कॅनेडियन माणसाने ७५,५५४ किलोमीटरचा प्रवास करून ११ वर्षांत पृथ्वी पालथी घातली आहे? वाचा त्याच्या प्रवासाचा लेखाजोखा !!

रोजच्या कंटाळवाण्या रुटीनमधून एक ब्रेक घेऊन मस्तपैकी बॅग पॅक करून खांद्यावर टाकावी आणि वाट फुटेल तिकडे निघावं असं भन्नाट स्वप्न आपल्यापैकी अनेकांनी बरेचदा पाहिलं असेल. भटकण्याची, नवनवीन जागांना भेट देण्याची, अनेक हटके वाटणाऱ्या गोष्टी करून पाहण्याची, वेगवेगळ्या माणसांना भेटण्याची, त्यांच्याशी बोलण्याची, त्यांच्या चालीरीती आणि संस्कृती समजून घेण्याची आवड असलेले अनेकजण वर्षातून किमान एकदा असा छोटासा ब्रेक घेतातच. यातही काही साहसी वीर कधी सायकल, तर कधी बाईक तर कधी चक्क पायी मोठ्या प्रवासाचे बेत करतात. अशाच एका अवलियाने जगावेगळं स्वप्न पाहिलं - पायी जगप्रदक्षिणा करण्याचं.
जॉन बोलेव्हो त्याचं नाव. त्याने पायी चालत सुमारे ७५,००० किलोमीटर एवढा प्रवास केला, त्यासाठी त्याला तब्बल ११ वर्षं घरदार, कुटुंब, मुलंबाळं, नातवंडं यांपासून दूर राहावं लागलं. या प्रवासात त्याने दक्षिण आफ्रिकेतल्या तुरुंगात रात्री झोपण्यासाठी आसरा घेतला, ग्वाटेमालामधल्या खतरनाक गुंडांशी मैत्री केली आणि टोकाच्या वातावरणीय बदलांचाही सामना केला. या प्रवासाचा अगदी तांत्रिक तपशीलच पाहायचा तर तो असा आहे-
जॉन बोलेव्होचा ११ वर्षांचा जगप्रवास
एकूण पालथे घातलेले देश : ६४
कापलेलं अंतर : ७५,५५४ किलोमीटर
प्रवासादरम्यान तो ज्यांच्या ज्यांच्या सोबत राहिला अशा कुटुंबांची संख्या : १६००
वापरलेल्या शूजचे एकूण जोड : ५४
एकूण कालावधी : ११ वर्षं २ महिने
प्रवासाला सुरुवात करतानाचं त्याचं वय : ४५ वर्षं
निघण्याची तारीख : १८ ऑगस्ट, २०००
मार्ग : मॉंट्रियल > ब्राझील > द. आफ्रिका > इजिप्त > मोरोक्को > युरोप (पोर्तुगाल, स्पेन, फ्रान्स, आयर्लंड, स्कॉटलंड, इंग्लंड, जर्मनी) > तुर्कस्थान > इराण > भारत > चीन > जपान > तैवान > बोर्नियो > जावा > ऑस्ट्रेलिया

पण मुळात हे असं काही होण्याची सुरुवात कशी झाली? जॉनची स्वतःची मॉंट्रियलमध्ये निऑन साईन्सची फॅक्टरी होती. आधी सगळं ठीकठाक होतं. पण नंतर काहीतरी बिनसलं. चिंता, ताणतणाव यामुळे तो पार वैतागून गेला. हे सगळं इथेच सोडावं आणि नवीन काहीतरी करावं, भूतकाळ गाडून टाकावा असं सारखं मनात यायला लागलं. दरम्यान त्याने आपला कारखानाही विकून टाकला. एकदा तो असाच मॉंट्रियलमधल्या जॅक कार्टीएर ब्रिज नावाच्या पुलावरून चालला असताना त्याच्या मनात सहज प्रश्न आला, या रस्त्याने न्यूयॉर्कला पायी जायचं ठरवलं तर किती वेळ लागेल? मग अख्खी दुनियाच पायी चालून पालथी घालायची तर किती वर्षं लागतील? आधी अगदी सहज, गंमत म्हणून मनात डोकावलेल्या या विचाराने नंतर त्याचा ताबाच घेतला. खरंच असं काही जमलं तर...
त्यातून जन्माला आली एक आगळीवेगळी मोहीम : सहाही खंडांचा पायी प्रवास. मनात विचार डोकावला, त्याने काहीएक योजनेचं रूप घेतलं आणि आता तयारीला सुरुवात झाली. नऊ महिन्यांच्या तयारीनंतर फक्त कॅम्पिंगचं आवश्यक सामान असलेली एक ट्रॉली आणि ४००० कॅनडियन डॉलर्स घेऊन हे महाशय आपल्या बायकोचा - ल्यूसचा - निरोप घेऊन बाहेर पडले. या पदयात्रेचा उद्देश होता लहान मुलांसाठी शांतता आणि अहिंसा यांचा प्रचार करणं. यासाठी वेबसाईट चालवणं, त्याचा प्रचार करणं ही सगळी कामं त्याच्या बायकोने केली. त्याची बायको ल्यूस त्याला या प्रवासादरम्यान ११ वेळा वेगवेगळ्या ठिकाणी भेटायला गेली.
या मोहिमेदरम्यान त्याचे अनुभव खूप वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. तो या काळात अनेक कुटुंबांबरोबर राहिला, त्यातून त्याच्याकडे अनुभवाची भलीमोठी शिदोरी जमा झाली. कधी चर्च तर कधी मंदिर, कधी शाळा तर कधी एखादं पार्क, कधी जंगलात आणि क्वचित कुठे चक्क तुरुंगातही त्याने रात्रीचा मुक्काम केला. एकदा दक्षिण आफ्रिकेतल्या तुरुंगात सकाळी गार्ड बदलल्यामुळे त्याला बाहेरच पडता येईना. अखेर खूप प्रयत्नांनी त्याने त्या गार्डला आपण कैदी नसून केवळ रात्री झोपण्यापुरता इथे आसरा घेतला आहे हे पटवून दिलं.
इथिओपियामधल्या मुलांना इंग्रजीचा एकही शब्द कळत नव्हता, त्यामुळे इच्छा असूनही त्याला आपल्याभवती घुटमळणाऱ्या त्या चिमुकल्यांशी बोलता आलं नाही. देशोदेशी असलेल्या संस्कृतींशी जुळवून घेणं हाही एक विलक्षण अनुभव होता. उदाहरणार्थ काही ठिकाणी लोकांकडे बघून डोळे मिचकावणं असभ्य मानतात, तर काही ठिकाणी हाताच्या खाणाखुणांचे वेगळेच अर्थ असतात. ग्वाटेमालासारख्या देशात त्याचं या मोहिमेमागचं उद्दिष्ट समजल्यावर एरवी गुन्हेगार म्हणून समाजाने वाळीत टाकलेल्या काही गुंडांनी त्याला चक्क पैसे देऊ केले.
या जगप्रवासामुळे जॉनला एक खूप वेगळी दुनिया पाहायला मिळाली. त्या अकरा वर्षांनी त्याला बरंच बदलवलं. या प्रवासाचा एक उच्च बिंदू म्हणजे दक्षिण आफ्रिकेचे नोबेल विजेते नेते नेल्सन मंडेला यांची भेट, ज्याने जणू या ट्रिपचं सार्थक झालं. या ट्रिपने त्याला प्रसिद्धी दिली असली तरी यापुढची ट्रिप त्याला खासगीपणे, फार गाजावाजा न करता करायची आहे, केवळ स्वतःच्या आनंदासाठी. जमेल तुम्हालाही असं काही करणं?
लेखिका: स्मिता जोगळेकर