बंगलोरचा बस कंडक्टर UPSC ची परीक्षा पास झाला? बातमी खरी की खोटी ?

काही दिवसांपूर्वीच एक प्रेरणादायी बातमी सगळीकडे व्हायरल झाली होती. बंगलोरचा बस कंडक्टर मधु एन सी हा UPSC ची परीक्षा पास झाल्याची ही बातमी होती. सामान्य माणसांपासून ते शत्रुघ्न सिन्हापर्यंत प्रत्येकाने या बातमीला शेअर केलं. या बातमीतून इतरांनाही प्रेरणा मिळेल हा या मागचा उद्देश्य होता.
....पण ही बातमी खरी आहे का?
ही बातमी खरी की खोटी हे तपासून बघण्यापूर्वी बातमी काय होती ते जाणून घेऊया.
ही बातमी सर्वप्रथम बंगलोर मिररने छापली होती. ही बातमी अशी की : बंगलोर महानगर परिवहन महामंडळात बस कंडक्टरची नोकरी करणारा मधु एन सी हा तरुण UPSC च्या पूर्वपरीक्षेत पास झाला असून तो आता इंटरव्ह्यूची तयारी करतोय. तो रोज ५ तास अभ्यास करायचा आणि उदरनिर्वाहासाठी बस कंडक्टरची नोकरी करायचा. बंगलोर सार्वजनिक वाहतूक सेवेचे अधिकारी आणि आयएएस ऑफिसर सी शिखा यांनी त्याला अभ्यासात मदत केली होती.
आता या बातमीतील तथ्य जाणून घेऊया.
दि लॉजिकल इंडियन या वेबसाईटने केलेल्या तपासणीत त्यांनी १४ जानेवारी २०२० साली जाहीर झालेल्या UPSC च्या नोटीसची पडताळणी केली. या नोटीसमध्ये दिलेल्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या यादीत मधुचं नाव नव्हतं. ही यादी नीट पाहिल्यावर त्यांच्या लक्षात आलं की मधुचं नाव कोणत्याच यादीत नाही. मधुने जी मार्कशीट दाखवली होती ती खोटी होती. त्यावर चक्क मधु कुमारी हे नाव लिहिलेलं होतं.
खरी बातमी बाहेर पडल्यानंतर बंगलोर मिररचे एडिटर रवी जोशी यांनी ट्विटरवरून माफी मागितली आहे. बंगलोर मिररने ही बातमी मागे घेतली आहे. तसेच मधुने खोटं का सांगितलं याचा तपास सुरु आहे.
तर, या बातमीतून हे पुन्हा एकदा सिद्ध झालं की व्हायरल झालेल्या सगळ्याच बातम्या खऱ्या नसतात.