शरीरात एकूण २५ वेगवेगळी व्यक्तिमत्वं असलेल्या मुलीवर बेरोजगार होण्याची वेळ का आली आहे?

माणसाचं मन मोठं विचित्र असतं म्हणतात. प्रत्येकाने मनाशी बाळगलेली स्वप्नं, इच्छा, आकांक्षा, रागलोभ, स्वभाव यांत जितकी विविधता असते, तितकीच मनाच्या विकारांमध्येही. मनोविकार असलेल्या सगळ्यांनाच सरसकट वेडा असा शिक्का मारता येत नाही तो यामुळेच. काही विकार असे आहेत की वरवर पाहता त्या व्यक्तीला काही प्रॉब्लेम आहे असं इतरांना अजिबात जाणवत नाही. दुसऱ्या बाजूला काही विकार असे आहेत की त्यांची खूण त्या रोग्याकडे पाहूनच पटते. काहीही असो, हा मानसिक विकार असलेले लोक कधीकधी खूपच विचित्र वागतात.
डिसोसिएटिव्ह आइडेंटिटी डिसऑर्डर (डीआयडी) या विकाराने ग्रासलेल्या एका २३ वर्षीय महिलेची गोष्टही अशीच हटके आहे. तिच्या म्हणण्यानुसार तिच्या एकूण २५ वेगवेगळे व्यक्तिमत्वं (Identities) आहेत आणि हीच गोष्ट तिला नोकरी मिळण्याच्या मार्गात अडथळा ठरली आहे. बर्याच काळासाठी ही तरुणी आपल्या कोशात जाते, कशाकशाला प्रतिसाद देत नाही, इतकंच नाही तर आपण काय करत आहोत याची तिला काहीच जाणीव नसते. या विकाराचं नक्की कारण सांगता येत नाही, तरीपण बहुतेकदा आयुष्यात घडणाऱ्या अतिक्लेशकारक घटनांमुळे असे विकार उद्भवतात, ज्यामुळे व्यक्ती त्या प्रसंगाला सामोरे जाण्याऐवजी वास्तवापासून लांब जाते आणि वेगळंच व्यक्तिमत्त्व धारण करते.
या विकाराने ग्रस्त असलेल्या प्रस्तुत तरुणीचं नाव आहे बो हूपर. तिच्यामध्ये एकूण २५ वेगवेगळ्या प्रकारची व्यक्तिमत्त्वं सामावलेली आहेत. यापैकी कोणतंही व्यक्तिमत्त्व कधीही प्रकट होऊ शकतं. कधीकधी ती टोस्ट नावाचा १३ वर्षाचा बढाईखोर मुलगा बनते; तर कधी टेक्सास नावाची चिडखोर महिला; कधी ती ट्रेसी नावाची किशोरवयीन 'चालू' पोरगी बनून फ्लर्ट करत फिरते तर कधी केसी नावाचा मुलगा होते.
वयाच्या 14 व्या वर्षी बो ला जाणवलं की तिच्या बाबतीत कुठेतरी काहीतरी चुकतंय! तिच्याच मित्रमैत्रिणींचा तिरस्कार करणारी टेक्सास त्यावेळी अचानक प्रकट झाली आणि एरवी शांत आणि साध्यासुध्या असणाऱ्या बो चं ते रागीट, चिडखोर रूप पाहून त्यांच्या ग्रुपमध्ये एकच खळबळ उडाली. मग अधूनमधून अशी वेगवेगळी रूपं वेगवेगळ्या प्रसंगी प्रकट होत राहिली. आजारावर शिक्कामोर्तब झालं - डिसोसिएटिव्ह आइडेंटिटी डिसऑर्डर (डीआयडी).
यात महत्त्वाचा मुद्दा असा की तिच्या या अवस्थेमुळे तिला कुठेही काम मिळणं अवघड होऊन बसलं आहे. तिच्या मते तिच्यात मधूनमधून डोकावणारे हे व्यक्तिमत्त्वाचे प्रकार मूळच्या बो पेक्षा खूपच वेगळे आहेत. टोस्ट हा मुलगा यापैकीच एक. काहीसा बढाईखोर आणि खेळाची आवड असलेला. तिच्याच व्यक्तिमत्त्वाचं दुसरं रूप असलेल्या केसीशी त्याचं मोठ्या भावाचं नातं आहे. हा केसीही असाच विचित्र. कधीकधी खोलीत फिरतो, चहा हवा आहे का असं विचारतो, बो ला डार्लिंग म्हणतो.
या सगळ्यांमध्ये विशेष उल्लेखनीय म्हणजे ट्रेसी! ओरिजिनल बोपेक्षा खूप वेगळी. बो लाजाळू तर ट्रेसी एकदम बोल्ड, आत्मविश्वासाने भरलेली. क्लबमधील लोकांकडून ती ड्रिंक्स आणते. एकदा सिगारेटसाठी तिने एका माणसाला चक्क किस केलं. प्रत्यक्षात बो ने मात्र सिगारेटला स्पर्शही केलेला नाही.
किती विशेष आहे हे! एक व्यक्ती - तिची एवढी सगळी रूपं! काही अव्यक्त इच्छांमधून जन्म घेतलेली, तर काही तिच्या स्वभावाशी एकदम विसंगत. या विकारावर आज वैद्यकीय उपचार उपलब्ध आहेत, पण मुळात हा विकार जन्माला कुठून आला, एखाद्याच्या आयुष्यात त्याने काय आणि भोगलं, कितीवेळा आपल्या इच्छाआकांक्षांना मुरड घातली, किती मानसिक क्लेश सोसले, एखाद्या प्रसंगाला सामोरं जाण्याची मानसिक क्षमता त्याच्यात कितपत होती, वेगवेगळे अनुभव झेलण्याचं आणि पचवण्याचं त्याला शिक्षण दिलं गेलं का, असे कितीतरी प्रश्न या अनुषंगाने निर्माण होतात. याची उत्तरं जेव्हा मिळतील तेव्हा अजून बो निर्माण होणार नाहीत याची थोडी का होईना शक्यता निर्माण होईल.
लेखिका: स्मिता जोगळेकर