computer

बोभाटाची बाग : भाग २३ - या झाडाच्या ८०१ उपयोगावर कविता रचूनही उपेक्षित राहिलेला कल्पवृक्ष !!

आज बोभाटाच्या बागेत आम्ही एका उपेक्षित कल्पवृक्षाची ओळख करून देणार आहोत. आता कल्पवृक्ष म्हटलं की तो उपेक्षित कसा असेल याचे आश्चर्य वाटणे साहजिकच आहे, पण ज्या प्रमाणात या वृक्षाची संख्या दिवसेंदिवस कमी होते आहे त्याकडे बघता त्याला उपेक्षित म्हणायला काहीच हरकत नाही. आम्ही बोलतो आहोत ताडाच्या झाडाबद्दल! एकेकाळी भारतात १० कोटींहून अधिक ताडाची झाडे होती. त्यापैकी ५ कोटी तर फक्त तामिळनाडूत होती. ताड हा माडासारखाच उपयुक्त वृक्ष आहे. उपयुक्त म्हणजे किती? तर त्याचे ८०१ उपयोग वर्णन करणारी एक कविताच तमिळ भाषेत उपलब्ध आहे.

इंग्रजीत भाषेत ताडाला पामीरा म्हणतात तर शास्त्रीय परिभाषेत ताडाचे नाव आहे Borassus flabellifer. एकूण पाच वेगवेगळ्या उपजाती या मध्ये आढळतात. ताड ओळख्ला जातो त्याच्या उंचीमुळे आणि पंख्यासारख्या पानांमुळे! "ताडमाड उंची" या विशेषणात आजही ताड आहे आणि माडही आहे. पण प्रत्यक्षात ताडाची संख्या रोडावते आहे.

माड आणि ताड दोन्ही मूळ एकाच खानदानातले, म्हणजे दोन्हीही 'पाम ट्री' याच वर्गीकरणात मोडतात. पण उपयुक्ततेच्या गरजा जशा बदलत गेल्या तसा ताड मागे पडला. व्यापारी दृष्टीकोनातून बघितले तर ताडात एकच दोष आहे तो म्हणजे ताडाचे परिपक्व फळ अक्षरशः निरुपयोगी असते. गुटख्याचे व्यसन बोकाळल्यावर स्वस्त गुटख्यात सुपारीऐवजी ताडाच्या सुपारीचा वापर केला जायचा. आता तो उपयोगही संपला आहे.

आपल्याला ताड म्हटलं की आठवतात मऊ रसाळ ताडगोळे! अर्थात काहीजणांना ताड म्हटल्यावर ताडी पण आठवेल, तर काहीजणांना ताडगूळ आठवेल. या प्रत्येक पदार्थाच्या उपयुक्ततेला व्यापारी परिमाण न मिळाल्याने ताडाची उपयुक्तता मागे पडत गेली. बदलत्या सामाजिक आर्थिक काळात ताडाची लागवड करण्याचे उद्दिष्टच शिल्लक राहिले नाही. कसे ते बघा!

कागदाचा शोध लागला नव्हता तेव्हा सगळे लिखाण ताडाच्या पानांवर केले जायचे. कागद आला, पानांचा उपयोग संपला. एकेकाळी घरावरचे छप्पर ताडाच्या झावळ्यांचे असायचे, आता त्याच छप्पराची जागा नळीच्या पत्र्यांनी घेतली. ताडांच्या झावळ्या बाद झाल्या. खोडाचा वापर खांब किंवा आधार म्हणून व्हायचा, त्याची जागा लोखंडी पाइप आणि अँगलने घेतली. मऊ गोड ताडगोळे टिकवून ठेवण्याच्या प्रक्रिया निर्माण झाल्याच नाहीत.

ताडापासून मिळणारी नीरा हे उत्कृष्ट आरोग्यवर्धक पेय आहे. नीरेचा एक गुणधर्म असा आहे की थोडे ऊन वाढले की नीरेची चव बदलते. सकाळचे आरोग्यवर्धक पेयाचे दुपारपर्यंत मदित म्हणजे ताडीत रुपांतर होते. ताडीला पण उत्तेजक पेयांच्या बाजारात स्थान बनवता आले असते का नाही? जर फ्रान्समधल्या शँपेन प्रांतात द्राक्षापासून बवली जाणारी शँपेन, रशियात बटाट्यापासून बनलेली व्होडका जागतिक बाजारात आपले स्थान बनवू शकतात तर ताडीला पण अशी ओळख मिळू शकली असती. परंतु ताडीची ओळख गरीबांचे पेय अशीच असल्याने ताडीवर संस्करण करून त्याचा 'ब्रँड' बनवण्याचे श्रम कोणीही घेतले नाहीत. पुढच्या काळात साखरेच्या कारखान्यात स्वस्त देशी मोसंबी-संत्री दारु तयार व्हायला लागल्यावर तर या प्रश्नाची उकल करण्याचे कोणाच्याही डोक्यात आले नाही.

ताडावर मोठा अन्याय केला असेल तर तो साखरेच्या उत्पादनाने! ताडाच्या झाडापासून अत्युत्कृष्ट दर्जाचा गूळ बनवता येतो. एकेकाळी साखर नव्हती तेव्हा हा गूळच वापरला जायचा. ब्रिटिशांनी मॉरिशसला साखरेचे कारखाने सुरु केले आणि त्या साखरेचे मार्केटिंग भारतात केले. 'मोरस' साखर भारतात आली आणि ताडगूळाचे महत्व संपले. साखरेची शुभ्रता ताडगूळात नसते त्यामुळे साखरेने ताडगूळाचा बाजार संपवून टाकला. आता कालचक्र पुन्हा उलटे फिरले आहे. ताडगूळाची मागणी वाढली आहे, पण आता ताडगूळ मिळतच नाही. खादी आयोगाने काही प्रमाणात अनुदान दिल्याने खादी भांडारात कधी कधी ताडगूळ मिळतो इतकेच काय ते मार्केट आता शिल्लक आहे.

(ताडगूळ)

साखरेमुळे आणखी एक सामाजिक परिणाम पण झाला. तो असा की ताडावर चढणारी माणसं आता मिळेनाशी झाली आहेत. उदाहरणार्थ, तमिळनाडूत हे काम 'नाडर' जातीचे लोक करायचे. ते आता इतर राज्यात गेल्याने ताडी आणि ताडगूळ बनवणार कोण असा प्रश्न आहे. नाही म्हणायला बंगालमध्ये अजूनही ताडगूळाची निर्मिती होते. पण त्याचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी सरकारी यंत्रणा नाही.

या आणि अशा इतर अनेक कारणाने एकेकाळी ८०१ वेगवेगळ्या प्रकाराने वापरला जाणारा हा कल्पवृक्ष आता निरुपयोगी झाला आहे. त्याची कत्तल तोड सर्वत्र सुरु आहे. कदाचित पुढच्या काही वर्षांत त्याची दुर्मिळ वनस्पतीत गणना होईल. आपला शेजारच्या देशात, श्रीलंकेत ताडाचा पूर्णपणे उपयोग केला जातो. इतकेच नव्हे, तर ताडाची तोड करणार्‍याला सश्रम कारावासाची सजा दिली जाते. मलेशिया-इंडोनेशिया या दोन्ही देशांत ही 'पाम संस्कृती' जपल्याने तेथे पाम या विषयावर बरेच संशोधन झाले आहे. परिणामी त्याचा थेट फायदा ताडाला झाला नसला तरी ताडासारख्याच दुसर्‍या प्रजातीतून मिळणार्‍या तेलावर म्हणजे पाम तेलावर आज जग अवलंबून आहे. हे सगळे भारतात पण घडू शकले असते.

तुमच्या भवतालात ताडांची झाडे असतील तर त्यांची काय स्थिती आहे? ताडगोळे मिळतात का? ताडगूळ बनवला जातो का? आम्हाला नक्की सांगा!

सबस्क्राईब करा

* indicates required