानसशास्त्राचा पदवीधारक आहे.

लहानपणी सायकल हेच सर्वस्व असलेला, ऑलिम्पिकला गवसणी घालण्याची स्वप्नं पाहणारा, लूटमार करण्यात थ्रिल शोधणारा, लुटून आलेला पैसा फेकून देणारा आणि अखेर पकडला गेल्यावर सहज कबुली देऊन टाकणारा टॉम हाच एक मानसशास्त्रीय कोडं वाटू शकेल. कदाचित आपण असं का केलं हे त्याच्यासाठीही एक कोडं असेल. त्यासाठीच त्याने मानसशास्त्राचा अभ्यास केला असण्याचीही शक्यता आहे. तुम्हाला काय वाटतं?

स्मिता जोगळेकर

सबस्क्राईब करा

* indicates required