computer

कोरोनाव्हायरसवर उपाय म्हणून दारू प्यायले, पण त्यामुळं उपाय झाला की अपाय?

कोरोनाव्हायरस आल्यापासून लोकांनी आपल्या परीने उपचार शोधले आहेत. कोणी म्हणतंय की लसूण खा तर कोणी म्हणतंय की प्रत्येक १५ मिनिटांनी पाणी प्या. एक अफवा तर अशी पसरली की द्रव स्वरूपातील चांदी असलेलं प्यायल्याने कोरोनाव्हायरसचा आजार कमी होतो. यातील एकही उपाय वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेला नाही.

आज हे सांगण्याचं कारण असं की इराणमध्ये अशाच एका अफवेने ४४ जणांचा जीव घेतला आहे.

हा लेख लिहित असताना इराणमध्ये कोरोनाव्हायरसमुळे २३७ लोकांचा बळी घेतला होता. चीननंतर कोरोनाव्हायरसच्या बळीमध्ये इराणचा दुसरा क्रमांक लागतो. परिणामी इराणी लोकांमध्ये कोरोनाव्हायरसच्या उपायांसाठी अफवा पसरत आहेत. नुकतंच इराणमध्ये अशी अफवा पसरली, की दारू प्यायल्याने कोरोनाव्हायरस बरा होतो. या अफवेमुळे इराणच्या नैऋत्य भागात असलेल्या झुजेस्थान आणि उत्तरेतील अल्बोर्झ भागातील २७ नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. आता तुम्ही म्हणाल की दारूने जीव कसा गेला. तर, या दारूत मोठ्याप्रमाणात मिथेनॉल होतं.

स्वस्तातली दारू बनवण्यासाठी बरेचदा मिथेनॉलचा वापर केला जातो. मिथेनॉल हा अल्कोहोल म्हणजे इथेनॉलप्रमाणेच असतो पण त्यात विषारी घटक असतात. आपल्याकडे अशा दारूला कोंबडी, खोपडी दारू, लठ्ठा अशी वेगवेगळी नावे आहेत. आपल्या महाराष्ट्रात कर्जत, खालापूर भागात ७० च्या दशकात खोपडी दारूने ४० जणांचा जीव घेतला होता. खालापूरमध्येच १९९२-९३ साली २१ जणांचा मृत्यू झाला. आपल्याकडे मिथेनॉलच्या बळींची मोठी यादीच देता येईल. यातील सर्वात ताजं उदाहरण म्हणजे २०१५ सालचं मालाड येथील दारूकांड. मालवणी भागात हातभट्टीची दारू प्यायल्याने १०३ लोकांचा मृत्यू झाला होता.

तर मंडळी, सांगण्याचा उद्देश इतकाच की कोरोनाव्हायरस किंवा कोणतीही समस्या असली तरी अफवांवर विश्वास ठेऊ नका. उपाय फसला तर जीव जाऊ शकतो.