computer

गालिचा साफ करणारा कार्पेट स्वीपर ते ॲपवर चालणारा व्हॅक्युम क्लीनर!! हा रंजक प्रवास जाणून तर घ्या!!

रांधा-वाढा-उष्टी काढा हे तुम्ही स्वत: करा नाहीतर त्यासाठी नोकर लावा, हे का रोजचं असतंच असतं. त्यातलं उष्टी काढा हे खरंतर सफाईच्या कामाचं प्रतिक आणि घराची, घरातल्या वस्तूंची साफसफाई हे असंच एक न टाळण्याजोगं काम!! साफसफाई करण्यासाठी वापरायच्या पारंपरिक साधनांमध्ये तसा कालानुरूप फारसा फरक झालेला नाही. झाडू, कुंचे, पुसण्यासाठीची फडकी आणि बादल्या ही साधनं अगदी पूर्वीपासून वापरात आहेत. या साधनांचं मॉडर्न स्वरूप म्हणजे व्हॅक्युम क्लीनर. व्हॅक्युम क्लीनरमुळे स्वच्छता या शब्दाबद्दलची आपली कल्पना बदलली आहे.

आजच्या आधुनिक व्हॅक्युम क्लीनरचा पूर्वज म्हणजे कार्पेट स्वीपर. याचा शोध डॅनियल हेस या संशोधकाने १८६० मध्ये लावला होता. या यंत्रात त्याने भात्यांचा वापर केला होता. या भात्यांच्या मदतीने हवा यंत्राच्या आतमध्ये ओढून घेता येत असे. हवेबरोबर धूळ आणि मातीचे बारीक कण, इतर सूक्ष्म कचरा हेही आत ओढलं जायचं. याखेरीज यात फिरत्या स्पिनिंग ब्रशचाही वापर केलेला होता.

या डिझाईनमध्ये थोडासा फेरफार करून १८६५ मध्ये मॅकगफी नावाच्या माणसाने अजून एक यंत्र तयार केलं. त्याने तयार केलेलं यंत्र हाताच्या साह्याने चालवावं लागायचं. त्यासाठी त्याचा दांडा हाताने फिरवावा लागायचा. हे उत्पादन तितकंसं यशस्वी झालं नाही. साफसफाई करताना एका हाताने हा दांडा फिरवत त्याच वेळी संपूर्ण यंत्र गालिच्यावरून फिरवावं लागायचं.

पण ही दोन्ही यंत्रं प्राथमिक अवस्थेतली होती.

१९०१ मध्ये सिसिल बूथ याने सक्शन क्लीनर नावाचं एक अवाढव्य आकाराचं यंत्र तयार केलं. त्यात गॅसवर चालणाऱ्या इंजिनमधून ते चालवण्यासाठी आवश्यक ऊर्जा मिळत असे. मात्र त्याच्या आकारामुळे ते आधी एका घोडागाडीवर चढवून बसवावं लागे आणि नंतर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेलं जाई. सफाई सुरू करताना मोठमोठ्या नळ्यांच्या मदतीने खिडक्यांच्या आतली धूळ ओढून घेतली जायची. या यंत्राचे ग्राहक म्हणजे ब्रिटनमधले अमीर उमराव होते. त्यांच्यामुळे इतर काही संशोधकांना या डिझाइनमध्ये सुधारणा करण्याची प्रेरणा मिळाली. बूथ हा मुळात सस्पेन्शन ब्रीजचं डिझाईन करणारा माणूस. त्याला हे यंत्र तयार करण्याची प्रेरणा मिळाली ती लंडनच्या एम्पायर म्युझिक हॉलमध्ये बघितलेल्या एका नव्या मशीनच्या डेमोवरून. या मशीनमध्ये एक मोठी चूक होती. त्यात हवेचा झोत बाहेर सोडून त्याच्या आधारे कोणत्याही पृष्ठभागावरची धूळ झटकून नंतर एका विशिष्ट बॅगमध्ये जमा व्हायची. हवा बाहेर न सोडता आत ओढून फिल्टरच्या साहाय्याने धूळ, कचरा वेगळं केल्यास ते जास्त प्रभावी ठरेल असं त्याला वाटलं. पण त्या मशीनचा शोध लावणारा माणूस त्याचं म्हणणं ऐकेचना. मग बूथने असं नवीन यंत्र तयार करायचं आव्हान स्वीकारलं. यंत्र तर प्रत्यक्षात आलं पण ते तयार होताना दोनचार जीवावर बेतू शकणाऱ्या अपघातांमधून तो थोडक्यात वाचला होता!

बूथच्या यंत्राला अनेक ठिकाणांहून विरोध झाला. त्याचा अवाढव्य आकार, ते यंत्र रस्त्यातून जात असताना निर्माण होणाऱ्या वाहतुकीच्या समस्या, घाबरवून टाकणारे घोडे अशा अनेक कारणांमुळे लोक त्याचा वापर करू द्यायला उत्सुक नव्हते. यासाठी काही कोर्ट केसेसही झाल्या. परंतु बूथने न्यायाधीशांनाही या मशिनची उपयुक्तता पटवून दिली. पुढे हाच क्लिनर बकिंगहॅम पॅलेस ते रॉयल मिंट आणि क्रिस्टल पॅलेस एवढा टप्पा स्वच्छ करण्यासाठी वापरला गेला. यावेळी जवळपास २६ टन धूळ काढून टाकण्यात आली. त्यानंतर या यंत्राची विश्वसनीयता वाढली. रशियाचा त्झार निकोलस दुसरा, जर्मनीचा कैसर विल्यम दुसरा, लंडनमधलं डिकन्स अँड जोन्स हे डिपार्टमेंट स्टोअर हे या क्लीनरचे ग्राहक होते.

सुरुवातीच्या काळातले व्हॅक्युम क्लीनर त्यांच्या अवाढव्य आणि बेढब आकारामुळे सामान्य ग्राहकाला आकर्षित करू शकले नाहीत. त्यांचा मोठा आवाज आणि त्यांच्या एक्झॉस्ट सिस्टिम्समध्ये निर्माण होणारा दुर्गंध यामुळेही ग्राहकांनी ही यंत्रं नाकारली. पण काही वर्षांमध्ये जगभरातल्या संशोधकांनी यावर संशोधन केलं. कालांतराने सक्शन क्लीनिंग म्हणजेच निर्वात पोकळी तयार करून त्याआधारे स्वच्छता करण्याच्या तंत्रामध्ये सुधारणा झाल्या.

१९२० मध्ये या संशोधनातला एक महत्त्वाचा टप्पा आला. ओहायोमध्ये राहणारा जेम्स मरे स्पॅन्गलर याने साबणाची डबी, झाडूची मूठ, उशीचा अभ्रा आणि इलेक्ट्रिक मोटर यांच्यापासून गालिचा साफ करण्यासाठी एक उपकरण तयार केलं. नंतर त्याने हे यंत्र जवळपास राहणाऱ्या गृहिणींना विकायला सुरुवात केली. सुझान हूवर ही यापैकीच एक. तिचा नवरा विल्यम याने स्पॅन्गलरच्या मशीनमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यासाठी गुंतवणूक केली. कालांतराने त्याने त्याच्या डिझाईनचे हक्क विकत घेतले, आणि हूवर इलेक्ट्रिक सक्शन स्वीपर कंपनी ही कंपनी जन्माला आली. १९३० च्या दशकात पहिला प्लास्टिकचा व्हॅक्युम क्लीनर तयार करण्यात आला. १९५२ मध्ये हूवर कंपनीने आजच्या सेंट्रल व्हॅक्युम सिस्टीमचा आधीचा अवतार असलेला व्हॅक्युम क्लीनर तयार केला. १९६० पर्यंत व्हॅक्युम क्लीनरच्या डिझाइनमध्ये बऱ्याच सुधारणा झाल्या. वजनाला हलके आणि वापरायला सोपे व्हॅक्युम क्लीनर बाजारात आले. ओरेक कॉर्पोरेशन या कंपनीने हॉटेल व्यावसायिकांसाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज वाहून नेता येण्याजोगं- पोर्टेबल- मॉडेल विकसित केलं. हे इतकं यशस्वी ठरलं की त्यांनी ते सामान्य लोकांनाही विकायला सुरुवात केली. पोर्टेबल व्हॅक्युम क्लीनरने मोठ्या प्रमाणावर बाजारपेठ काबीज केली.

यातच एक नवं वळण आलं. ते म्हणजे बॅगलेस टेक्नॉलॉजी.

आतापर्यंत व्हॅक्युम क्लीनरच्या सर्व डिझाईन्समध्ये गालिच्यावरची धूळ आणि कचरा गोळा करण्यासाठी बॅगांचा वापर केलेला होता. पण १९७० मध्ये जेम्स डायसन नावाच्या माणसाला याला पर्याय मिळाला. व्हॅक्युम क्लीनरमध्ये असलेल्या बॅग्ज पूर्ण काढून टाकल्या तर कदाचित त्याचा जास्त फायदा होईल असं त्याला वाटत होतं. त्याने त्या दिशेने प्रयत्नही सुरू केले. तब्बल ५ हजार १२७ प्रोटोटाइप्स/नमुने विकसित करून झाल्यानंतर त्याला सूर गवसला. बॅगेचा वापर न केलेली ही बॅगलेस टेक्नॉलॉजी लोकांमध्ये प्रचंड हिट ठरली. आज बहुसंख्य व्हॅक्युम क्लीनर्स याच तंत्राचा वापर करतात. पण याचा अर्थ असा नाही की बॅगलेस व्हॅक्युम क्लीनर हा या प्रवासातला शेवटचा टप्पा होता. यापुढचा टप्पा रोबोट तंत्रज्ञानाचा होता.

१९९६ मध्ये इलेक्ट्रोलक्स या कंपनीने पहिला रोबोटिक व्हॅक्युम क्लीनर बाजारात आणला. या उपकरणाने झपाट्याने बाजारपेठ काबीज केली. परंतु सुरुवातीच्या काळात यात वापरलेले सेन्सर्स फारसे प्रभावी नसल्याने हा व्हॅक्युम क्लीनर त्याच्या मार्गात येणाऱ्या वस्तूंवर आदळत असे. त्यामुळे काही काळासाठी त्याचं उत्पादन थांबवण्यात आलं.

 

२००२ मध्ये आयरोबोट कंपनीचा रुंबा बाजारात आला. हा रोबोटिक व्हॅक्युम क्लीनर दिशा बदलू शकत असे. त्यात असलेले सेन्सर्स त्याच्या मार्गात येणाऱ्या वस्तू, फर्निचर यांची आगाऊ सूचना देत. त्यानुसार तो कशावरही न आदळता मार्ग बदलू शकत असे.

व्हॅक्युम क्लीनर्स अजूनही उत्क्रांत होत आहेत. कदाचित पुढल्या तीनचार वर्षांत खोल बोगदे, भुयारं, जिथे आत्यंतिक स्वच्छता आणि निर्जंतुक वातावरण गरजेचं असतं अशा हेल्थकेअर फॅसिलिटीज अशा ठिकाणी विशिष्ट त्या कामांसाठीच बनवले गेलेले व्हॅक्युम रोबोट्स दिसतील, किंवा गगनचुंबी इमारतींच्या उंचावरच्या खिडक्या बाहेरून साफ करू शकणारे व्हॅक्युम क्लीनर्स विकसित होतील. लॉकडाऊनमुळे भारतासारख्या सतत धूळ असलेल्या देशातल्या नागरिकांनी असे क्लिनींग रोबॉट्स खरेदी केले. काही वर्षांत घरोघरी वॉशिंग मशीनसारखे क्लिनींग रोबॉट्सही दिसू लागतील. मात्र तंत्रात आणि डिझाईनमध्ये पुढे कायकाय बदल होत जातील हे काळच ठरवेल.

स्मिता जोगळेकर

सबस्क्राईब करा

* indicates required