कॉट आली इथे आणि खाट गेली ऑस्ट्रेलियात...या खाटेची किंमत बघून चक्कर येईल राव !!

मंडळी आपण भारतीयांनी ज्या गोष्टी जुन्या म्हणून सोडून टाकल्या त्याच गोष्टी इतर देश स्वीकारत आहेत असं दिसतंय. “जर्मनीत बनताहेत हाय-टेक पत्रावळी...” या लेखात आम्ही सांगितलं होतं की जर्मनीमधील एक कंपनी आपण भारतीय अनेक वर्षांपासून वापरात आलेलो आहोत त्या पत्रावळी तयार करत आहे. 


स्रोत

आज याची आठवण येण्याचं कारण म्हणजे ऑस्ट्रेलियात एक अजब प्रकार घडला आहे. आपण गावी जी लाकूड-दोऱ्यांनी बांधलेली खाट किंवा जिला आपण बाज म्हणतो,  ती आता चक्क ऑस्ट्रेलियामध्ये विकली जात आहे. राव, आमच्या खाटेची नक्कल केली इथवर तरी ठीक होतं. पण त्याची जी किंमत आहे ती बघून तुमचे डोळेच पांढरे होतील.

या खाटेची किंमत आहे तब्बल ९९० डॉलर अर्थात ५०,००० रुपये.

आता तुम्हाला प्रश्न पडेल की ५०,००० मध्ये अख्या गावासाठी खाट मागवायची आहे का? तर धक्कादायक गोष्ट अशी की  ही फक्त एका खाटेची किंमत आहे.


स्रोत

ऑस्ट्रेलियामध्ये एक जाहिरातीत ही सगळी माहिती दिली आहे आणि त्यात ठळक अक्षरात लिहिलं आहे. सुंदर मॅपल वृक्षाच्या लाकडापासून तयार, मनिलाच्या दोऱ्यांनी विणलेली, आरामदायक आणि १००% ऑस्ट्रेलियन बनावटीची ‘पारंपारिक भारतीय चारपाई’.  राव, ही खाट ऑर्डरप्रमाणे बनवून मिळेल असंही त्यात लिहिलंय.

आपण इथे जुने खाट सोडून आरामदायक ‘बेड’ घेत असताना या लोकांना खाटेची भुरळ कशी पडली ही संशोधनाची बाब आहे. पण ते जाऊद्या ओ, हा फोटो व्हायरल होऊन त्यावर ट्विटरवाल्यांनी टीव टीव सुरु केली आहे. आता ट्विटरवाले विनोद करो किंवा विरोध, पण हे ऑस्ट्रेलियन खाट फेमस झालं आहे हे मात्र नक्की !!

टीप : भारतीयांनी या ऑस्ट्रेलियन कंपनीवर आमच्या भारतीय खाटेला चोरल्या प्रकरणी गुन्हा दाखल करावा का ? “जनता जवाब चाहती है !!”

सबस्क्राईब करा

* indicates required