computer

गुगल, फेसबुक नाही तर चक्क एका बॅटरी कंपनीने जगातले सर्वात जास्त अब्जाधीश तयार केलेत?

सर्वात जास्त अब्जाधीश कुठे निर्माण झाले असे विचारले तर तुम्हाला नक्कीच उत्तर आठवणार नाही. कारण अब्जाधीश काही कुठल्या फॅक्टरीत तयार होत नाहीत. पण एक खरोखर अशी कंपनी आहे जिने गुगल आणि फेसबुकपेक्षा जास्त अब्जाधीश निर्माण केले आहेत. ही एक बॅटरी कंपनी आहे. सर्वात जास्त अब्जाधीश निर्माण करणारी कंपनी म्हणून फोर्ब्जनेही या कंपनीची दखल घेतली आहे. या कंपनीने एका वर्षात कंपनीच्या ९ शेअरहोल्डर्सना अब्जाधीश केले आहे. आजच्या लेखातून या कंपनीने अशी काय किमया साध्य केली जाणून घेऊया.

एका वर्षात नऊ अब्जाधीश निर्माण करणाऱ्या या कंपनीचे नाव आहे ‘कंटेम्पररी अँम्परेक्स टेक्नॉलॉजी लिमिटेड’. ही कंपनी चीनमध्ये आहे. सीएटीएल या नावानेही या कंपनीला ओळखले जाते. ही कंपनी बीएमडब्लू, फोक्सवॅगन आणि मर्सिडीज बेंझ, यासारख्या ऑटोमोबाइल कंपन्यांना बॅटरीज पुरवते. गेल्या वर्षात इलेक्ट्रिक गाड्यांची मागणी चांगलीच वाढली आहे. त्यामुळे या कंपनीच्या नफ्यात १५०% इतकी वाढ झालेली आहे.

रॉबिन झेंग यांनी २०११ मध्ये या कंपनीची सुरूवात केली होती. ५२ वर्षांचे झेंग आता जगातील ४७व्या क्रमांकांचे श्रीमंत व्यक्ती आहेत. रॉबिन झेंग यांनी १९९९ मध्ये लिथियम-आयर्नच्या बॅटरीजची निर्मिती करणाऱ्या अँम्परेक्स टेक्नोलॉजी लिमिटेडची (एटीएल) स्थापना केली होती. या कंपनीद्वारे तेव्हा आयफोन आणि आयपॅड यासारख्या मोबाईल्सना लागणाऱ्या बॅटरीज बनवल्या जात होत्या. अॅपल, मॅकबुक, यासारख्या मोबाईल कंपन्या एटीएलच्याच बॅटरीज वापरत असत. पुढे २०११ मध्ये त्यांनी एटीएलचाच विस्तार करत कंटेम्पररी अँम्परेक्स टेक्नॉलॉजी लिमिटेड’ची (सीएटीएल) निर्मिती केली. यामध्ये त्यांनी फक्त कार आणि गाड्यांसाठी लागणाऱ्या बॅटरीजवरच जास्त लक्ष केंद्रित केले. त्यानंतर एका वर्षांनी बीएमडब्ल्यूशी बॅटरी पुरवण्याचा करारही केला.

चीन सरकारने प्रदूषणमुक्त उद्योगांना प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली आहे. याचा फायदा सीएटीएललाही नक्कीच झाला. सरकारकडून मदतीचा हात मिळाल्याने या कंपनीची भरभराट सुरू झाली. चीनने २०१५ मध्ये बॅटरी उत्पादन करणाऱ्या आणि त्यांचा पुरवठा करणाऱ्या ५० देशी कंपन्यांची स्वतःहूनच शिफारस करण्यास सुरुवात केली, ज्यात सीएटीएलचाही समावेश होता. एलजी आणि सॅमसंग सारख्या परदेशी कंपन्यांना त्यांनी या योजनेतून वगळले. त्यामुळे अपोआपच वाहन निर्माते सीएटीएलकडेच वळू लगले. चीन सरकारने इलेक्ट्रॉनिक वाहनांवर सबसिडी देण्याचीही योजना आणली, ज्यामुळे इलेक्ट्रोनिक वाहनांच्या वापरात वाढ झाली आणि पर्यायाने सीएटीएलला याचा अमाप फायदा झाला.

चीनच्या वाढत्या प्रभावाचा फायदा घेत, कंपनीने जोमात आपला विस्तार केला. आपली उत्पादने, संशोधन आणि विकास क्षमता वाढवण्यावर भर दिला. आज सीएटीएल ही जगातील एक सर्वात मोठी ऑटोमोटिव्ह कंपनी असून आंतरराष्ट्रीय पातळीवर इलेक्ट्रिक व्हेहिकल मार्केटमध्ये तिने चांगलाच जम बसवला आहे.

२०१८ मध्ये सीएटीएलची आंतरराष्ट्रीय विक्रीतील वाटा १८% होता. तोच २०२० मध्ये २२% वर पोहोचला. २०२० मध्ये जगभरात इलेक्ट्रॉनिक वाहनांची मागणी वाढली होती. या एका वर्षात एकूण २.५ दशलक्ष इलेक्ट्रिक गाड्यांची विक्री झाली.

चीनमध्येही या कंपनीने २०१८च्या तुलनेत २०२० मध्ये विक्रमी विक्री केली आहे. २०२० मध्ये सीएटीएलचा नफा सुमारे १०%नी वाढला. २०२० मध्ये त्यांना ७.८ अब्ज डॉलरचा फायदा झाला तर त्यांचे निव्वळ उत्पन्न होते ८६० अब्ज डॉलर. २०२० हे वर्ष सीएटीएलसाठी अतिशय लाभदायक ठरले. २०२१ हे वर्ष तर त्यांच्यासाठी अजून फायदेशीर ठरेल. यावर्षात ते जागतिक स्तरावरील एक नामांकित ब्रँड म्हणूनही ओळखले जातील. यावर्षी इलेक्ट्रॉनिक गाड्यांच्या विक्रीत तुफान वाढ होणार असल्याचा अंदाज आयएचएस मार्कीट या कंपनीकडून बांधला जात आहे.

२०२०च्या सुरूवातीला सीएटीएलने युरोपमध्ये प्रवेशही केला नव्हता. तिथे २०२०च्या शेवटी ही कंपनी युरोपमधील चौथ्या क्रमांकाची बॅटरी पुरवणारी कंपनी बनली.

सगळ्यात मोठी बाब म्हणजे या कंपनीच्या संचालक मंडळातील नऊ सदस्यांची वर्णी अब्जाधीशांच्या यादीत लागली आहे. फेसबुक आणि गुगल सारख्या मोठ्या कंपन्यांनाही ही किमया साधता आलेली नाही. या दोन्ही बड्या कंपन्यांचे फक्त मालकच अब्जाधीश आहेत. इतर संचालक मंडळाचे उत्पन्न त्या तुलनेत कमीच आहे. मात्र सीएटीएलच्या संचालक मंडळातील सगळ्याच सदस्यांचे उत्पन्न अब्जावधीच्या घरात आहे. म्हणूनच सर्वाधिक अब्जाधीश सदस्य निर्माण करणारी कंपनी म्हणून फोर्ब्ज मासिकाने या कंपनीची दाखल घेतली आहे.

सीएटीएल नंतर चीनचीच खाद्यपदार्थ उत्पादन करणारी फोशान हैतियन फ्लेवारिंग अँड फूड या कंपनीचे आठ सदस्य अब्जाधीश झाले आहेत. त्यानंतर नंबर लागतो तो वॉलमार्टचा. ज्याचे सात सदस्य अब्जाधीश आहेत. त्यानंतर फेसबुक आणि गुगलचा नंबर लागतो.

सर्वात कमी कालावधीत या कंपनीने जगातील मोठ्यातील मोठ्या कंपन्यांना देखील मागे टाकले आहे. येत्या वर्षात ही कंपनी नक्कीच ग्लोबल ब्रँड बनलेली असेल, यात शंका नाही.

 

लेखिका: मेघश्री श्रेष्ठी

सबस्क्राईब करा

* indicates required