computer

कार्बन वॉच: कार्बन उत्सर्जन मोजणारं भारताचं पहिलं अ‍ॅप!!

आपल्या निरोगी जीवशैलीसाठी आपल्या स्मार्ट फोनवर अनेक अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. हे अ‍ॅप आपले रोजचे चालणे, पळणे, सायकलिंग, अन्नामधून पोटात जाणाऱ्या कॅलरी अश्या अनेक गोष्टी मोजत असतात आणि त्याप्रमाणे निरोगी राहण्यासाठी टिप्सही देत असतात. आपण त्यामुळे स्वतःचा हेल्थ ग्राफ अगदी सहज पाहू शकतो. पण कधी असे अ‍ॅप पाहिले आहे का ज्यामध्ये माणसांमुळे पर्यावरणाला होणारा धोका मोजला जाऊ शकतो. म्हणजे आपण उत्सर्जित केलेला कार्बन मोजणारा कोणी आहे का? तर आहे . 

कार्बन फूटप्रिंट किंवा मराठीत कार्बन उत्सर्जन म्हणजे एखाद्या व्यक्तीकडून किंवा तो वापरत असलेल्या उपकरणांतून सोडला जाणारा कार्बन डाय ऑक्साईड वायू. कार्बन फूटप्रिंट मोजणारे भारताचे पहिले अ‍ॅप नुकतेच आले आहे. त्याचे नाव आहे कार्बन वॉच. हे अ‍ॅप UT Environment Department संस्थेने तयार केले आहे. हे अ‍ॅप डाउनलोड केल्यास सरासरी कार्बन फूटप्रिंटचे विश्लेषण मिळते.

कार्बन वॉच अ‍ॅप कसं काम करतं?

अ‍ॅप डाउनलोड केल्यावर आपल्याला पाणी, ऊर्जा, कचरा आणि वाहनांची माहिती या चार भागांमध्ये तपशील भरायला सांगितला जातो. पाणी म्हणजे दरमहा होणारा पाण्याचा वापर, ऊर्जा म्हणजे  दरमहा येणारे वीजबिल, सौर ऊर्जा वापरत असल्यास त्याची माहिती द्यावी लागेल. कचरा या वर्गात व्यक्तीला त्यांच्या व त्यांच्या कुटुंबाच्या कचरा निर्मितीविषयी माहिती, तर शेवटच्या वर्गात ते वापरत असलेल्या वाहनांची म्हणजे चारचाकी, दुचाकी किंवा सायकल याची माहिती द्यायची आहे. या माहितीमुळे हे अ‍ॅप आपोआप त्या व्यक्तीच्या कार्बन फूटप्रिंटची गणना करेल आणि ते कमी करण्याचे मार्ग सुचवेल.

सध्या चंडीगडमध्ये हे अ‍ॅप सुरू झाले असून पर्यावरण आणि वन विभागाचे लक्ष सध्या चंदीगडमधील रहिवाशांकडून मिळालेल्या अभिप्रायावर आहे. अर्थात चंदीगड बाहेरच्या शहरात देखील हे अ‍ॅप डाउनलोड करू करता येईल. हे अ‍ॅप Android वर उपलब्ध आहे. क्यूआर कोडद्वारे किंवा लिंकवर ते जाऊन डाउनलोड करता येते. काही कारणामुळे गूगल प्ले स्टोअरवर अजून ते उपलब्ध नाही. ज्यांच्याकडे अँड्रॉइड  स्मार्टफोन आहे ते हे अ‍ॅप वापरू शकतात. अ‍ॅपमध्ये त्यांचा पिन कोड टाकून कार्बन फूटप्रिंटचे विश्लेषण करू शकतात. हे अ‍ॅप सध्या चंदीगड आणि चंदीगडच्या बाहेर (चंदीगडच्या बाहेरचे यूजर) अश्या दोन श्रेणींमध्ये उपलब्ध आहे.

कार्बन वॉच अ‍ॅपचा उपयोग काय?

हे अ‍ॅप कार्बन फूटप्रिंट कमी करण्याच्या पद्धती सुचवेल. सतत चारचाकी वापरत असल्यास काही ठिकाणी दुचाकी किंवा सायकल वापरायचा सल्ला दिला जाईल. किंवा ऊर्जेच्या पर्यायात व्यक्तींना सौरऊर्जेच्या वापराविषयी माहिती दिली जाईल.

पर्यावरणाच्या हितासाठी आपण कोणकोणते सोपे मार्ग अवलंबू शकतो हे कळण्यास आता सोपे जाईल. कार्बन वॉचमध्ये जितके कमी कार्बन फुटप्रिंट तितके चांगले. असे हे सोपे मोजमाप. लोकांच्या आधुनिक जीवनशैलीत या आपद्वारे पर्यावरणविषयी जागृती होण्यास नक्की मदत होईल.

 

लेखिका: शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required