चीनने दुबईत केलीय उडत्या इलेक्ट्रिक कारची टेस्टिंग!! व्हिडिओ पाह्यलात का?

आधी सायकल, कार, विमान, बुलेट ट्रेन यानंतर जगाचं लक्ष आहे उडत्या कार्सकडे. दिवसेंदिवस रस्त्यावरचे वाढते ट्रॅफिक पाहता उडत्या कार्सच आपले भविष्य असू शकेल. पण या संदर्भातलं संशोधन कुठपर्यंत पोचलं आहे?
जग दिवसेंदिवस जवळ येत असल्याचे आता स्पष्ट होत आहे. उडत्या कार देखील लवकरच प्रत्यक्षात येतील असेही आता स्पष्ट होऊ लागले आहे. टेक्नॉलॉजीतील प्रगतीच्या बाबतीत नेहमी एक पाऊल पुढे असणाऱ्या चीनने यात देखील आघाडी घेतली आहे.
चीनने दुबई येथे एक प्रयोग केला. हा प्रयोग साधासुधा नव्हता. चक्क इलेक्ट्रिक कार हवेत उडविण्याचा हा प्रयोग त्यांच्याकडून झाला आहे. चीनमधल्या इलेक्ट्रिक वाहने तयार करणाऱ्या एक्सपेंग या कंपनीने ही उडती कार तयार केली आहे. जागतिक बाजारात इलेक्ट्रिक एयरक्राफ्ट तयार करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
एक्स2 असे या वाहनाला नाव देण्यात आले आहे. अवघ्या दोन सीट आसन क्षमतेची ही कार व्हर्टिकल टेक ऑफ अँड लँडिंग (eVTOL) एयरक्राफ्ट आहे. ही कार लिफ्ट करण्यासाठी ८ पंख्यांचे साहाय्य घेतले आहे. कारच्या प्रत्येक कोपऱ्याला दोन या प्रमाणे यांची रचना करण्यात आली आहे.
Immersive flight experience. Take a ride with X2 flying car in Dubai. #XPNEGAEROHT #GITEXGLOBAL #FlyingCar #Tech #Dubai pic.twitter.com/UQC1Vlq5Du
— XPENG AEROHT (@XPENG_AEROHT) October 12, 2022
सोमवारी ९० मिनिटांसाठी दुबईत या कारची टेस्ट घेण्यात आली. ही टेस्ट यशस्वी ठरल्यावर नव्या जगातील उडत्या वाहनांसाठी अतिशय महत्वपूर्ण घटना असा उल्लेख कंपनीकडून करण्यात आला. उडत्या कार लवकरच प्रत्यक्षात येण्याच्या दृष्टीने खरोखर हे अतिशय महत्वाचे पाऊल मानले पाहिजे.
या कंपनीकडून दुबईची निवड देखील जाणीवपूर्वक करण्यात आली. कारण दुबईला नाविन्यपूर्ण प्रयोगांसाठी चांगले वातावरण आहे. हळूहळू एक्सपेंग कंपनीकडून जागतिक बाजारात या उडत्या कार आणण्यात येणार आहेत.
चीन मधील या कंपनीने केलेल्या या प्रयोगानंतर अधिकाधिक प्रमाणात इतर कंपन्या देखील यात उतरू लागतील हे वेगळे सांगण्याची गरज नाही. लवकरच आकाशात विमानांच्या जागी कार दिसू लागण्याची शक्यता आता वाढली आहे. भारतात सध्या रस्त्यांवर गाड्या मावत नाही या दृष्टीने या उडत्या कार महत्वाच्या ठरणार आहेत.