computer

उन्हाळ्यात फिरायला जाताय? आधी भारतातल्या या बेस्ट ठिकाणांबद्दल जरूर वाचा..

मित्रांनो, निम्मा उन्हाळा आता संपून गेलेला असला तरी परिक्षांच्या कारणामुळे बर्‍याच जणांनी आता या मे महिन्यात फिरायला जाण्याच्या प्लॅन आखलेला असणार. मुंबई, गोवा, मनाली, ही नेहमीची ठिकाणं तर आहेतच. पण आम्ही तुमच्यासाठीच उपलब्ध करतोय आणखी काही एकापेक्षा एक गारेगार ठिकाणांची माहिती..  इथं  जाऊन तुम्ही तुमचा उन्हाळा आणि सुट्टी, दोन्हीही बर्‍यापैकी सुखकर करू शकता. बघा, वाचा, आणि ठरवा... कुठं कुठं जायाचं फिरायला ते... 

द्रास (जम्मू - काश्मीर)

कारगिलपासून फक्त ६२ किलोमीटरवर असलेलं हे ठिकाण भारतातील सर्वात थंड ठिकाणांपैकी एक आहे. काश्मिरमधून लडाखला  जो रस्ता जातो, त्या वाटेतच हे ठिकाण लागतं. त्यामुळे याला लडाखचं प्रवेशद्वार  असंही म्हटलं जातं. हिवाळ्यात इथलं तापमान उणे ४५° सेल्सिअसपर्यंत खाली जातं. त्यामुळं उन्हाळ्यातही हिवाळा अनुभवायचा असेल तर नक्की इथं भेट द्या. इथून तुम्ही पुढं अमरनाथलाही जाऊ शकता.

संदकफू (पश्चिम बंगाल)

नेपाळ बॉर्डरवर असणारं ट्रेकर्ससाठी अतिशय सुंदर ठिकाण म्हणजे संदकफू. पश्चिम बंगाल ते सिक्कीम पर्यंत पसरलेल्या सिंगालिला पर्वतश्रेणीतीमध्ये संदकफू हे सर्वोच्च टोक आहे. या टोकाचं वैशिष्ट्य म्हणजे इथून तुम्हाला जगातील सर्वात उंच असणारी माऊंट एव्हरेस्ट, कांचनगंगा, लाहोत्से, आणि मकालू ही चारही पर्वतटोकं पहायला मिळतात. आपल्यासोबतच चालणारे ढग, सुर्यकिरणांनी लाल झालेल्या पर्वतरांगा, आणि ट्रेकींगचा रोमांच. सगळं काही इथंच आहे!! 

तवांग (अरूणाचल प्रदेश)

तुम्ही निसर्गप्रेमी असाल तर तवांग तुमच्या स्वागतासाठी सदैव तयार आहे. शांत वाहणारे झरे, उंच उंच धबधबे, डोंगरदर्‍या, हिरवागार परिसर आणि बौध्द मठ.. ही ऐतिहासिक तवांगची प्रमुख आकर्षणं.  निसर्गसौंदर्यामुळे बर्‍याच चित्रपटांचं शूटींगसुद्धा इथं होत असतं. मार्च ते अॉक्टोबर दरम्यान कधीही तुम्ही तवांगला भेट देऊ शकता.

उटी (तमिळनाडू)

उटी म्हणजेच उटकमंडलम!!  हे सुंदर अशा निलगिरी पर्वतरांगात वसलेलं विहंगम थंड हवेचं ठिकाण आहे. मुकुर्थी राष्ट्रीय उद्यान, बोटॅनिकल गार्डन, कलहट्टी धबधबा, दोडाबेट्टा उद्यान, फ्लॉवर शो, अशा अनेक वैशिष्ट्यांसह उटी पर्यटकांना आकर्षित करतं. दोडाबेट्टा हे पश्चिम पर्वतरांगांमधलं दुसर्‍या क्रमांकाचं शिखर आहे.  इथल्या जुन्या पध्दतीच्या इमारती आपल्याला त्याच जुन्या काळात घेऊन जातात. चारी बाजूंनी निलगिरी डोंगरांनी वेढलेल्या या ठिकाणाला एकदातरी नक्की भेट द्या.

सराहन (हिमाचल प्रदेश)

सरहान. शिमला जिल्ह्यात, सतलज घाटीमध्ये वसलेलं एक प्रमुख सुंदर पर्यटन स्थळ. सफरचंदाच्या बागा, देवदारची जंगलं, लहान लहान नद्या, आणि स्लेटचं छप्पर असणाऱ्या घरांसाठी सरहान लोकप्रिय आहे. भीमाकली मंदिर आणि श्रीखंड महादेव ही देवस्थानही इथे प्रसिद्ध आहेत. बंजारा रिट्रीट, भाभा घाटी, बर्ड पार्क ही गर्दी खेचणारी ठिकाणं सरहानमध्ये आहेत.

शिलॉंग - चेरापुंजी (मेघालय)

नैसर्गिकरीत्याच सुंदर असलेलं शिलॉंग हे शहर मेघालयची राजधानी आहे. इथून जवळच जगातील सर्वात जास्त पाऊस पडणारं चेरापुंजी-मौसीनराम ठिकाण आहे. इथली स्वच्छता, इको पार्क, पर्वतघाट, हे सारं काही सुंदर आहेच. पण याहीपेक्षा सुंदर आहेत इथले सजीव झाडांच्या मुळापासून बनवलेले झुलते पूल. सततच्या पावसामुळे इथलं वातावरण तुम्हाला अतिशय अल्हाददायक वाटेल. इथे बर्‍याच कोळशाच्या खाणीही आहेत.

मुन्नार (केरळ)

मुथिरपुझा, नल्लथन्नी, आणि कुंडल, या तीन पर्वतश्रेणींच्या मिलनाचं ठीकाण म्हणजे मुन्नार. इथलं प्रमुख आकर्षण आहे दूरदूरपर्यंत पसरलेले चहाचे मळे आणि थंड हवा. ब्रिटिशांसाठी हे एक आवडतं उन्हाळी ठिकाण होतं. टाटानं इथे चहा संग्रहालय बनवलं आहे. आनामुढी शिखर, इरविकूलम राष्ट्रीय उद्यान, टॉप स्टेशन, चिन्नकनाल, माट्टूपेट्टी, पल्लिवासल, असे अनेक स्पॉट्स तुम्हाला मुन्नारमध्ये बघायला मिळतील.

होर्सले हिल्स (आंध्र प्रदेश)

आंध्रप्रदेशच्या पर्वतीय सौंदर्याचं प्रतीक म्हणून या होर्सले पर्वतरांगांकडे पाहिलं जातं. मनोरम्य निसर्ग, प्रदूषणरहित स्वच्छ हवा, गुलमोहर, महोगणी, चंदनाचे आकर्षक वृक्ष म्हणजे होर्सले हिल्स. धाडसी खेळाची आवड असेल तर इथं रॅपलींग, ट्रेकींग, रॉक क्लायम्बींग वगैरेही करता येईल. इथून कौंडीण्य वन्यजीव अभयारण्यही जवळच आहे. सोबत इथे पर्यावरण पार्क आणि संग्रहालय सुध्दा आहेत. थोडक्यात सांगायचं झाल्यास तुम्ही जर खूपच धावपळीतून ब्रेक घेतला असाल, तर तुमच्यासाठी हॉर्सले हिल्स सारखं दुसरं भारी ठिकाण नाही.

लक्ष्यद्वीप बेटं..

लक्ष्यद्वीप. अनेक बेटांचा समूह. नाव तर ऐकलंच असणार. इथं येणारा पर्यटक जे शोधत असतो ते सर्वकाही त्याला इथेच मिळेल. निळाशार समुद्र, मस्त समुद्री भोजन, थरारक वॉटर स्पोर्ट्स, मासेमारी, लांबसडक समुद्रकिनारे, आणि भरपूर काही. स्कूबा डायव्हिंग तर इथलं मुख्य आकर्षण आहे. एकांताच्या शोधात असणार्‍यांना लक्ष्यद्वीप हा एक उत्कृष्ट पर्याय आहे.

वायनाड (केरळ)

केरळमधलं आणखी एक मनमोहक स्थळ. याची ओळख 'केरळचा स्वर्ग' अशी आहे. पश्चिम घाटाचं विहंगम सौंदर्य पांघरून वायनाड हे स्थळ दूरदूरच्या पर्यटकांना आकर्षित करतं. हे ठिकाण ३००० वर्षांपूर्वीही अस्तित्वात होतं असं एक अनुमान आहे. सुंदर धबधबे, हिरवागार परिसर, कॉफीचे मळे, आणखी बरंच काही तुम्हाला स्वर्गसुख देऊन जाईल. म्हणूनच इथे कार्पोरेट जगतातील अनेक व्यक्ती खास विश्रांतीसाठी येतात. 

तर मंडळी, आवडली का ही उन्हाळी स्थळं ? शब्द आणि जागेच्या मर्यादेमुळे आम्ही मोजकीच माहिती देतोय खरी, पण या ठिकाणांची छायाचित्रे तुम्ही इंटरनेटच्या माध्यमातून एकदा नक्की पाहून घ्या. आणि हो, आमची माहिती आपल्या मित्रांसोबतही शेअर करा.

सबस्क्राईब करा

* indicates required