computer

१० वादग्रस्त जाहिराती!! यातल्या काही जाहिराती कंपन्यांना मागे आपण घ्यायला लागल्या??

बोलणाऱ्याच्या एरंड्या खपतात पण न बोलणाऱ्याचे गहू खपत नाहीत अशी मराठीत एक म्हण आहे. जाहिरातींचं युग कधी सुरु झालं असेल हे नक्की सांगता यायचं नाही, पण आरोळी देऊन भाजी-फळे विकणाऱ्या माणसापासून ते टीव्ही-युट्यूब-इंटरनेटवर काही सेकंदांसाठी लाखोकरोडो खर्चून आपली जाहिरात पोचवणाऱ्या उद्योगपतींपर्यंत जाहिरात कुणाला चुकली नाहीय.

जाहिरात माणसाच्या मनाला हात घालते आणि आपल्याला उत्पादनं घ्यायला उद्युक्त करते. बरेचदा या जाहिराती यशस्वी होतात, पण काहीवेळेस त्या इतक्या असंवेदनशील असतात की त्या बनवल्या गेल्या, कुणी मंजूर केल्या आणि आपल्यासमोर का आल्या असाच एक प्रश्न पडतो. कधीकधी या वाईट जाहिरातींमुळे इतकी माती खाल्ली जाते की त्या परत घेण्यासारखी नामुष्कीची वेळही निर्मात्यांवर येते. हे भारतात घडतं आणि हो, जगभरही घडतं.

म्हणूनच आज आम्ही घेऊन आलो आहोत अशाच काही वादग्रस्त जाहिराती. खरंतर तशा जाहिरातींची यादी बरीच लांबलचक आहे, आपण फक्त त्यांची चुणूक पाहू.

1) कल्याण ज्वेलर्स

हे असले उद्योग करण्यात कल्याण ज्वेलर्स पुढे आहे. त्यांनी एकदा नाही तर दोनदा वाईट जाहिरातींच्याबाबतीत माती खाल्ली आहे.

ऐश्वर्या रॉयसोबत केलेल्या त्यांच्या एका जाहिरातीत ऐश्वर्याबाई श्रीमंत बाईसाहेबांच्या अविर्भावात कोचावर बसल्या होत्या आणि त्यांच्या डोक्यावर छत्र घेऊन एक लहान काळा मुलगा दिसत होता. गुलामगिरी, बालकामगार, वर्णभेद, वंशभेद... काय काय नव्हतं या जाहिरातीत?? पब्लिकने या जाहिरातीवर आक्षेप घेतल्यावर मात्र कल्याण ज्वेलर्सने ही जाहिरात मागे घेतली.

२. कल्याण ज्वेलर्स

कल्याण ज्वेलर्सची ही जाहिरात तुम्ही नक्कीच पाह्यली असेल. कधी नव्हे ते अमिताभची मुलगी श्वेता बच्चन-नंदानेही या जाहिरातीत काम केलं होतं. बँकेचे कर्मचारी या बापलेकीला खोटेपणा करायला सांगतात पण हे दोघे तो करत नाहीत कारण कल्याण ज्वेलर्स कधी खोटेपणा करत नाहीत असा तिचा आशय होता.
बँकवाले या जाहिरातीवर जाम चिडले. ती जाहिरात एकतर ओढूनताणून कल्याण ज्वेलर्सपर्यंत नेली होती आणि वर हे प्रकरण!! त्यांना ही जाहिरातही मागे घ्यावी लागली.

2) केंट आरओ कंपनी- कणिक मळण्याची मशीन

दोन दिवसांपूर्वी केंट या आरओ कंपनीची एक जाहिरात आली आहे. त्यांचं म्हणणं आहे, "तुम्ही तुमच्या घरी कामाला आलेल्या बाईला पीठ मळू देताय? तिचे हात कदाचित इंफेक्टेड असू शकतात". यानंतर सुरू झालेल्या वादंगानंतर सदर कंपनीने माफी मागितली आहे. विषमतेला खतपाणी घातल्याचा आरोप सोशल मीडियावर या जाहिरातीवर होत होता.

बाई नसताना तुमचा कणिक मळण्याचा त्रास ही मशीन वाचवेल अशी साधी सोपी जाहिरात करण्याऐवजी केंट आरओने हा घोळ का घालावा हे कळत नाही. त्यात जाहिरातीची मॉडेल होत्या अतिशय उद्धट म्हणून प्रसिद्ध असलेल्या हेमामालिनीबाई.

दोन दिवस चांगलाच धुमाकूळ घातला या जाहिरातीने.

3) एअरटेल

बायको ऑफिसात तुमची बॉस असली म्हणून काय झाले? नवऱ्याच्या आधी घरी पोचून, चारी ठाव स्वयंपाक करून नवऱ्याला एअरटेलच्या व्हिडिओ कॉलवर मांडलेले जेवण दाखवून आता घरी ये सांगते अशी त्यांची ॲड होती.

अर्थातच त्यावर सोशल मीडियावर बरीच टीका टिप्पणी झाली. पण कंपनीने त्या जाहिरातीत काहीच वावगे नसल्याचे म्हटले होते.

4) फोर्ड मोटर्स इंडिया

फोर्ड कंपनीची एक जाहिरात आली होती. त्यात फोर्ड कंपनीच्या कारच्या मागच्या डिकीमध्ये तीन बायकांना बांधून ठेवले आहे आणि इटलीचे माजी पंतप्रधान गाडी चालवत आहेत असे दिसत होते. गाडीची डिकी किती मोठी आहे हे दाखवण्याच्या प्रयत्नात त्यांनी स्रियांवर होणाऱ्या लैंगिक मारहाण, बलात्कार आणि अशाच मानहानीकारक प्रकारांचे उदात्तीकरण केले होते.

फोर्ड मोटर्सविरुद्ध संताप उसळल्यावर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली होती.

5) निविया

निवियाने एका प्रोडक्टच्या जाहिरातीसाठी तयार केलेल्या बॅनरमध्ये white is purity म्हणजेच गोरेपणा हाच शुद्ध आहे असे म्हटले होते. त्यावर वर्णभेदी म्हणून आरोप झाल्यावर कंपनीने माफी मागून प्रकरणावर पडदा टाकला होता.

अर्थात त्यांची ही अशी एकमेव जाहिरात नव्हती, पण ही एक नमुना म्हणून पाह्यला हरकत नाही.

6) स्निकर्स

स्निकर्सच्या एका जाहिरातीत एक माणूस दुसऱ्या एका टाईट पॅन्टस घातलेल्या माणसावर स्निकर्स चॉकलेट फेकून म्हणतो,"तू माणूस जातीवर कलंक आहेस, जरा पुरुषासारखा वागायला शिक!!"

या जाहिरातीने गे आणि एकंदरीतच LGBTQ समुदायाच्या भावना दुखावल्या. यानंतर कंपनीने स्पष्टीकरण देताना म्हटले की आमचा हेतू चुकीचा नसून लोकांना हसवून आमच्या प्रोडक्टची जाहिरात करण्याचा होता. कंपनीला कदाचित लोकांनी 'मर्द' बनण्यापेक्षा 'माणूस' बनणं किती आवश्यक आहे हे कळलं नसेल.

7) अमूल माचो

२००७ साली अमूल माचोच्या एका जाहिरातीने धुमाकूळ घातला होता. त्या ॲडमध्ये एक बाई पुरुषाची अंडरवेयर धुताना म्हणते की "ये तो बडा टॉईंग है"!! यावर इतका गदारोळ झाला की भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने जाहिरातीवर अश्लील असल्याचा ठपका ठेवला होता.

8) रिबॉक

२०१२ साली रिबॉकचे जाहिरात पोस्टर आले होते, ज्यात म्हटले होते 'cheat on your girlfriend not on your workout' म्हणजेच तुमच्या गर्लफ्रेंडसोबत चिटिंग करा पण व्यायामासोबत नको. यावर साहजिक वाद झाला आणि कंपनीला ऍड मागे घ्यावी लागली होती.

9) ह्युंदाई

काही वर्षांपूर्वी ह्युंदाई कंपनीची पाईप जॉब नावाची एक जाहिरात आली होती. ज्यात असे दाखवले होते की एक माणूस त्याच्या कारमधून निघणारा कार्बन मोनाक्साईड श्वसनाद्वारे आत घेऊन आत्महत्येचा प्रयत्न करतो. पण गाडीचे इमिशन क्लीन असल्याने तो यशस्वी होत नाही. पुढे जाऊन कंपनीने माफी मागून जी जाहिरात मागे घेतली होती. लोकांना आत्महत्या कशी करावी याच्या आयडिया देणारी जाहिरात करावी असं ज्यांना सुचतं ते महान आणि ती जाहिरात बाजारात आणणारे त्यांच्याहून महान!!

10) डव

डव कंपनीची आधी आणि नंतर या प्रकारची जाहिरात प्रसिद्ध आहे. २०१७ साली अशीच एक जाहिरात त्यांनी आणली. त्या ॲडमध्ये एक आफ्रिकन महिला आधी सावळी होती नंतर दुसऱ्या फोटोत तिला गोरी झालेली दाखवण्यात आले. डवच्या म्हणण्यानुसार त्यांना तसा संदेश द्यायचा नव्हता, पण व्हायचा तो वाद झालाच. यांच्याही निवियासारख्या गोरेपणाचं उदात्तीकरण करणाऱ्या बऱ्याच जाहिराती आहेत.

११. रिन

रिनची ही जाहिरात दोन महिन्यांपासून टीव्हीवर दाखवली जात आहे. सुरुवातीच्या दिवसांमध्ये या जाहिरातीत एक वाक्य होतं ते आता ऐकू येत नाही. ते वाक्य असं, 'मला या गावात इंग्रजी बोलणारे मॅनेजर कुठे मिळतील?' हे वाक्य ऐकून लोक चिडले होते. इंग्रजी भाषेला दिलेलं महत्त्व आणि शैक्षणिक पात्रतेपेक्षा इंग्रजी येते का या जुन्या विचाराला दिलेल्या महत्त्वामुळे लोकांनी जोरदार टिका केली होती. लोकांचा राग बघून जाहिरातीतलं ते वाक्य काढून टाकण्यात आलं.

मग, कशा वाटल्या या वादग्रस्त जाहिराती? तुम्हांलाही या खटकल्या का? तुम्हांला इतर कोणत्या जाहिराती खटकल्या आणि त्या का खटकल्या हे ही आमच्यासोबत नक्की शेअर करा.

 

लेखक : उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required