computer

इ-कॉमर्स साईट्स देत आहेत 'बाय नाऊ पे लेटर' पर्याय? हे काय प्रकरण आहे, वापरावे का? आणि कसे वापरावे?

आजकाल डिजिटल पेमेंट नवे राहिले नाही. यात नवीन तंत्रज्ञानामुळे अनेक बदल होत असतात. डेबिट, क्रेडिट कार्डनंतर फोनपे, जीपे असे ॲप्स आले आहेत. बदलत्या काळानुसार देशातील शॉपिंग मॉडेलमध्येही मोठा बदल होताना दिसत आहे. पेमेंट करणे किंवा पैसे घेणे सोपे झाल्याने डिजिटल पेमेंट भविष्यात वाढणार आहेच. तुम्ही पाहिले असेल की ई-कॉमर्स वेबसाइट्स आता 'बाय नाऊ पे लेटर' (BNPL) हा पर्याय देत आहेत. Amazon आणि Flipkart सह अनेक ई-कॉमर्स वेबसाइट्सवर तुम्हाला हा पर्याय दिसतो. हा पर्याय म्हणजे आधी वस्तू खरेदी करायची आणि नंतर पैसे द्यायचे. आज आपण याच Buy Now Pay Later Model याची सविस्तर माहिती घेऊयात.

BNPL म्हणजे तुमच्याकडे पैसे नसले तरी तुम्ही खरेदी करू शकता. खरेदीवर 'बाय नाऊ पे लेटर' पर्याय ऑफर करणाऱ्या ई-कॉमर्स कंपन्या प्रत्यक्षात ग्राहकाला एक प्रकारचे अल्प मुदतीचे कर्ज देतात. ज्यांच्याकडे क्रेडिट कार्ड नाही आणि मोठ्या रकमेची खरेदी करायची आहे त्यांना हे खूप उपयोगी आहे. हे कर्ज क्रेडिट कार्डला पर्याय आहे. क्रेडिट कार्डपेक्षा यात कर्जे स्वस्त आहेत. यामध्ये एकूण खरेदीच्या रकमेचे थोडे डाऊनपेमेंट भरावे लागते.

यामध्ये अल्प मुदतीसाठी कोणतेही शुल्क घेतले जात नाही, परंतु देय तारखेनंतर व्याज भरावे लागेल. BPNL कमी खर्चात आणि अधिक सोयीस्कर आहे. यामध्ये तुम्ही एकरकमी किंवा ईएमआय देऊ शकता. सहसा खरेदीच्या तारखेपासून पुढील १४ ते ४५ दिवसांच्या आत पेमेंट करावे लागते. जर तुम्ही अंतिम मुदतीपर्यंत पेमेंट केले नाही तर तुम्हाला २४% पर्यंत व्याज द्यावे लागते.हेच क्रेडिट कार्डचय बाबतीत घडले तर तिथे तुम्हांला ४८% व्याज भरावे लागते. शिवाय यात क्रेडिट कार्डप्रमाणे छुपी रक्कम लावली जात नाही.

BNPL हा पर्याय निवडणाऱ्या ग्राहकांना आधी ही पेमेंट योजना लागू आहे की नाही हे पहावे लागते. कारण हे अनेक गोष्टींवर अवलंबून असते. त्यासाठी तुम्हाला केवायसी पूर्ण करणे आवश्यक असते. तुमचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड तपशील सबमिट करावे लागतात.

अनेक थर्ड पार्टी सर्विस प्रोवायडर ग्राहकांना BNPL चा पर्याय देतात. यामध्ये Sezzle, Afterpay, Quadpay, Klarna आणि PayPaybright हे सर्वात जास्त वापरले जातात. हे सर्विस प्रोवायडर तुमच्या ई-कॉमर्स वेबसाइटवर केलेल्या खरेदीचे पेमेंट ईएमआयमध्ये बदलतात. काही सर्विस प्रोवायडर यासाठी त्यांच्या ग्राहकांकडून व्याज घेतात, तर काहीजण ही सेवा निःशुल्क देतात.

BNPL चे बिझनेस मॉडेल कसे काम करते ?

हे बिझनेस मॉडेल अगदी सोपे आहे. जेव्हा तुम्ही १००० रुपयांची खरेदी करता, तेव्हा पेमेंट करताना थर्ड पार्टी सर्विस प्रोवायडर निवडा. ही रक्कम चार हप्त्यांमध्ये भरण्याचा पर्याय निवडा. तेव्हा थर्ड पार्टी सर्विस प्रोवायडर ई-कॉमर्स वेबसाइटला आधीच ९४० रुपये देतील. सध्या या ई-कॉमर्स वेबसाइट्सवरून थर्ड पार्टी सर्विस प्रोवायडरला ६ टक्के कमिशन मिळते. म्हणून १००० रुपयांच्या खरेदी केलेल्या वस्तूंसाठी थर्ड पार्टी सर्व्हिस प्रोव्हायडर ६ टक्के कमिशन कापून ई-कॉमर्स वेबसाइटला ९४० रुपये देईल. त्यानंतर तुम्ही थर्ड पार्टी सर्व्हिस प्रोव्हायडरला चार वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये १००० रुपये द्याल. या प्रक्रियेत थर्ड पार्टी सर्व्हिस प्रोव्हायडरला ६० रुपयांचा फायदा मिळतो आणि तुम्हाला हप्त्यात रक्कम भरायची सुविधा मिळते. अर्थात मुदतीत भरले तर तुम्हाला नक्कीच याचा फायदा आहे नाहीतर व्याज द्यावे लागते.

तुम्हाला प्रश्न पडेल की, ई-कॉमर्स वेबसाइट्स ला BNPL चा पर्याय देऊन फायदा काय होणार? सोप्या शब्दात सांगायचे तर , जर दुकानदार आपल्या ग्राहकाला वस्तू हप्त्यात पैसे भरून विकत द्यायला तयार असेल तर ती वस्तू जास्त प्रमाणात विकली जाईल. तसेच BNPL चे व्याजही कमी आहे.

Amazon Pay Later आणि Flipkart Pay लाँच केल्याने त्यांची विक्री वाढण्यात खूप मदत झाली. मोठमोठ्या किमतीच्या वस्तू जास्त प्रमाणात विकल्या जाऊ लागल्या.

पुढे PhonePe आणि Paytm ने देखील BNPL मॉडेल आणणार आहेत. ओलाने आपली बीएनपीएल सुविधा ओला पोस्टपेड देखील सुरू केली आहे. आता पैसे नसल्यास कर्ज घ्यायला अनेक पर्याय उपलब्ध होताना दिसत आहेत. याचा कसा फायदा करून घ्यायचा हे प्रत्येकाने ठरवायचे आहे.

शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required