computer

१२ विद्यार्थ्यांपासून ते २,५०,००० विद्यार्थ्यांपर्यंतचा प्रवास...'आकाश इन्स्टिट्यूट'च्या निर्माणाची कथा !!

काळाच्या ओघात शिकण्याच्या पद्धती बदलल्या आहेत. खूप पूर्वी म्हणजे अगदी जुन्या मराठी सिनेमात झाडाखाली किंवा एखाद्या मंदिरात एकाचवेळी दोन-चार वर्ग भरायचे आणि आता मोबाईल-लॅपटॉपवर शाळा भरत आहेत. गेल्या काही दशकांत शिकवण्या किंवा क्लासेसही शाळांइतक्याच महत्त्वाच्या झाल्या आहेत. काही वर्षांपूर्वी चाटे क्लासेसचा दबदबा होता, आता नावं बदलली असली तरी शाळेइतकंच महत्त्व या कोचिंग क्लासेसना आहे. सुपर ३० किंवा कोटा फॅक्टरी पाह्यली असेल तर तुम्हांलाही हे जाणवलं असेलच म्हणा!! 

पण पाहायला गेलं तर कोचिंग इन्स्टिट्यूट हा शिक्षक आणि प्रशिक्षक यांतील फरक स्पष्ट करणारा पर्याय. अनेक कोचिंग क्लासेसच्या जाहिराती आणि कॅप्शन्स हेच सुचवतात. आज आम्ही तुम्हांला अशाच एका कोचिंग इन्स्टिट्यूटच्या जन्माची कथा आणि नावाप्रमाणेच sky is the limit ही सिद्ध केलेली यशोगाथा सांगणार आहोत. हे कोचिंग इन्स्टिट्यूट आहे 'AESL' अर्थात 'आकाश एज्युकेशनल सर्विसेस लिमिटेड'. या कोचिंग इन्स्टिट्यूटच्या शाखा व फ्रँचायजींचे जाळे आज भारतभर पसरले आहे. सर्व कोचिंग क्लासेसच्या भाऊगर्दीत हेच क्लासेस बोभाटाने का निवडले? कारण हे क्लासेस आज ट्रेंडिंग न्यूजमध्ये आहेत. 'बायजू'ज' सारख्या शिक्षणक्षेत्रातल्या आघाडीची कंपनीने ही कोचिंग इन्स्टिट्यूट तब्बल $1 बिलियन डॉलर देऊन टेक-ओव्हर केल्याची बातमी आज सगळीकडे झळकत आहे. 

प्रत्येक क्षेत्रात वाढलेल्या स्पर्धेमुळे पालकांचा आपल्या पाल्यांवर वाढत चाललेला दबाव हा खरंतर इन्स्टंट एज्युकेशन अर्थात कोचिंग क्लासेसचा फुगवटा वाढण्याचे कारण. हेच कारण कॅश करत नवनवीन शिक्षणप्रणाली विकसित करून आकाश एज्युकेशनल सर्विसेसच्या फाऊंडर जगदिशचंद चौधरी यांनी एक नवा पर्याय निर्माण केला आहे. कोण आहेत हे जगदिशचंद चौधरी? आणि काय स्टोरी आहे आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेसच्या निर्माणामध्ये?

जगदिशचंद चौधरी हे मूळचे हरयाणातील सेवली गावचे. लहानशा गावातला जन्म असला तरी मोठी स्वप्न बघण्यापासून आणि ती पूर्ण करण्यापासून त्यांना कोणीही अडवू शकलं नाही. १९८० च्या मध्यापर्यंत शैक्षणिक क्षेत्रातील शिक्षक म्हणून कार्यरत असताना आलेल्या अनुभवावरून चौधरी यांच्या लक्षात आले की स्पर्धा परीक्षा, मेडीकल किंवा इंजिनिअरिंग साठीच्या पात्रता परिक्षा यांच्यासाठी कुठेही वेगळे मार्गदर्शन करणारे असे क्लासेस नाहीत. त्यामुळे अनेक विद्यार्थी प्रवेश मिळण्यापासून वंचित राहतात. तेव्हा अशा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रशिक्षण मिळाले तर ते नक्कीच यश मिळवू शकतील. यातूनच जन्म झाला दिल्लीतील जनकपुरी भागातील एका लहानशा खोलीतल्या केवळ १२ विद्यार्थी असलेल्या 'आकाश इन्स्टिट्यूट' चा!!

स्वप्नं बघणाऱ्यांसाठी 'स्काय इज द लिमिट' याच उक्तीनुसार चौधरी यांनी आपल्या कल्पक आणि अभिनव आयडिऑलॉजीला मूर्तस्वरूप आणले. केवळ मेडिकल एन्ट्रन्स (NEET) नव्हे तर इंजिनियरींग एन्ट्रन्स (JEE), (IIT) (UPSE) तसेच स्थानिक स्पर्धा परिक्षा यांसाठीही त्यांनी मार्गदर्शन व तयार स्टडी मटेरीयल द्यायला सुरवात केली. त्यांच्या पहिल्या १२ विद्यार्थ्यांपैकी ७ विद्यार्थ्यांनी मेडिकल प्रवेश परिक्षा पास केली आणि हा चमत्कार सगळीकडे वाऱ्यासारखा पसरला. नंतर वाढत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येसोबत इन्स्टिट्यूटच्या शाखाही हळूहळू दिल्ली, हरयाणा,रांची, कोलकता इ. ठिकाणी सुरू झाल्या. आजघडीला इन्स्टिट्यूटच्या २०० शाखा असून त्यातून जवळपास २,५०,००० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. 

२००६ मध्ये हॉवर्ड बिझनेस स्कूलचा ग्रॅज्युएट असलेला चौधरी यांच्या मुलाने आकाशने इन्स्टिट्यूटचे काम बघायला सुरवात केली. अर्थातच तेव्हा आणखी नवनवीन कल्पना राबवण्यात येवू लागल्या. त्यातलीच एक नाविन्यपूर्ण कल्पना म्हणजे ऑनलाईन क्लासरूमस किंवा ओम्नी क्लासेस. येत्या बदलांना सामोरंं जाताना आकाश इन्स्टिट्यूटने ही नवे रूप धारण केले. आज 'आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड' एक IPO कंपनी आहे. या कंपनीचे भागभांडवल व वार्षिक नफा काही कोटींच्या घरात आहे. आकाशचा ऑनलाईन क्लासरूमचा उपक्रम विद्यार्थी आणि पालकांंमध्ये लोकप्रिय ठरला आहे. या आणि अशा अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या जोरावर आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस नित्यनवीन योजना आपल्या विद्यार्थ्यांसाठी राबवत आहे. सध्याच्या काळात ऑनलाईन शिक्षणाला पर्याय नाही. काळाची ही गरज ओळखून आकाशने ऑनलाईन शिक्षणपद्धतीवर लक्ष केंद्रित करायचे ठरवले आहे आणि सर्व प्रकारच्या शैक्षणिक शाखांना ऑनलाईन कोचिंग देणे हे आकाशचे ध्येय आहे. आतातर बातमी अशी आहे की बायजू ने 'AESL' टेक-ओव्हर केली आहे आणि जे.सी. चौधरी व आकाश चौधरी हे दोघेही नव्या व्हेंचरच्या कार्यकारीणीत असतील.

आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड हे एका बॉटनी शिकवणाऱ्या तसेच संख्याशास्त्रावर पुस्तक लिहिणाऱ्या आणि वास्तूशास्त्राचा अभ्यासक असलेल्या शिक्षकाचे बिलियन डॉलर स्वप्न आहे.  बदलत्या शिक्षणप्रवाहाची गरज ओळखून त्यानुसार कोचिंग क्लासच्या माध्यमातून या शिक्षकाने स्वतःची शिक्षणप्रणाली विकसित केली आणि आज ही कंपनी यशाच्या शिखरावर उभी आहे. आज टेक-ओव्हर होण्याची बातमी चर्चेत आहे, उद्या दुसरी काही वेगळी चांगली बातमी आपल्याला या कोचिंग इन्स्टिट्यूटबद्दल वाचायला मिळेल.  बातमी काही असली तरी कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून, काळाची पावलं ओळखत वाटचाल केलेल्या एका शिक्षकाची स्वप्नवत वाटणारी यशोगाथा नक्कीच भुवया उंचावणारी आणि स्वप्नं बघणाऱ्यासाठी SKY IS THE LIMIT हे सिद्ध करणारी आहे हे निश्चित!

सबस्क्राईब करा

* indicates required