computer

ज्यूस विकण्यासाठी त्याने शोधून काढलेल्या कल्पनेला तुम्ही पण सलाम कराल !!

इकोफ्रेंडली लाइफस्टाइल ही काळाची गरज आहे. आपल्या रोजच्या जगण्यातून पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आज आम्ही ज्या व्यक्तीची गोष्ट सांगणार आहोत तो बंगलोरचा एक साधा ज्यूस विक्रेता आहे, पण त्याने वापरलेली इकोफ्रेंडली आयडिया जगातभारी आहे.

बंगलोरमध्ये रहाणारा आनंद राज हा ज्यूस विक्रेता शून्य कचरा पद्धतीवर दुकान चालवत आहे. तो ग्राहकांना चक्क फळांच्या कवचात ज्यूस देतो. हे कवच नंतर  गुरांना खाऊ घातले जातात. फळांच्या आतला गर काढल्यानंतर उरणाऱ्या कवचाचा असा वापर तुम्ही नक्कीच कुठे बघितला नसणार.

या ज्यूस सेंटरची एवढी एकच खासियत नाही. ग्राहकांनी जर येताना स्टीलचे ग्लास आणले तर त्यांना खास डिस्काऊंट मिळतो. त्यांना अवघ्या २० रुपयात ज्यूस दिला जातो. याखेरीज धुम्रपान सोडणाऱ्या व्यक्तीला मोफत ज्यूस दिला जातो.

या कल्पनेच्या मागे असलेला आनंद राज हा एकेकाळी रेडीओ जॉकी होता. १२ वर्ष नोकरी केल्यानंतर त्याने नोकरीचा राजीनामा देऊन वडिलांचं ज्यूसचं दुकान चालवायला घेतलं. सुरुवातीला या दुकानाचं नाव ‘Karnataka Travels and Juice Centre’होतं. आनंदने हे नाव बदलून ‘Eat Raja‘ नाव ठेवलं. आनंद म्हणतो की ‘माझे वडील मला लहानपणी नेहमी म्हणायचे की ‘थनाप्पा राज’ म्हणजे ‘खाऊन घे राज’.’ म्हणून त्याने दुकानाचं नावही ‘Eat Raja‘ ठेवलं.

तर मंडळी, बंगलोर मधला एक साधारण ज्यूस विक्रेता एवढी भन्नाट कल्पना शोधून काढू शकतो हे कौतुकास्पद आहे. ही कल्पना आम्हाला तर फार आवडली. तुम्हाला कशी वाटली? कमेंटबॉक्समध्ये नक्की सांगा.

सबस्क्राईब करा

* indicates required