computer

दिवाळी विशेष: बळीराम, गौळणी आणि त्यांचं नगर. तुमच्याकडे याची काय कथा प्रचलित आहे?

पश्चिम महाराष्ट्रात  आणि कर्नाटकच्या निपाणी-हुपरी या सीमाभागात वसुबारसेच्या दिवशी दिवाळी चालू होते एका वेगळ्याच पद्धतीनं. त्या दिवसापासून घरोघरच्या लक्ष्म्या भल्या पहाटे उठतात,  शेणसडा घालतात आणि बघता बघता त्यांच्या अंगणात इवलंसं एक नगरच वसवतात!!!

हे आहे नक्की काय?

 बळीराजाची सर्वांना माहित असलेली तीच ती छोटीशी गोष्ट. बळी राजाचं पुण्य खूप झालं. इतकं जास्त की त्याला देवांचा राजा करतील की काय अशी इंद्राला पुन्हा एकदा भीती पडली. त्यानं श्रीविष्णूला साकडं घातलं आणि पुण्यवान बळीला स्थान मिळालं ते पाताळात. त्या बळीचं पूजन जरी बलीप्रतिपदेला होत असलं तरी, त्याचं स्मरण करण्याची ही आगळीवेगळी प्रथा विलक्षणच. 

हे आहे शेणाचं बनवलेलं नगर. नगरात असतो बळीराजा, काम करत राहणार्‍या गौळणी, नगराची वेस आणि वसुबारसेपासून बळीपाडव्यापर्यंत एकेका थराने वाढत जाणारा डोंगर.आधी झोपलेला बळीराजा बनवून नंतर गौळणी बनवायला घेतात. शेणाचा छोटासा गोळा दोन्ही हातात घेऊन त्याला आकार लंबगोल आकार द्यायचा आणि जमीनीवर दाबून बसवायचा. यासाठी शेण थोडंसं घट्ट असावं लागतं. आणि मग त्यांना डोकी आणि हात चिकटवलं की झाली गौळण तयार!! 

बळीराजा

हे नक्की असतं काय? तर, बळी राजाच्या राज्यातलं एक छोटंसं नगर. जिथे सगळेजण गुण्यागोविंदाने राहतात. तिथे समृद्धी आहे, संस्कृती आहे, कामसू वृत्ती आहे.

थोडक्यातच सांगायचं तर या पुण्यशील राजाच्या राज्यात सगळीकडे आनंदीआनंद आहे. ही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रजानन त्याची सेवा करतात. हे इतकं सगळं दाखवताना तिथे अवतरतात, गौळणी!!  मुख्य असतो तो बळीराजा. नगरीत दिसणारा एकमेव पुरूष.  तर हा निवांत पहुडलेला असतो. त्याच्या हातापायाशी, डोक्याशी गौळणी त्याची सेवा करत असतात. हा बळी पडला राजा. त्यामुळे त्या बळीला सजवण्याचीही अहमहिका लागलेली असते. त्याचा हार, मुकुट, भलादांडगा करदोडा, वाळे हे तर नेहमीचेच. त्यासोबत छोटेमोठे हार आणि इतर दागिन्यांचे तर काही विचारायलाच नको. आणि त्यात बारकावे इतके, की त्याच्या मानेखाली एक छोटीशी उशीही दिली जाते. हा आहे साधासुधा बळीराजा.

कामात गर्क गौळणी

गौळणी घालताना पहिला मान बळीराजाचा. तो एकदा तयार झाला की, कल्पनेच्या भरार्‍या चालू होतात. जणू या गृहिणी आपलंच रूप या कामाकाजात गुंतलेल्या गौळणींमध्ये पाहतात. कुणी भल्यापहाटे जात्यावर जावेला नाहीतर नणंदेला सोबत देत धान्य दळते, कुणी स्वयंपाक रांधते, कुणी तुळशीवृंदावनासमोर घरच्यांसाठी-तिच्या धन्यासाठी आरोग्य, समृद्धी मागते, कुणी गायींना पाणवठ्यावर नेते, कुणी बाजारहाट करते, एक ना दोन.

पण त्या गौळणींना मात्र आभूषणांचं लेणं नाही. त्यांचं लेणं म्हणजे, बोटाशी पोर आणि डोईवर घमेलं नाहीतर हातातलं काम. घमेल्यावाल्या गौळणी म्हणजे बाजारात जाणार्‍या. मग कुणी बाई त्या प्रत्येक गौळणीच्या डोईवरच्या घमेल्यात काही ना काही ठेवतेच. मग एकजण कांदा-मिरच्या घेऊन येते, दुसरी नुसतीच भुईमुगाच्या शेंगा तर तिसरी दुसरंच काही. कधी कधी भाकरीच्या करणारीच्या तव्यावर, टोपलीत, हातात इवलुशा भाकरीही ठेवते.  अशा घरोघरच्या गौळणी  आवर्जून पाहाव्यात अशा असतात.  तसं प्रत्येक घरापुढचे नगर वेगळं. पण यात वेशीत आपल्या सखीला भेटणारी आणि लेकुरवाळी अशा गौळणी आणि दरदिवशी मोठा होत जाणारा डोंगर या गोष्टी मात्र सगळीकडे अगदी मस्ट!!! सगळ्यांच्या गौळणी पाहाव्यात आणि नुसतं घरधनीणीचं कौतुक करत रहावं.

वसुबारसेचा डोंगर

 वसुबारसेला डोंगराचा एकच थर असतो, वरच्या चित्रात दाखवल्यासारखा.   काही गौळणी नगरात तर काही या डोंगरावर असतात. काहींची बाळंही त्यांच्यासोबत असतात. दुसर्‍या दिवशी आणखी एक थर पडतो, तिसर्‍या-चौथ्या दिवशी मग डोंगर खर्‍या अर्थाने डोंगर म्हणण्यासारखा उंच होतो. 

नरकचतुर्दशीचा डोंगर

बारकाईने पाहिलं तर तीन थर स्पष्ट दिसताहेत. इथं वेशीतल्या गौळणीच्या कडेवर बाळ आहे. 

 

बळीपाडव्याची अंगतपंगत..

बळीपाडव्याच्या दिवशी मात्र चित्र एकदम पालटतं. बळीराजा उठून उभा राहतो, सगळ्या गौळणींची पूजा होते आणि त्यांची घरच्या पांढर्‍याशुभ्र शेवयांनी सजलेली छोट्या छोट्या पानांची पंगत बसते. ज्वारीची कणसासहित पाच धाटं आणि एक ऊस यांचा झोपडीसदृश आकार त्याच्या डोईवर विसावतो. इतर दिवशी या नगरात नसणारी दिपमाळ यादिवशी मात्र या चित्रात किमान एकतरी हवीच. बहुधा ही पंगत गावातल्या चौकात किंवा ग्राममंदिरात बसत असावी. या सगळ्या गौळणींना पांढरे पण टोकाशी गुलाबी होत जाणारे गवताचे तुरे खोचले जातात. ते नाही मिळाले तर मग झेंडू आणि मखमलीची फुले असतातच. 

वरती चित्रात ही आडवी काठी दिसते ती वेस आहे. वेशीतच नेहमी गाठभेट होते याचा प्रतिकात्मक अर्थ घरी पाहुणा येणार हे माहित असेल तर त्याला सामोरं जाऊन तिथंच गळाभेट घेऊन घरी मानाने आणणं असावं. वेशीच्या वरच्या बाजूला दोन-तीन फुले ल्यालेली आकृती दिसतेय, ही आहे दीपमाळ. मोठ्या मंदिरांत ही तुम्ही पाहिली असेलच. 

रोज नव्या गौळणी बनवताना आदल्या दिवशीच्या गौळणी दुसर्‍या दिवशी उत्तरपूजा करून मोडल्या जातात आणि त्यात नवीन शेण मिसळून पुन्हा नव्या गौळणी बनतात. पाडव्यानंतर मात्र या सगळ्या गौळणी चांगल्या वाळवून शेण्यांच्या हुडव्यात ठेवतात आणि मग कधीतरी बंबात जातात.

काही असो, या नगरात अगदी खर्‍याखुर्‍या नगरासारखी जिवंतपणाची सळसळ असते. काहीजणी डोंगर चढत असतात, काहीजणी मुक्कामाला पोचलेल्या असतात, एक भाकरी तव्यावर, दुसरी हातात, काही भाकरी तयार होऊन टोपल्यात विसावलेल्या असतात, काही गायी पाणवठ्यावर पोचलेल्या असतात, एखादे चुकार वासरू आपला पाय मागे ओढत असतं, वर्णन करू तितकं कमीच!! प्रथा कुणी चालू असावी माहित नाही, पण असं हे  जिवंत चित्रण एखाद्या कलाकाराच्या कलाकृतीइतकंच भावतं!!!

 

(सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.) ©बोभाटा

सबस्क्राईब करा

* indicates required