चेन्नईमध्ये मिळत होती कव्वा बिर्याणी आणि कोणाला पत्ताच नाही...काय आहे ही भानगड?

रन सिनेमातली ‘कव्वा बिर्याणी’ आठवते का? ती बिर्याणी खऱ्या आयुष्यातही मिळत होती हे आता समजत आहे. त्याचं झालं असं की तामिळनाडूच्या रामेश्वरम भागात दोन जणांना कावळ्याचं मटण विकताना पकडण्यात आलं आहे. हे दोघे गेल्या कित्येक दिवसापासून स्थानिक हॉटेल्सना कावळ्याचं मटण पुरवत होते.
हा घोटाळा उघड कसा झाला?
ही बाब जवळच्याच मंदिरांमध्ये येणाऱ्या यात्रेकरूंच्या लक्षात आली. त्यांनी बघितलं की मंदिरात येणाऱ्या माणसांनी दिलेला भात खाताच कावळे मरत आहेत. ही काय भानगड आहे याचा तपास लावल्यावर समजलं की काही लोक या कावळ्यांना दारू मिश्रित भात खाऊ घालत होते. हा भात खाऊन कावळे बेशुद्ध पडले की त्यांना पोत्यात भरण्यात येत असे.
यात फक्त हे दोघेच नव्हते बरं. हॉटेल्सवाले आणि रस्त्यावर अन्न विकणारेही बरोबरीचे भागीदार आहेत. हे हॉटेलवाले कोंबडीच्या मटणासोबत कावळ्यांच मटण एकत्र करायचे. पोलीस सध्या या हॉटेल्सच्या शोधात आहेत.
हे पहिल्यांदाच घडलेलं नाही. यापूर्वी चेन्नईमध्ये मांजरींना पळवून त्यांचं मटण विकण्याचं रॅकेट उघडकीस आलं होतं. मांजरींचं मटण कोंबडीच्या मटणासोबत मिसळलं जायचं. या गोष्टीचा पत्ता लागल्यानंतर १६ मांजरींना वाचवण्यात आलं. हा व्हिडीओ पाहा.
तर मंडळी, रस्त्यावरची स्वस्तातली बिर्याणी स्वस्त का मिळते याचं उत्तर या घटनेत आहे.