computer

बोभाटाची बाग : भाग २२ - आज बागेत फेरफटका मारत फुलांवर आधारीत काही गाणी आणि कविता ऐकू या !!

पाऊस संपतच आला आहे, अधूममधून एखादी सर हजेरी लावून जाते पण ती तेवढ्यापुरतीच ! थोडं घराबाहेर डोकावून बघा, सगळीकडे फुलांना बहर आलेला आहे. म्हणून आज आमचाही मूड थोडा वेगळाच आहे. विषय बागेचाच आहे पण नेहेमीप्रमाणे शास्त्रीय माहिती न देता फुलांवर आधारीत काही गाणी आणि कविता यावर आज बोलू या म्हणजे तुमच्याही अलगद लक्षात येईल की आपल्या मनातही एक बाग वर्षानुवर्षं  फुलते आहे.

सुरुवात करू या आपल्या शाळेच्या दिवसांपासून, बालभारतीच्या एका कवितेपासून !

१. रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला

(फोटो सौजन्य: अंजना देवस्थळे)

असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा

आता सोबत असलेले हे चित्र बघा , हे पण एक प्रकारचे गवतफूलच आहे. याचे नाव आहे  ग्रॅहमची सोनकी. सोन्यासारखी पिवळी धमक आहे म्हणून सोनकी हे नाव समजलं पण हा ग्रॅहम कोण ? हा ग्रॅहम ब्रिटीश काळात मुंबईत जनरल पोस्ट ऑफीसमध्ये उच्च पदावर काम करत होता. त्याने आपल्या पश्चिम घाटात फिरून तेथे उगवणार्‍या सर्व वनस्पतींचा अभ्यास केला होता. म्हणून या फुलाचं नाव ग्रॅहमची सोनकी ! दुर्दैवाची गोष्ट अशी की वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी त्याचे निधन झाले.

२.

(फोटो सौजन्य: स्वाती माळी-देशपांडे)

सकाळ झाली आहे. रेडीओवर 'मंगल प्रभात' कार्यक्रम सुरु आहे अशा दिवसांमध्ये  संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेला आणि लता मंगेशकर यांनी गायलेला अभंगानी आपल्याला मंत्रमुग्ध केले होते. 'मोगरा फुलला' ऐकलं नाही आणि आवडलं नाही असा एकही मराठी माणूस नसेल. 

इवलेसे रोप लावियेले द्वारी|तयाचा वेलु गेला गगनावेरी||१||
मोगरा फुलला मोगरा फुलला|फुले वेचिता बहरू कळियासि आला ||२||
मनाचिये गुंति गुंफियेला शेला| बाप रखुमादेवीवरु विठ्ठले अर्पियेला||३||

या अभंगाचा अर्थ लावण्याचा अनेकांनी प्रयत्न केला आहे. इवलेसे रोप म्हणजे शिष्य आणि त्याला मिळालेल्या मार्गदर्शनातून त्याच्या जाणिवेचा पल्ला आकाशाच्या पार गेला आहे. असा काहीसा सर्वमान्य अर्थ समजला जातो. इथे एका शब्द लक्ष देऊन वाचा. गगनावेरी - वेरी म्हणजे असा बिंदू ज्याला आपण आजच्या भाषेत 'इन्फिनिटी' असे म्हणतो. (युट्युब लिंक)

३.

चाफ्याचं फूल तुझ्या कानात । चल गं राधे वनात या ओळी कधीतरी तुमच्या कानावर पडल्या असतील. चाफ्याचे इतके प्रकार बघायला मिळतात की चाफ्याच्या प्रत्येक वेगवेगळ्या रुपावर गीतं लिहिली गेली आहेत. 

त्यापैकी पांढरा चाफा फुलतो तेव्हा झाडावर एकही पान शिल्लक नसतं. एखाद्या नंग्या फकीराने अंगावर दागीने घातल्यासारखे  पांढर्‍या चाफ्याचे झाड दिसते. कदाचित हे दृश्य बघूनच कवि 'बी' यांनी हे गीत लिहिले असेल का ?
 
चाफा बोलेना, चाफा चालेना
चाफा खंत करी, काही केल्या फुलेना

हिरवा चाफा ही वनस्पती आहे सिताफळाच्या जातकुळीतली , सिताफळाची फुलंही हिरवीच असतात. त्यांना गंध नसतो पण  हिरव्या चाफ्याचा सुगंध झाकून ठेवला तरी परिमळत असतो.

ग.दि. माडगूळकरांच्या हिरव्या चाफ्याच्या गीताने अनेकांना कॉलेजमधले दिवस आठवतील.

लपविलास तू हिरवा चाफा
सुगंध त्याचा छपेल का ?
प्रीत लपवुनी लपेल का ?
पुरे बहाणे गंभिर होणे
चोरा, तुझिया मनी चांदणे
चोरहि जाणे, चंद्रहि जाणे
केली चोरी छपेल का ?

सोनचाफ्याची कथा काय सांगावी. हे तर चाफा कुटुंबातील सर्वात देखणं भावंड ! त्याचं रुपडं , त्याचा सुगंध  सगळं काही एकदम खास !  एका गीतात राधेच्या कांतीचा उल्लेख ' सुवर्णचंपक यौवन कांती ' असा आहे. अर्थात सोनचाफ्यावरचा बोभाटाचा हा लेख तुम्ही वाचलाच असेल नाही का ? 

४.

मिलिंद बोकील यांची 'शाळा' वाचली असेल किंवा चित्रपट बघितला असेल त्यांना 'केवडा' आठवत असेलच. केवड्याला केवडा म्हणण्यापेक्षा 'केतकी' हे नाव जास्त शोभून दिसतं आणि केतकी म्हटलं की आठवतं ते हे गीत,
 
केतकीच्या बनी तिथे, नाचला ग मोर
गहिवरला मेघ नभी सोडला ग धीर

ही झाले फुलांवरच्या गाण्याबद्दल पण कविंना कवितेसाठी कोणतेच फुल वर्ज्य नसते. 
जास्वंदाच्या लाल भडक फुलाला देव्हार्‍यापलीकडे एखाद्या गाण्यात किंवा कवितेत जागा मिळणे कठीण आहे असं तुम्हाला वाटतं असेल तर बा.भ.बोरकर यांची ही कविता वाचा . 

जास्वंदीच्या पाच फुलातून
मरण एकदा मला म्हणाले
पहा कसे मी या झाडातून
भरले कोमल रसार्द्र पेले
येशुच्या मज स्मरल्या जखमा....

 
लिलीची फुले ही पु.शि. रेग्यांची कविता वाचा . फारच इमोशनल टाइप असाल तर डोळ्यात पाणी येईल 

लिलीची फुले तिने
एकदा चुंबिता, डोळां
पाणी मी पाहिले....!

लिलीची फुले आता
कधीही पाहता, डोळां
पाणी हे साकळे....!

ज्या सदाफुलीला हिंदी भाषेत ' बेशरम' म्हणून हिणवले जाते त्या सदाफुलीला पण या कवितेत स्थान मिळाले आहे. कवि वसंत बापट यांची कविता वाचा आणि ऐकाही.

अजून त्या झुडुपांच्या मागे
सदाफुली दोघांना हसते
अजून आपल्या आठवणींना
शेवंती लाजवती होते

तसे पाहाया तुला मला ग
अजून दवबिंदू थरथरतो
अर्ध्यामुर्ध्या कानगुजास्तव
अजून ताठर चंपक झुरतो

अजून गुंगीमध्ये मोगरा
त्या तसल्या केसांच्या बासे
अजून त्या पत्यात लव्हाळी
होताच असते आपुले हासे

अजून फिक्कट चंद्राखाली
माझी आशा तरळत आहे
गीतांमध्ये गरळ झोकूनि
अजून वारा बरळत आहे

या सगळ्या फुलांना कुठे ना कुठेतरी जागा मिळाली आहे पण बिचार्‍या झेंडूला कोणत्याच गीतात -पद्यात जागा मिळाली नव्हती. ती उणिव भरून काढली आहे आचार्य अत्रे यांनी ! केशवकुमार या टोपण नावाने त्यांनी झेंडूची फुले हा काव्यसंग्रह लिहिला. त्या संग्रहाच्या अर्पण पत्रिकेत ते म्हणतात.

"बोलूनचालून 'झेंडूची फुले'! यांना वास तरी कसला आणि रंग तरी कसला? मोहक फुलांच्या सुवासासाठी हपापलेली रसिकता या बिनवासाच्या आणि भडक रंगाच्या दरिद्री आहेराचा कसा स्वीकार करणार? उलट तिच्या भावनेची कोमलता दुखावल्याचा उद्धटपणा केल्याचे पाप मात्र पदरी यायचे! तरीपण वाङ्मयाच्यावरातीत कोतवाली घोड्याप्रमाणे पुढे पुढेनाचणार्‍या घोडकवींच्या गळ्यांत सणांसुदीचे दिवशी माळा करून घालायला जरी ही 'झेंडूची फुले'उपयोगी पडली तरी लेखकाला आपल्या श्रमाचेसार्थक झल्यासारखे वाटेल!"

वाचकहो, बोभाटाच्या या लेखात आम्ही 'दिल बाग-बाग' करणार्‍या फारच मोजक्या फुलांच्या कविता आणि गीते यांचा उल्लेख केलाय कारण या कमेंटच्या माध्यमातून तुम्हीही काही फुलांची भर घालावी अशी आमची इच्छा आहे. अगदी उदाहरण द्यायचे झाले तर आंतरजालावर सापडलेला हा संदर्भ वाचा.

सबस्क्राईब करा

* indicates required