computer

बंदी घातलेल्या ॲप्सना‌ पर्याय आहेत? नक्कीच! ही घ्या यादी...

चीनसोबतच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारनं‌ टिकटॉकसोबत एकूण ५९ चायनीज ॲप्सवर बंदी घातलीय. लोकांच्या वैयक्तिक माहितीच्या सुरक्षीततेच्या दृष्टीनं उशिरा का असेना‌, पण हा‌ निर्णय योग्यच म्हणायला‌ हवा. मात्र बंदी घातलेल्यांपैकी बरेच ॲप्स हे आपल्यासाठी उपयोगाचे, आवडीचेही होते. पण चिंता नको. यातल्या बहुतांश ॲप्सना आपल्याकडे चांगले‌ पर्याय आहेत. या पाहूया...

टिकटॉक

टिकटॉकनं भारतात लोकप्रियतेचा कळस गाठला होता. या शॉर्ट व्हिडीओ मेकींग ॲपचे भारतात तब्बल २० कोटी सक्रिय वापरकर्ते आहेत. पण आता गुगल प्ले स्टोअरवरून टिकटॉक हटवलं गेलं‌ आहे. त्याचवेळी 'चिंगारी' (Chingari) नावाचं भारतीय ॲप लोकांना‌ आकर्षित करतंय. आतापर्यंत ३० लाख लोकांनी हे ॲप डाऊनलोड ‌केलं आहे.

बेंगळुरूच्या बिस्वात्मा नायक आणि सिध्दार्थ गौतम या दोन डेव्हलपर्सनी हे ॲप बनवलंय आणि त्यांच्या म्हणण्यानुसार चिंगारी ॲप टिकटॉकपेक्षाही चांगला पर्याय आहे. यावर तुम्ही व्हिडीओ‌ बनवू शकता, इतरांनी बनवलेलं कंटेंट पाहू शकता, फोटो, व्हाट्सॲप स्टेटस, GIF, स्टिकर्स, ऑडीओ क्लीप्स वापरू शकता. हे‌ ॲप तुम्हाला मराठीसोबत अन्य भारतीय भाषांमध्येही वापरता येईल. या ॲपची वाढणारी लोकप्रियता बघून‌ आता अनेक गुंतवणूकदार यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी इच्छूक आहेत. टिकटॉकला आणखी एक भारतीय पर्याय म्हणजे 'रोपोसो' (Roposo) ॲप. तेही तुम्ही वापरून पाहू शकता.

कॅमस्कॅनर

स्मार्टफोनवरती डॉक्युमेंट, फोटो स्कॅन करणं, ती PDF स्वरूपात रूपांतरीत करणं आणि डजिटल स्वरूपात साठवण्यासाठी कॅमस्कॅनर (CamScanner) हे ॲप खूपच चांगलं होतं. पण आता त्यावरती बंदी घातली गेल्यामुळं जर तुम्ही तुमची महत्वाची डॉक्युमेंट्स कॅमस्कॅनरवरती ऑनलाईन स्टोअर केली असतील तर ॲप बंद होण्याआधीच ती डाऊनलोड करून घ्या.

याऐवजी तुम्ही मायक्रोसॉफ्टचं 'ऑफिस लेन्स' (Microsoft's Office Lens), 'अडोबे स्कॅन' (Adobe Scan), 'टॅपस्कॅनर' (TapScanner) ही ॲप्स वापरू शकता. या ॲप्समध्ये तुम्ही प्रिंटेड किंवा लिखीत स्वरूपातील कागदपत्रं स्कॅन करून ती डीजिटली साठवू शकता. 'OCR' आणि 'ॲटो एज डिटेक्शन' तंत्रज्ञानामुळं तुम्ही कोणत्याही प्रकारचं डॉक्युमेंट स्कॅन करताय हे या ॲप्सना ओळखता येतं.

युसी ब्राऊझर (UC Browser), सिएम ब्राऊझर (CM Browser)

अनेकजण इंटरनेट ब्राऊझींगसाठी 'युसी ब्राऊझर': या ॲपचा वापर करतात. पण हे चायनीज ॲप सतत नको त्या जाहिराती दाखवणं आणि अनावश्क परमिशन्स घेऊन युजर्सचा डेटा चोरत असल्याच्या आरोपावरून वादात सापडलं होतं. आता यावरती बंदी घातली गेली आहे. याऐवजी इंटरनेट ब्राऊझींगसाठी तुमच्याकडे 'गुगल क्रोम' (Google Chrome) आणि फायरफॉक्स ब्राऊझर (Firefox Browser) या ॲप्सचा उत्तम पर्याय आहे.

दोन्ही ॲप्स अत्यंत सुरक्षित आणि वेगवान आहेत आणि इथं तुमच्या गोपनीयताही पुर्णपणे सुरक्षित राहते. आता गुगलही चोऱ्या करतंच, पण आपण गुगलची इतर ॲप्स वापरतोच की, त्यामुळं नव्याने कुणाच्या हाती काही जाणार नाही, इतकंच. यात ॲडब्लॉकरचा पर्यायही मिळतो जो वापरून नको असलेल्या जाहिराती तुम्ही ब्लॉक करू शकता.

शेअर इट (SHAREit) आणि झेन्डर (Xender)

दोन स्मार्टफोन्समध्ये किंवा स्मार्टफोन आणि कंम्प्यूटरदरम्यान फोटो, व्हिडीओ, किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या फाईल्स वेगानं आणि वायरलेसली ट्रान्सफर करण्यासाठी शेअर इट आणि झेन्डर ही दोन‌ ॲप्स खुपच लोकप्रिय होती. यावरतीही बंदी घातली गेल्यामुळं तुम्ही 'फाईल्स बाय गुगल' (Files By Google) हे फाईल मॅनेजर ॲप वापरू शकता. यामध्ये तुम्हाला फाईल्सची देवाणघेवाण करण्यासाठी सेन्ड आणि रिसिव्हचा पर्याय मिळेल. पण दोन्ही डिव्हाईसमध्ये हे ॲप डाउनलोड केलेलं असलं पाहिजे.

(Z Share)

'झेड शेअर' (Z Share) हे आणखी एक वेगवान फाईल ट्रान्सफर ॲप आहे जे श्रावन हेगडे नावाच्या २१ वर्षीय विद्यार्थ्यांनं बनवलंय. 'झाप्या' (Zapya) हे ॲपही तुम्ही सर्व प्रकारच्या फाईल्स आणि डॉक्युमेंट्सची देवाणघेवाण करण्यासाठी वापरू शकता.

ईएस फाईल एक्सप्लोरर (ES File Explorer)

ईएस फाईल एक्सप्लोरर हे एक फाईल मॅनेजर टूल आहे. यामध्ये फाईल मॅनेजमेंटसाठी खुपच चांगला इंटरफेस असल्यानं अनेकजण ते वापरत होते. पण हे ॲपही जाहिराती आणि स्पायवेअरच्या संशयात होतं. या ॲपवर बंदी घालण्यात आली असल्यानं त्याजागी तुम्ही 'फाईल्स बाय गुगल' (Files by Google) हे ॲप वापरू शकता.

इथं तुम्ही चांगल्या फाईल मॅनेजींगसोबतच फोनमधील अनावश्यक‌‌ जंक फाई‌ल्स क्लिन करू शकता. आधी सांगितल्याप्रमाणे फाईल्स ट्रान्सफरही करू शकता. याला आणखी पर्याय म्हणजे 'एफ एक्स फाईल एक्सप्लोरर' (FX File Explorer) आणि 'फाईल कमांडर' (File Commander). ही ॲप्सही तितकीच चांगली आणि सुरक्षीत आहेत.

हेलो (Helo), बीगो लाईव्ह (Bigo Live), लाईकी (Likee)

हेलो‌, बीगो, लाईकी हेही लोकप्रिय व्हिडीओ शेअरींग ॲप्स आहेत. यांना पर्याय म्हणून 'शेअरचॅट' (ShareChat) हे भारतीय सोशल ॲप तुम्ही वापरू शकता. भारतीय भाषांमध्ये उपलब्ध असलेल्या शेअरचॅटमध्ये मनोरंजक व्हिडीओ, व्हाट्सॲप स्टेटस, ट्रेन्डींग बातम्या, अशा अनेक गोष्टी उपलब्ध आहेत.

क्लब फॅक्टरी (Club Factory)

ऑनलाईन कपडे खरेदीवर मोठं डिस्काउंट देणारं हे चायनीज ई-कॉमर्स ॲप. याऐवजी तुम्ही मिंत्रा (Myntra) किंवा फ्लिपकार्ट (Flipkart) या भारतीय ॲप्सवर ऑनलाईन शॉपिंग करू शकता.

याशिवाय तुमच्या फोनला कोणत्याही थर्ड पार्टी बॅटरी सेव्हींग ॲप, ॲन्टी व्हायरस ॲप किंवा स्टोरेज क्लीनर ॲपची आवश्यकता नसते. त्यामुळं DU Battery Saver, Virus Cleaner, Cache Cleaner, अशा प्रकारची ॲप्स अनइन्स्टॉल करून टाका.

सबस्क्राईब करा

* indicates required