शिष्टाचाराचे हे काही सोपे नियम... तुम्हाला बनवतील समाजासाठी आदर्श!!

मानव हा समाजप्रिय प्राणी आहे आणि या समाजात आपलं विशिष्ट असं स्थान निर्माण करण्यासाठी तो सतत धडपडत असतो. लोकांप्रती आपली प्रतिमा नेहमी चांगली आणि सकारात्मक दिसावी अशी प्रत्येकाचीच अपेक्षा असते, आणि त्यासाठी आपण प्रयत्नही करत असतो. मंडळी, आज आपण शिष्टाचाराचे ही साधे-सोपे नियम बघणार आहोत. जे आजच्या समाजात तुम्ही नेहमी फॉलो करायला हवेत. यामुळे तुमची इमेज तर चांगली राहीलच, सोबत एक प्रकारचं मानसिक समाधानही मिळेल. चला मग... पाहूया कोणते नियम आहेत हे...
1. उधार घेतलेले पैसे न चुकता वेळेत परत करण्याचा प्रयत्न करा. त्यांच्यावर तुमच्याकडे पैसे परत मागण्याची वेळ येउ देऊ नका. मग ती रक्कम कितीही छोटी असो. रक्कम जास्त असेल तरी किमान थोडी-थोडी परत करून उधारी चुकती करा.
2. बर्याचदा असं होतं की तुम्ही एखाद्या महत्वाच्या कामात व्यग्र असता आणि कोणाचातरी कॉल येऊन जातो. या मिस्ड कॉल्सकडे दुर्लक्ष करू नका. शक्य तितक्या लवकर त्या व्यक्तीला स्वतःहून कॉल करा. हे शक्य नसल्यास एखादा मेसेज जरूर टाका.
3. मित्राच्या, नातलगाच्या, किंवा अगदी शेजाऱ्याच्या घरातून आपण फक्त वाचण्यापुरतं एखादं पुस्तक आणतो. ते पुस्तक कितीही आवडलं तरी ते वेळेत परत करा. ते जपून हाताळा. परत द्यायला उशीर झाला तरी माफी मागण्यास कचरू नका. हाच नियम रोजच्या वृत्तपत्राबाबतीतही पाळा. लायब्ररीतून घेतलेली पुस्तकेही वेळेत परत जमा करा.
4. घरच्या काहीतरी कामांसाठी मित्राची मदत आपण नेहमीच घेत असतो. अशावेळी फक्त थँक्स न बोलता त्याचा मोबदला म्हणून त्याला पोटभर जेवायला घाला. नाहीच जमलं तर चहा - कोल्ड्रिंक्स तरी जरूर द्या.
5. एखाद्याने तुम्हाला चहा, नाष्टा अॉफर केला तर नाही म्हणू नका. पण पुढच्या वेळी तुम्ही स्वतःहून त्याला ते अॉफर करा.
6. स्मोकिंग करत असाल तर आपल्यामुळे आसपासच्या लोकांना धुराचा त्रास होणार नाही याची काळजी घ्या. नको तिथे कचरा फेकू नका. आणि हो, स्वच्छतेच्या कामात कमीपणा मानू नका.
7. गर्दीच्या ठिकाणी किंवा एखाद्या कार्यक्रमात मोबाईलवर मोठ्याने बोलणे, गाणी वाजवणे टाळा. त्याचबरोबर एखादी व्यक्ती आपल्यासमोर प्रत्यक्ष बोलत असताना मोबाईल बाजूला ठेवा. त्यांचं बोलणं मनःपूर्वक ऐका.
8. काही कामासाठी मित्राची किंवा ओळखीच्या व्यक्तीची गाडी आपण वापरतो. गाडीचा वापर झाल्यानंतर ती तशीच परत करण्यापेक्षा त्यामध्ये इंधन भरून परत करा.
9. एखाद्या व्यक्तीने तुमच्यासाठी स्वयंपाक बनवल्यास त्याचं कौतुक जरूर करा. एखाद्याच्या घरी तुम्ही राहायला गेला असाल तर ते घर नीटनेटकं आणि स्वच्छ ठेवण्यात तुम्ही मदत करू शकता.
10. शक्य असेल तेंव्हा आपल्या आजूबाजूला असणाऱ्या वृध्द व्यक्ती आणि लहान मुलांसोबत वेळ घालवा. त्यांच्याकडून ज्ञान घ्या आणि द्या. एकमेकांच्या या सहवासाचा मनावर खूप चांगला परिणाम दिसतो.
सवयी साध्याच आहेत मंडळी, फक्त त्या आपल्या जीवनात आणल्या पाहिजेत. तुम्ही आणणार ना ?