दोन देशांच्या सीमावादातून व्हिस्की युद्ध कसं सुरु झालं? हा किस्सा वाचाच !!

शीतयुद्ध, महायुद्ध, आण्विक युद्ध, जैविक युद्ध सारखी नावं तर इतिहासात तुम्ही वाचली असतीलच, पण कधी व्हिस्की युद्ध ऐकलंय का? काही ऐतिहासिक घटना या इतिहासाच्या पुस्तकाच्या बाहेर ठेवल्या जातात, हे त्यातलंच एक प्रकरण. व्हिस्की युद्ध आजही जगातल्या दोन महत्त्वाच्या देशांमध्ये लढलं जात आहे आणि आता हे युद्ध बंद होण्याच्या मार्गावर आहे.
पण आधी हे युद्ध काय आहे आणि ते दोन देश कोणते आहेत हे समजून घेऊया.
आर्क्टिकच्या अगदी उत्तरेला अर्धा चौरस मैल लांबीचं अगदी लहानसं बेट आहे. या बेटाचं नाव 'हान्स आयलंड'. हे बेट निर्मनुष्य आहे, तिथे नैसर्गिक संसाधनंही नाहीत. आता कसंही असलं तरी ती जमीन आहे आणि जमीन म्हटलं की जमिनीच्या संदर्भातली भांडणं आलीच. हान्स बेट हे अशा जागी आहे जिथे भांडण होणं हमखास शक्य आहे.
तर, कॅनडा आणि डेन्मार्कचा स्वायत्त प्रदेश असलेल्या ग्रीनलंडमध्ये नर्स स्ट्रेट नावाचा २२ मैल लांबीचा पाण्याचा पट्टा आहे. हान्स बेट हे या जलमार्गाच्या अगदी मधोमध आहे. आंतरराष्ट्रीय कायदा म्हणतो की कोणताही देश आपल्या समुद्रकिनाऱ्यापासून १२ मैल (१९.३१२१) अंतरापर्यंतच्या जागेवर दावा करू शकतो. आता हान्स बेट हे ग्रीनलंड आणि कॅनडा दोन्ही देशांच्या १२ मैल लांबीच्या पट्ट्यात येत असल्याने या दोन्ही देशांचा या जागेवर दावा सुरु आहे आणि परिणामी दोन्ही देश भांडत आहेत.
या भांडणाचं रुपांतर व्हिस्की युद्धात कसं झालं हे जाणून घेण्यापूर्वी यामागची पार्श्वभूमी जाणून घेऊया.
१९३३ साली आंतरराष्ट्रीय न्यायदानासाठी तयार केलेल्या ‘Permanent Court of International Justice’ न्यायालयाने हान्स बेटाचा ताबा ग्रीनलंडकडे म्हणजे डेन्मार्ककडे दिला होता. पण पुढच्या काळात ‘Permanent Court of International Justice’ बरखास्त झाल्यामुळे हा न्यायही निकालात निघाला.
त्यानंतरचा काळ आणि १९३९ ते १९४५ सालच्या महायुद्धाचा काळ शांततेचा होता. हान्स बेटाबाबत दोन्ही देश मूग गिळून गप्प होते. पण शीतयुद्धाच्या टोकाच्या काळात म्हणजे ९० च्या दशकात हान्स बेटाचा मुद्दा पुन्हा वर आला.
व्हिस्की युद्ध
१९८४ साली कॅनडाचे काही नागरिक हान्स बेटावर गेले आणि त्यांनी तिथे कॅनडाचा झेंडा रोवला. सोबत एक व्हिस्कीची बॉटल देखील ठेवली. याला उत्तर म्हणून डेन्मार्कचे ग्रीनलंड भागाचं कामकाज पाहणारे मंत्री हान्स बेटाला भेट द्यायला गेले. त्यांनी कॅनडाचा झेंडा काढून डेन्मार्कचा झेंडा रोवला आणि झेंड्याच्या खाली एका चिठ्ठीवर लिहिलं “डॅनिश बेटावर स्वागत आहे.” त्यांनी चिठ्ठी सोबत ब्रँडीची बॉटल देखील ठेवली. इथूनच व्हिस्की युद्धाला सुरुवात झाली.
दोन्ही देशांची भांडणं चालूच राहिली पण या भांडणाचं स्वरूप फारच मजेशीर होतं. जेव्हा कॅनेडियन सैनिक हान्स बेटावर जायचे तेव्हा ते स्वतः सोबत आणलेली व्हिस्कीची बॉटल बेटावर ठेवायचे, सोबत ‘कॅनडियन बेटावर स्वागत आहे’ अशी चिठ्ठीही सोडून यायचे. डेन्मार्कचे सैनिकही हेच करत होते.
जागेबाबतची भांडणं अनेक वर्ष रखडतात, न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत माणसं एकमेकांचा खून पाडतात, युद्ध होतात, पण या दोन देशांनी हा प्रश्न फारच हलक्याफुलक्या पद्धतीने सोडवला आहे. लवकरच हान्स बेटाला सामाईक प्रदेशाचा दर्जा मिळणार आहे. याचा अर्थ दोन्ही देश एकत्र येउन हा प्रदेश सांभाळतील.
जमिनीची भांडणं एवढ्या सहज सुटली तर कित्येक लोकांचे प्राण वाचतील. बरोबर ना?