computer

ही 'चेन फास्टिंग' काय भानगड आहे ? का करत आहेत हे लोक चेन फास्टिंग !!

गेल्या एकदोन दिवसांत लोकांचे चेन फास्टिंगचे मेसेज आणि हातात पांढऱ्या कागदावर "मी .... कारणासाठी एक दिवस उपोषण केलं" असं म्हणणारे फोटोज पण आले असतील ना? काय आहे ही चेन फास्टिंगची भानगड? आणि हे लोक का उपोषण करत आहेत?

साध्या सोप्या शब्दांत चेन फास्टिंग म्हणजे साखळी उपोषण! सध्या ते का केलं जात आहे हे ही आता पाहूया.. पण त्याआधी पाहूयात या अभियानाची पार्श्वभूमी काय आहे. 

रस्ता रुंदीकरण, आपण लोकांनी केलेलं अतिक्रमण, प्रदुषण, प्लॅस्टिक आक्रमण हे सगळं असो किंवा मग आजकाल देवराईंमधली वाढती वर्दळ पाह्यली की एक दिसतं की -जंगलांनी, नद्यांनी गेल्या काही दशकांत खूप सोसलंय. त्यातही दुर्दैव असं आहे की  ज्या गावाला या जंगलांनी,  नद्यांनी आणि समुद्राने बरंच काही दिलं,  त्याच गावातल्या नागरिकांनी त्यांच्या कोलमडण्याकडे पूर्ण काणाडोळा केलाय. 

तुम्ही म्हणाल हे काय कित्येक काळ चालू आहे!  आताच का सांगतोय? तर म्हटलं तर कारण आहे म्हटलं तर काहीच विशेष कारण नाही. तर, आजवर अनेकांनी या पर्यावरवरच्या अतिक्रमणाबद्दल आवाज उठवले,  पण ते विखुरलेले होते. गंगा नदीच्या शुद्धीकरणासाठी प्रोफेसर जी. डी. अगरवाल हे उपोषण करत होते. या उपोषणाच्या १११ व्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला. अगरवालांच्या मृत्यूनंतर मात्र अनेकांच्या काळजाला आतून त्रास झाला. आपल्या नद्या वाचवा हे सांगायला एका ऋषितुल्य माणसाला उपोषण करावं लागतं, हेच इतकं वाईट आहे आणि त्यात हे करतानाच त्यांचा मृत्यू व्हावा हे तर आणखीच मोठी भीतीदायक बाब आहे. 

 

जी. डी. अगरवाल (स्रोत)

वाईटातून चांगलं म्हणायचं की कसं ते माहीत नाही, पण या घटनेनंतर आता अनेक जागरूक नागरिक एकत्र आले आहेत. सरकारवर अवलंबून न राहता किंवा त्यासाठी एकीकडे पाठपुरावा करताना त्याच्या जोडीने एक नागरिक म्हणून पर्यावरण संवर्धनासाठी काही करण्याचा निश्चय त्यांनी केलाय. हा निश्चय आणि प्रोफेसर अगरवाल यांना आदरांजली म्हणून या नागरिकांनी  एक अनोखं साखळी उपोषण त्यांनी सुरू केलं आहे.

 

मंडळी, तुम्हांलाही ही कारणं पटत असतील, तर तुम्हीही यात सहभागी होऊ शकता. हे उपोषण करण्यासाठी तुम्ही सेलिब्रिटी असायची गरज नाही, की तुम्हाला तुमचं रोजचं काम बंद करायची गरज नाही. तुमच्या-माझ्यासारख्या पर्यावरणाबाबत कळकळ असणाऱ्या प्रत्येकाला केवळ एक दिवस उपोषण करायचं आहे - तेही आपलं रोजचं काम चालू ठेऊन!  अर्थात हे उपोषण कोणा एकाच्या विरुद्ध नाहीय,  तर आपल्या पर्यावरण संवर्धनाच्या निश्चयाला अधिक बळकट करण्यासाठी आहे.

पर्यावरण संवर्धनासाठी आपण काय करु शकतो ?

यात आपण काहीही करु शकतो. फक्त त्या कामामुळं पर्यावरणाला  मदत व्हायला हवी.  अगदी तुमच्या सोसायटीत किंवा आसपास एक देशी झाड लावण्या-जगवण्यापासून ते तुमच्या परिसरातील अभयारण्याच्या संवर्धनासाठी काम करण्यापर्यंत तुम्ही काहीही ठरवू शकता! नदी, जंगल, समुद्र, झाडे यांच्या संवर्धनासाठी तुम्ही काय करु शकता याचा एक संकल्प करायचा आणि तो पारही पाडायचा. 

यात सामील कसं व्हायचं?

ही चळवळ दसऱ्याला सुरू झाली आहे आणि आजपर्यंत या चळवळीत अनेकांनी एकेक दिवस उपास केला आहे. तुम्हीसुद्धा या चांगल्या कामात सहभागी होऊ शकता. कसं? त्यासाठी आधी [email protected] या ईमेल अॅड्रेसवर तुम्ही उपास करायला तयार आहात इतकं कळवायचं आहे. मग तुम्ही तुम्हाला सोयीची एक  तारीख निवडू शकाल. त्या निवडलेल्या दिवशी उपास करायचा आणि त्यासोबत तुम्ही केलेला निश्चय WhatsApp, Facebook सोशल मिडियावर पोस्ट करुन तुम्ही या चळवळीत सामील होऊ शकता. तसंही तुम्ही चेनफास्टिंगवर इमेल पाठवलीत की अधिक माहिती  तुम्हाला कळेलच.

चला तर मंडळी, आपण आपल्या परिसराचं बिघडलेलं नैसर्गिक रुप परत आणण्याबद्दल कृतीतून बोलुयात. अनेकांनी उपोषणाची तारीख नोंदवली आहे, तुम्ही कधी नोंदवता आहात? आणि हो, तुम्हाला उपास शक्य असेल तरी हा लेख अनेकांपर्यंत पोचविण्याची मदत करून खारीचा वाटा उचलू शकता की! 

मग, काय विचार आहे?

सबस्क्राईब करा

* indicates required