computer

वीज कापली जाईल असं सांगून तुम्हाआम्हांला तोतयांकडून फसवलं जात आहे. यावर उपायही वाचा..

मुंबईत गेलले दीड महिना एक वेगळ्या प्रकारे लूट सुरू आहे. हे लुटारू चोर म्हणून थेट तुमची लूट करत नाहीत. तर तुम्हाला तुम्ही तुमच्याच चुकीसाठी पैसे मोजत आहात असे भासवले जाते. नंतर आपल्याला समजते की आपली किती मोठी फसवणूक आहे. वीज बिल भरण्यासाठी मुंबईकर कधी टाळाटाळ करत नाहीत. याचाच फायदा काही चोरटे घेत आहेत. इलेक्ट्रिसिटी ऑफिसर बनून यायचे तुम्हाला उलटसुलट जाबजबाब करायचा आणि पैसे उकळून घेऊन जायचे अशी ही यांची तऱ्हा. एक ते दीड महिना या कालावधीत या पद्धतीने तब्बल एक कोटीपेक्षा जास्त पैसे लुटले गेले आहेत. पोलिसांना देखील यातले मोजकेच लुटारू पकडता आले आहेत.

मिडडेने यावर सखोल संशोधन करून काही गोष्टी समोर आणल्या आहेत. जेणेकरून सर्वसामान्य लोकांची अशा पध्दतीने होत असलेल्या लुटीला आळा बसू शकेल. या लुटारूंनी या कामासाठी पद्धतशीर डिजिटल लुटीचा मार्ग अवलंबला आहे. आधी ते तुम्हाला इलेक्ट्रिसिटी ऑफिसमधून बोलतोय असे सांगून फोन करतात. एकतर बिल भरा, नाहीतर तुमची वीज कापली जाईल असा धमकी वजा इशारा ते देतात.

या सर्व दबावतंत्राला अनेक लोक बळी पडतात. एकदा का समोरचा तयार झाला हे त्यांना दिसले की मग ते तुम्हाला बिल भरण्यासाठी एक ऍप डाउनलोड करायला सांगतात. यांमध्ये anydesk, quicksupport, teamviewer अशा ऍप्सचा समावेश असतो. आता यातून काय होते की हे ऍप तुमच्या फोनचा पूर्ण डाटा त्यांच्याकडे घेतात.

मग या लुटारूंचे पुढचे जाळे पडते. ते तुम्हाला बिल भरण्यासाठी पाठवलेल्या लिंकवर माहिती भरायला सांगतात. यात तुमचे सर्व बँकिंग डीटेल्स भरावे लागतात. तुमच्या बँक खात्यात ते १० रुपये टाकण्यास पुढे सांगितले जाते. हे अशासाठी की यातून त्यांना तुमच्या अकाऊंटमध्ये नेमके किती पैसे आहेत हे जाणून घेण्यास मदत होते. पुढे तुमच्या अकाऊंटला पूर्णपणे त्यांनी रिकामे करून टाकलेले असते. आता हे सर्व जेव्हा एखादा माणूस करतो तेव्हा त्याला वीज कापली जाण्याची भीती असते, याचा भीतीचा फायदा घेऊन ही लोक लाखो रुपयांचा गंडा लोकांना घालत आहेत.

सायबर पोलीस या लुटारुंचा बंदोबस्त करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असले तरी वेगवेगळ्या माध्यमातून डिजिटल लुटीचा हा प्रकार आपण स्वतः सदैव सावध असल्याशिवाय यापासून वाचणे शक्य नाही. कारण ज्यांना इंटरनेट आणि त्यातील खाचाखोचा चांगल्या माहीत आहेत ही लोक या पद्धतीने लूट करत आहेत. एकतर सर्वात महत्वाचे म्हणजे जोवर आपण स्वतः समोरून बोलणारा किंवा मेसेज करणारा व्यक्ती खरोखर कोण आहे याची खात्री करून घेत नाही तोवर पुढे प्रोसेस करूच नये. ही गोष्ट इलेक्ट्रिसिटी बिलच नव्हे, तर प्रत्येक गोष्टीत लक्षात ठेवावी अशी आहे.

यदाकदाचित या पद्धतीने तुमच्याकडून चूक झालीच तर सर्वात आधी बँकेशी संपर्क करून तुमचे बँक अकाउंट ब्लॉक करा. बँकेला अशा पद्धतीने लूट होण्याची शक्यता असल्याचे कळवावे. अशावेळी पोलिसांना या गोष्टीची माहिती देणे हे आपल्या पैशांच्या सुरक्षेसाठी महत्वाचे असते. Cybercrime.gov.in या वेबसाईटवर ऑनलाइन तक्रार दाखल करता येते. थेट पोलीस स्टेशन गाठणे हा मार्ग देखील अशावेळी चांगला ठरतो.

आपले मेल आणि संबंधित खात्यांचे पासवर्ड लगेच बदलून घ्यावे. ज्यावेळेस अशा पद्धतीने तुमच्या मोबाईलचा ताबा घेण्याचा प्रयत्न होतो, त्यातून वाचण्यासाठी आपल्यालाच लवकरात लवकर काहीतरी करणे गरजेचे असते. आपणांस मोबाईलमधील या गोष्टींची पुरेशी माहिती नसल्यास आपल्या ओळखीतील ज्याला मोबाईल चांगला हाताळता येतो त्याला गाठून या गोष्टीची जाणीव करून दिल्यास त्यातूनही थोडीबहुत मदत होते. कारण शेवटी सध्या असे प्रकार ज्या वेगाने वाढत आहेत त्यातून वाचण्यासाठी आपण स्वतः तयार असल्याशिवाय या लुटीतून वाचणे कठीण असते.

उदय पाटील