वऱ्हाडींनी आहेर नाही आणला म्हणून तिने रद्द केलं लग्न...काय होता आहेर माहित आहे का ?
समजा तुम्हाला एका शानदार लग्नाचं आमंत्रण आलं, पण त्यात "आपली उपस्थिती हाच आहेर" असं न म्हणता तुम्हाला येताना १५०० डॉलर्स (जवळजवळ १,००,००० रुपये) आणावे लागतील असं लिहिलं असेल, तर तुम्ही त्या लग्नाला जाल का? अर्थात नाही जाणार ना राव.. आपण दुसऱ्यांच्या अतिथाटामाटातच्या लग्नासाठी आपण का खर्च करावा?

असंच काहीसं घडलं सुझॅन सोबत. सुझॅनला तब्बल ६०,००० डॉलर्स खर्च करून अलिशान लग्न करायचं होतं. पण गंमत अशी आहे की तिला हा अव्वाच्या सव्वा खर्च पाहुणे मंडळींकडून वसूल करायचा होता. मग तिने मित्रांना आणि नातेवाईकांना सांगितलं की आहेर म्हणून १५०० डॉलर्स आणायलाच पाहिजे हं. सुझॅनने तर असं स्पष्ट म्हटलं होतं की पैसे असतील तर यायचं नाही तर नाही.
पण दुर्दैवाने तिचा प्लान फसला ना राव. फक्त ८ मंडळींनी तिला पैसे दिले. आश्चर्य म्हणजे यात तिच्या पूर्वीच्या बॉयफ्रेंडच्या घरचे लोक सुद्धा होते. त्यांनी तर चक्क ३००० डॉलर्स दिले. का दिले ते विचारू नका !! तिने क्राउड फंडिंगसाठी ‘GoFundMe’चे दार ठोठावले, पण तिला तिथे फक्त २५० डॉलर्सपेक्षा जास्त मदत मिळाली नाही.

काही केल्या हवे तेवढे पैसे जमले नाहीत म्हणून तिने लग्नाच्या अवघ्या ४ दिवसांपूर्वी लग्नच रद्द केलं. तिच्या होणाऱ्या नवऱ्याने आपण साधंसुधं लग्न करूया म्हणून तिला समजावल्यावर तिने त्याची आयडिया धुडकावून लावली. बिचारा !! तिला ज्यांनी ज्यांनी पैसे देतो म्हणून ऐन वेळेवर तोंडघशी पाडलं त्या सगळ्यांना तिने ‘शिव्या’ दिल्या आहेत.
लग्न कॅन्सल केल्यावर तिने या सर्वांचा समाचार घेण्यासाठी फेसबुक पोस्ट तयार केली. या पोस्ट मध्ये तिने मनातला सगळा राग काढला आहे.

तिचं म्हणणं आहे की आमचं प्रेम हे एखाद्या परीकथेप्रमाणे आहे. त्यामुळे आम्हाला लग्नसुद्धा परीकथे सारखं अविस्मरणीय करायचं होतं. यासाठी लागणाऱ्या खर्चाला आम्हाला थोडीशी मदत हवी होती. आम्ही दोघांनी मित्रांना आणि नातेवाईकांना सांगितलं होतं की फक्त (?) १५०० डॉलर्स द्या. एवढं भव्यदिव्य लग्न काय रोज रोज थोडीच होतं. नाय का ? तिच्याच भाषेत सांगायचं झालं १५०० म्हणजे काय आहे ? अगदी क्षुल्लक रक्कम आहे !!
This is the best thing I've ever read. pic.twitter.com/tLQ4HEmpYA
— I write for ClickHole (@grumpstorm) August 25, 2018
राव, एक तर सांगायचं राहूनच गेलं. हे सगळं लिहून फेसबुकवर शेअर करताना ती पिऊन टुन्न होती. अशावेळी सगळा राग निघणं स्वाभाविक आहे ना राव.
या सर्वांचा शेवट लग्न रद्द करण्यात तर झालाच. पण तिने होणाऱ्या नवऱ्याला लग्नाआधीच सोडचिट्ठी दिली. इतर लोक करतात तशा साध्या लग्नाची आयडिया देणारा नवरा कसा चालेल ??
तर सुझॅनचं लग्न होऊ शकलं नसलं तरी सोशल मिडीयाला काही दिवसांसाठी चांगलं कुरण मिळालंय.




