आयफोन, गाडी, हेलिकॉप्टर, चंद्रावर पिकनिक....तामिळनाडूचा हा उमेदवार लोकांना काय काय देणार आहे पाहा !!

निवडणुकीत जिंकण्यासाठी उमेदवार आपले जाहीरनामे प्रसिद्ध करत असतात. त्या उमेदवारांना जिंकवल्यास त्याचा नागरिकांना काय फायदा होईल? किंवा ते निवडून आल्यास तुमच्या शहर किंवा गाव कसे प्रगतीपथावर जाईल हे सगळं त्या जाहीरनाम्यात असते. आजपर्यंत तुम्ही असे अनेक जाहीरनामे पाहिले असतील, पण तामिळनाडूच्या उमेदवाराने केलेला अजब जाहीरनामा इतका व्हायरल झालाय की तो वाचून लोक बुचकाळ्यात पडलेत. नक्की काय सांगितलंय त्या जाहीरनाम्यात एकदा तुम्हीही बघून घ्याच.
येत्या सहा एप्रिलला तामिळनाडूमध्ये विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. अनेक पक्ष आणि अपक्ष उमेदवार आश्वासनांची बरसात करत आहेत. मात्र तामिळनाडूमध्ये सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या जाहीरनाम्यामध्ये एका उमेदवाराने प्रत्येकाला आयफोन, हेलिकॉप्टर इतकंच काय तर चंद्रावर नेण्याचंही आश्वासन दिलं आहे. या ३४ वर्षीय उमेदवाराचे नाव आहे थुलम सर्वानन. तो दक्षिण मदुराई मतदारसंघामधून निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. तो अपक्ष उमेदवार आहे.
सर्वाननने आपल्या जाहीरनाम्यामध्ये प्रत्येक घरात एक आयफोन, गाडी, हेलिकॉप्टर, प्रत्येक घरात घरकाम करण्यासाठी रोबोट तसेच प्रत्येकाला तीन मजल्याचे घरही बांधून देणार असल्याचे आश्वासन दिले आहे. या घराच्या गच्चीवर स्विमिंग पूल असेल. तरुणांसाठी विशेष एक कोटींचा निधी राखीव असेल. त्याचप्रमाणे चंद्रावर १०० दिवसांसाठी सहल नेणार असल्याचे आश्वासनही सर्वाननने आपल्या मतदारांना दिले आहे. हे झाले प्रत्येक मतदाराला काय मिळणार याची यादी, पण सार्वजनिक सुविधा कोणत्या देणार याचीही अजब यादी सर्वाननने दिली आहे. यामध्ये अवकाश संशोधन केंद्र, रॉकेट लॉन्चिंग साईट, ३०० फूट उंचीचा कृत्रिम हिमकडा उभारणार आहे. हा हिमकडा उन्हाळ्यापासून सर्वांचे बचाव करेल. असे त्याने सांगितले आहे.
हे सर्व वाचून तुम्हाला सर्वानन कोण अब्जोपती आहे काय, असा प्रश्न पडला असेल, तर असे नाही. सर्वानन हा एका मध्यमवर्गीय कुटुंबातील तरुण आहे. निवडणूक लढवण्यासाठी २० हजारांचे कर्ज काढलं आहे. त्यापैकी १० हजार रुपये अर्ज भरताना खर्च केलेत. सर्वाननचे म्हणणे आहे की तरुणांनी निवडणुकीसाठी उभे राहावे, ५० तरुण उभे राहिले तर प्रत्येकाला ५० मतं पडतील त्यामुळे कोणताच एक पक्ष जिंकणार नाही. आणि मोठे पक्ष निवडणुकीला घाबरतील.
सर्वाननचे निवडणूक चिन्ह कचऱ्याचा डबा आहे. हा व्हायरल झालेला जाहीरनामा वाचल्यावर अनेक वेगळ्या प्रतिक्रिया आल्या आहेत. अशी अजब आश्वासनं देऊन फक्त चर्चेत राहायचे असे अनेक जणांचे मत आहे. तर काहींना वाटतंय अनेकदा निवडणुका जिंकून झाल्यावर नेते त्यांची आश्वासन विसरतात म्हणूनच ते निवडणुकीत वाटेल ती आश्वासनं देतात हा मुद्दा अधोरेखित करण्याचा प्रयत्न सर्वाननने केला आहे आणि हा जाहीरनामा उपहासात्मक तयार केला आहे.
आता निवडणूक झाल्यावरच कळेल सर्वाननचा हा प्रयत्न त्याला जिंकवून देतोय का तो फसतोय. याबद्दल तुमचे मत काय?
लेखिका: शीतल दरंदळे