चार्ल्स मॅन्सन : स्वतःला येशू ख्रिस्ताचा अवतार म्हणवून घेणाऱ्याचा अंत !!

२० व्या शतकात अमेरिकेला हादरवून सोडणाऱ्या ‘चार्ल्स मॅन्सन’चा (वय८३) १९ नोव्हेंबर, २०१७ रोजी कॅलिफोर्नियाच्या हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. त्याने ‘मॅन्सन फॅमिली’ नावाच्या जहाल आणि खुनी पंथाची स्थापना केली होती. या पंथाने केलेल्या कारवायांनी पुढे अमेरिकेला मुळापासून हादरवून सोडलं. चला तर आज जाणून घेऊया ‘चार्ल्स मॅन्सन’ आणि त्याच्या ‘मॅन्सन फॅमिली’ बद्दल!!


स्रोत

मॅन्सन फॅमिलीने मिळून तब्बल ९ खून केले आणि त्यात हॉलीवूडच्या ‘शॅरन टेट’ या अभिनेत्रीचाही समावेश होता. ही अभिनेत्री त्यावेळी सात महिन्याची गर्भवती होती. तिने दयेची भिक मागितली पण मॅन्सन परिवारातील लोकांनी तिच्या पोटात चाकू भोसकून तिचा खून केला. त्यांनी तिच्यासह तिच्या चार मित्रांची देखील यावेळी हत्या केली. आणि हत्या करून झाल्यावर त्यांच्याच रक्ताने भिंतीवर ‘डुक्कर’ लिहिण्यात आले.

हे खुनी सत्र १९६९ च्या जुलै आणि ऑगस्ट महिन्यात सुरु होतं. असं म्हटलं जातं की याशिवाय अनेक खुनांच्या पाठी चार्ल्सचा हात होता. चार्ल्सने स्वतः एकही खून केला नसला तरी त्याच्या अनुयायांनी अनेक खून केले. हे सर्व खून त्याच्या सांगण्यावरूनच झाले होते.


स्रोत

चार्ल्स स्वतःला येशू ख्रिस्ताचा अवतार म्हणवून घ्यायचा. त्याने दोन भुवयांच्या मधोमध स्वस्तिक देखील गोंदवून घेतलं होता. त्याने एकदा तर भर न्यायालयात न्यायाधीशांना धमकावलं की ख्रिश्चन कायद्यानुसार तुझं मुंडकं छाटायला हवं.  गॅरी हिनमॅन या म्युझिक टीचरच्या हत्येमध्ये चार्ल्सला अटक झाली त्यानंतर त्याला फाशीची शिक्षा देण्यात आली होती. पण १९७२ साली कॅलिफोर्नियाच्या न्यालयाने त्याला फाशी ऐवजी आजीवन कारावासाची शिक्षा दिली.

मंडळी चार्ल्सने कितीही खून घडवून आणले असले तरी त्याचे अनुयायी त्याला देवाचाच अवतार मानायचे. त्याच्या बोलण्यातून त्याने अनेकांवर आपला प्रभाव पडला आणि यातूनच मारेकरी तयार होत गेले. खरं तर त्याने हे कधीही कबूल केले नाही. त्याने १९७८ साली म्हटले होते की ‘मला जर कोणाला मारायचं असतं तर मी स्वतःच जाऊन त्याचा खून केला असता.’


स्रोत

चार्ल्स मॅन्सन आणि त्याने केलेल्या गुन्हयांच्या अवती भोवती फिरणाऱ्या कथेवर प्रसिद्ध अमेरिकन दिग्दर्शक 'क्वेंटिन टारान्टिनो' सध्या सिनेमा बनवत आहे. पुढच्या वर्षी हा सिनेमा आपल्याला पाहायला मिळेल.

मंडळी, ज्या माणसामुळे अनेक खून झाले त्या माणसाचा मृत्यू वयाच्या ८३ व्या वर्षी 'नैसर्गिकरीत्या' व्हावा ही गोष्ट काही पचनी पडत नाही.

सबस्क्राईब करा

* indicates required