computer

मोत्याची चांगली वाईट-लक्षणे, वजन, मापे, खरा मोती ओळखण्याच्या युक्त्या, सर्व काही आहे या लेखात!!

बसरा मोती निदान भारतात तरी आता मिळत नाही. जुन्या दागिन्यातून काढून एखादा जव्हेरी विकत असेल तरच. बाकी बसरा मोती बगदादमधून आपल्याकडे यायचे असे जाणकार सांगतात. बसरा मोती ओळखायचा कसा? हा मोती पांढरा नसतो. गायीच्या दुधावर आलेली साय ज्या रंगाची असते तितका पिवळसर असतो. चमक मनाला भूल पाडेल अशी असते. सध्या बाजारात मिळणारे चायनीज मोती आकाराने छान गोल असतात, त्यामुळे दागिन्यात वापरायला बरे पडतात. बसर्‍याचा आकार गोलाकार नसतो. बसलेल्या बेसनाच्या लाडवासारखा दिसतो. गुजरातमध्ये खंबातला अजूनही जुने बसरा मोती मिळतात.

पण सर्वच वेडेवाकडे मोती खरे असतात असेही नाही. उलट इथे फसगत होण्याचा अधिक! ग्राहकाने खरा मोती मागीतला तर जव्हेरी खरा मोती वेडावाकडा असतो असे सांगतात. तरीही ग्राहकाने आग्रह केला तर वेडावाकडा जो मोती दाखवला जातो तो मोती नसतो. तो मोती नसून उलटा वळलेला शिंपला असतो. त्याला बहुतेक मदर ऑफ पर्ल असे म्हणतात. याची मोठी शंभर दोनशे ग्रामची लादीच मिळते. मग त्याचे तुकडे करून नैसर्गिक मोती म्हणून विकले जातात.

सध्या महागातला मोती म्हणजे व्हेनेझुलन मोती. पण बसरा मोती वेगळाच आणि महागही. दहाएक वर्षापूर्वी ऐकीव किंमत सत्तावीस हजार रुपये कॅरट सांगितली जात असे.  

बसरा मोत्यांचा विषय आणि श्री संत ज्ञानेश्वरांची रचना आठवणार नाही असे व्हायचे नाही. 

सुढाळ ढाळाचें मोती ।अष्टै अंगे लवे ज्योती ||
जया होय प्राप्ती । तो चि लाभे.

संतानी नरदेह आणि जन्माचे वर्णन सुढाळ म्हणजे सुघड अशा मोत्याची उपमा देत म्हटले आहे की असे मोती आठ अंगानी प्रकाश उजळतात. मोती जोखायचा म्हणजे आता मोत्याची आठ अंगे शोधणे भाग झाले. आम्हांला आठ नाही, पण सहा अंगाची माहिती मिळाली. आदर्श म्हणावे अशा मोत्याची लक्षणे म्हणजे तो पूर्ण वर्तुळाकार, तेजस्वी, तुळतुळीत, वजनदार, कोमल आणि निर्मळ असावा.
आठही गुण मिळाले नसले तरी मोत्याच्या दोषांची यादी मात्र आमच्याकडे आहे. फाट, नर, पोटनर, करवा, छाटे, खळगे यांपैकी एकही दुर्गुण असेल, तर मोती चांगला मानला जात नाही. आता म्हणाल, या शब्दांवरुन काही अर्थबोध होत नाही. म्हणून आम्ही या दोषांचा अर्थही देत आहोत.
फाट:  मोत्याच्या माथ्यावर फुटका भाग असेल तर फाट.
नर: मोती चिरल्यासारखी आडवी रेघ दिसली तर ती नर.
करवा : मोत्यात खोलगटपणा असेल तर करवा आणि 
छाटे: मोत्यावर वेगळ्या रंगाचे ठिपके दिसले तर छाटे.

 

पण आता परिस्थिती अशी आहे की खरे मोती मिळतच नाहीत. त्यामुळे या गुणदोषांची यादी फारशी उपयोगाची नाही. उपयोगाची नसलेली तरीही रंजक अशी मोत्याची माहिती म्हणजे पूर्वी चालत असलेली मोत्याचे भाव सांगण्याची पध्दत.

मोत्याचा भाव चवावर सांगितला जायचा. आता चव हे काही वजनाचे माप नाही. तत्कालीन वजनाचे माप होते रत्ती. रत्ती म्हणजे तोळ्याचा बासष्ठावा भाग. रत्तीचे आणखी बारीक माप म्हणजे तांदुळ. तांदळाच्या सोळा दाण्याचा भार म्हणजे एक रत्ती.

चव म्हणजे वजनभाराचे माप नसले तरी वजनभाराचा एक फॅक्टर असे आपण म्हणूया. मोती मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे मोत्याचा लॉट विक्रीस यायचा. त्याची किंमत काढण्याची पध्दत अशी होती.
लॉटचे वजन रत्तीत करायचे. त्याचा वर्ग करायचा. त्या वर्गाला पंचावन्नने गुणायचे आणि शहाण्णवने भागायचे. जो अंक येईल त्याला लॉटमधल्या मोत्यांच्या संख्येने भागायचे. असे करून जे उत्तर आले ते चवात आले. हे सगळे उपदव्याप करायचे कारण असे की लॉटमध्ये मोत्यांची संख्या कमी असली की चव वाढायचे आणि पैसे जास्त मिळायचे. बाकी पंचावन्न आणि शहाण्णवाचा गुणाकार आणि भागाकार का करायचा याचे उत्तर मात्र मिळाले नाही. आता मात्र कॅरेटच्या हिशोबाने बाजार चालतो. एक कॅरेट म्हणजे दोनशे मिलीग्राम. पाच कॅरेट म्हणजे एक ग्राम. 

मोत्यांची माहिती उगाळावी तितकी कमीच आहे. किंबहुना सगळ्याच रत्नांची माहीती उपसावी तेव्हढी कमीच आहे. खरे जडजवाहिर परवडणे अवघड आहे. तेव्हा आम्ही आपले तुकोबा सांगतात तशी मानस पूजा करतो आणि सगळी रत्ने ज्याची त्याला अर्पण करतो.

रत्नांची कुंदले मोतीयाचा तुरा । शिरपेच बरा कलगीवरी ||

पाचरत्न मोती माणिक हिरक । अर्पिले सुरेख हार यांचे ||

कंठी ,भुजबंद ,पोंची ,कमरबंद । मुद्रिका स्वच्छंद नानापरी ||

तुका म्हणे माझ्या इच्छेच्या कारणे । ऐशीम भूषणे ल्याला देव ||

तुम्ही मात्र खरेदीसाठी पैसे जमा करा, आम्ही असेच हिरे-मोती-जवाहिरांबद्दल पुढचा लेख घेऊन येतो.

सबस्क्राईब करा

* indicates required