computer

बोभाटाची बाग - भाग १९ : जागतिक बांबू दिनाच्या निमित्ताने बांबूची लागवड, फायदे आणि सरकारी योजना जाणून घ्या!!

बोभाटाच्या बागेत आज आपण एक विशेष दिवस आपण साजरा करणार आहोत. या खास दिवसाचे नाव आहे 'जागतिक बांबू दिवस'! जन्माला आल्यावर ज्या पाळण्यात आपण सुखाची निद्रा घेतो त्या घडीपासून शेवटी चिरनिद्रेची घडी येईपर्यंत बांबू आपल्या सोबत असतो. हजारो वर्षं बांबूने आपल्याला साथ दिली आहे, पण पहिला जागतिक बांबू दिवस १८ सप्टेंबर २००९ साली साजरा करण्यात आला. यावर्षी आपण ११ वा बांबू दिवस साजरा करणार आहोत. याचे श्रेय एका भारतीयाकडे जाते, ज्यांचे नाव आहे कामेश सलाम! २००९ साली बँकॉक येथे भरलेल्या इंटरनॅशनल बांबू काँग्रेसमध्ये त्यांनी हा प्रस्ताव मांडून मंजूर करून घेतला. याच क्षेत्रात अभिमानाने घ्यावे असे दुसरे भारतीय नाव म्हणजे आय. व्ही. रामानुजा राव. हे राव वर्ल्ड बांबू ऑर्गनायझेशन या आंतरराष्ट्रीय संस्थेचे संस्थापक सदस्य आहेत.

भारतात काश्मीर वगळता सर्व राज्यात बांबू उगवतो, वाढतो, वापरला जातो. एकेकाळी गरीबांचा साग म्हणून हिणवला गेलेला बांबू म्हणजे 'ग्रीन गोल्ड' आहे याची जाणीव आता हळूहळू सार्वत्रिक होते आहे आणि अनेक सरकारी योजनांच्या माध्यमातून बांबू शेती करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते आहे. आजच्या लेखात आज आपण बांबूची वनस्पती म्हणून ओळख तर करून घेणारच आहोत, सोबत काही योजनांची माहिती पण करून घेणार आहोत.

बांबू जलदगतीने वाढणारी, सदाहरित व आयुष्मान वनस्पती आहे. खरं सांगायचं तर बांबू म्हणजे गवतच आहे. संपूर्ण जगात बांबूच्या १२०० अधिक प्रजाती आहेत. त्यापैकी १२८ प्रजाती भारतात आहेत. महाराष्ट्रात ८४०० चौ. किमीचे वनक्षेत्र बांबूने व्यापले आहे. बांबूच्या उत्पादनाचे बाजारमूल्य तब्बल २८००५ कोटी रुपयांचे आहे.

गवत असल्या कारणाने बांबूची वाढ आणि प्रसार पण गवतासारखाच असतो. पावसाचे दोन आठवडे झाले की जमिनीत असलेल्या बांबूच्या कंदातून रोप जन्माला येते आणि पुढच्या ५०/६० दिवसात त्याची वाढ पूर्ण होते. असे बांबू वापरण्यायोग्य होण्यासाठी साधारण तीन वर्षे जातात. असे असले तरी बांबूचे जीवनचक्र ४० ते १०० वर्षांचे असते. त्यामुळे शेतकर्‍याला शाश्वत उत्पन्नाची हमीच असते.

दुसरा महत्वाचा मुद्दा असा की पावसाच्या कमी जास्त होणार्‍या प्रमाणाने इतर शेतीचे जसे नुकसान होते तसे बांबूच्या बाबतीत होत नाही.

अमुकप्रकारची, नदी काठाची, काळ्या मातीची जमीनच लागवडीसाठी असावी असा बांबूचा हट्ट नसतो. पाणथळ जमिनीवर, क्षारयुक्त जमिनीवर, अगदी मुरमाड जमिनीत पण बांबूची लागवड यशस्वीरित्या होऊ शकते. थोडक्यात सांगायचं तर प्रतिकूल परिस्थितीत पण वाढणारे -जगण्याची चिवट्ट इच्छा असलेले हे गवत आहे. साहजिकच देशाच्या प्रत्येक भागात बांबूची वने पहायला मिळतात. 

महाराष्ट्राचा विचार केला तर विदर्भात कटांग, तर कोकणात माणगा बांबू मोठ्या प्रमाणात आढळतो. त्याखेरीज बांबूच्या ५ जाती आपल्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. या प्रजाती अशा :

१. बालकुवा किंवा भिमा

२. ब्रँडीसी

३. टुल्डा

४. अ‍ॅस्पर

५. नुटन

आता बांबूच्या आयुष्यातील एक करुण घटना पण सांगतो. इतर वनस्पतींना फुलोरा येणं ही आनंदाची बाब असते, पण बांबूचा फुलोरा म्हणजे त्याचे आयुष्य संपल्याची मृत्युघंटा असते. बांबू फुलला की काहीच दिवसांत बांबूच्या बेटाचे आयुष्य संपते. 

बांबूची रोजच्या जीवनातील उपयुक्तता अमर्यादित आहे. बांबू पल्प - फर्निचर -बांबू मॅट्स, प्लाय बोर्ड हे औद्योगीक क्षेत्रातील मोठे उपयोग वगळता गृह सुशोभीकरणासाठी बांबूचा उपयोग दिवसेंदिवस वाढतो आहे. काही कलाकारांनी तर बांबूपासून दागिनेही बनवले आहेत. (फोटो पहा)

आता आपण वळू या बांबूच्या अर्थव्यवहाराकडे!! 

बांबूपासून किती उत्पन्न होईल हे सर्वस्वी त्याची लागवड करणार्‍या शेतकर्‍याच्या व्यावसायिक कौशल्यावर अवलंबून आहे. तरीही या उत्पन्न्नाचा अंदाज येण्यासाठी डॉ. हेमंत शांताराम बेडेकर या बांबूतज्ञांचे "उद्योगासाठी बांबू शेती" हे पुस्तक वाचावे. बोभाटाच्या विनंतीला मान देऊन त्यांनी त्यांचा संपर्काचा मोबाईल नंबर देण्याची आणि वाचकांच्या प्रश्नाची उत्तरे देण्यास अनुमती दिली आहे.

डॉ. हेमंत शांताराम बेडेकर-९७६७२००९०५. 

याखेरीज अधिक माहितीसाठी "बांबू लागवड" लेखक अजित ठाकूर 

बांबू भारताचे हरित भविष्य -लेखिका योगिता वैद्य 

बांबू वनशेती- लेखक श्रीकांत थत्ते 

बहुगुणी बांबू -श म केतकर

ही पुस्तके वाचणे, अभ्यासणे अत्यावश्यक आहे.

गेल्या काही वर्षात सरकारी यंत्रणेमार्फत बांबूची लागवड करणार्‍या शेतकर्‍यांसांठी सरकारने अनेक पाऊले उचलली आहेत. या योजनांची व्याप्ती इतकी मोठी आहे की एका लेखात ती सांगणे कठीण आहे, तरीपण काही महत्वाचे टप्पे आपण बघू या. 

१. राष्ट्रीय बांबू अभियान (नॅशनल बांबू मिशन) च्या अंतर्गत कोणत्याही व्यक्तिला अथवा संस्थेला बांबूच्या लागवडीसाठी प्रथम वर्षात ५०% दुसर्‍या वर्षी ३० टक्के तर तिसर्‍या वर्षी २० टक्के अनुदान देण्यात येते.

२. २०१६ साली महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र बांबू विकास मंडळाची स्थापना केली आहे. बांबूच्या लागवडीसाठी 'टिश्यू कल्चर' सवलतीच्या दरात पुरवण्याचे काम 'अटल बांबू समृध्दी योजने'अंतर्गत करण्यात येते

३. लागवडीसाठी देण्यात येणार्‍या अनुदानाव्यतिरिक्त बांबूचे मूल्य संवर्धन करण्यासाठी पण विशेष अनुदान देण्यात येते.

४. बांबूच्या लागवडीत एक मोठा अडथळा म्हणजे बांबूच्या वाहतूकीसाठी लागणारा परवाना! आधी वनक्षेत्रात उगवणार्‍या बांबूची वाहतूक विना परवाना होत नसे, कारण ब्रिटिश जमान्यातल्या कायद्याप्रमाणे बांबूचे वर्गीकरण वॄक्ष असे करण्यात आले होते. केंद्र शासनाने २०१७  साली वन नियमात आवश्यक ते बदल केले. परिणामी खाजगी क्षेत्रातील बांबूच्या वाहतूकीला आता परवान्याची गरज नाही. 

५. बोभाटाचे वाचक आणि इतर इच्छुक शेतकर्‍यांच्या सोयीसाठी 'महाराष्ट्र बांबू विकास' मंडळाचे समन्वयक श्री. भास्कर पवार यांचा संपर्काचा नंबर येथे देत आहोत. 

श्री. भास्कर पवार - ९०११२१२५२५

बांबू या विषयावर बरेच काही लिहिण्यासारखे आहे, पण बोभाटाची बाग या सदराची मर्यादा लक्षात घेऊन आज आपण इर्थेच थांबतो आहे. आपल्या सर्वांना जागतिक बांबू दिनाच्या शुभेच्छा!!

सबस्क्राईब करा

* indicates required