मनालीला फिरायला गेलात तर या फसवणूकीला बिल्कुल बळी पडू नका..

भारतातच काय, परदेशातही कुठेही फिरायला गेलात तरी पर्यटकांना उल्लू बनवण्याचे शेकडो प्रकार बघायला मिळतात. जरा बुद्धी वापरली तर कुणी फसू शकणार नाही. पण होतं काय, ऐनवेळी ती दगा देते  आणि आपल्याला अक्कल विकत मिळते.  टीम बोभाटानं  मनालीला बर्‍याच लोकांना या लबाडीला बळी पडताना पाह्यलंय.  म्हणूनच पुढच्या बळींना सावध करण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न..

मनालीतल्या या लबाडीचं नांव आहे ’पारू किंवा स्पारू’. पूर्वी तिला म्हणायचे ’चिंगू’. पण लोक इतक्या वर्षांत थोडे शहाणे झालेले पाहून सध्या मनालीतल्या दुकानदारांनी तिचं नांव ठेवलंय-पारू.

 मनालीमध्ये, विशेषत: वसिष्ठ मंदिर वाटेवर ही फसवणूक जास्त प्रमाणात घडते.  गरम पाण्याचं कुंड असलेलं आणि लाकडी कोरीव काम केलेलं हे वसिष्ठ मंदिर खूप सुंदर आहे. या मंदिरापर्यंत गाड्या नेऊ दिल्या जात नाहीत आणि वाटेवर खरेदीसाठी खूप दुकानं आहेत. खास हिमाचली शाली, जॅकेट्स, ज्यूटच्या कापडावर केलेल्या विणकामाचे वॉल हँगिंग्ज आणि काही शोभेच्या वस्तू तिथं मिळतात. आपल्यालाही जे आपल्या ठिकाणी मिळत नाही असं किंवा त्या ठिकाणची आठवण म्हणून काही ना काही घ्यायचं असतंच. त्यामुळं जाता-जाता लोकांचं शॉपिंग-विंडो शॉपिंग चालू असतं. 

स्त्रोत

हे सगळं पाहात पर्यटक मंदिराकडे जात असताना दुकानदार "स्पारू ले लो.. मनाली की खासियत स्पारू ले लो" असं सगळ्यांना सांगत असतात. अर्थातच विचित्र नावामुळं लोकांना कुतूहल वाटतं आणि ते स्पारू म्हणजे आहे नक्की तरी काय विचारतात. दुकानदारानं दुकानात कितीही वस्तू मांडलेल्या असल्या, तरी हा/ही स्पारू काही समोर नसते.

"अरे दुकानात आत तरी या. ही निवांतपणे पाहायची चीज आहे. ही दुर्मिळ आहे, म्हणून तुम्ही दुकानातच या" अशा वाक्यांनी सुरूवात होते. आत गेल्यावर ते अतिशय मऊसूत अशी लोकरीची शाल ते लोकांना दाखवतात. हिमालयात ’चिंगू’ किंवा ’स्पारू’ नावाचा दुर्मिळ प्राणी आहे. त्या प्राण्याच्या लोकरीची शाल म्हणूनच अतिदुर्मिळ आहे. अशी ही दुर्मिळ वस्तू मनालीची आठवण म्हणून घ्याच, असं म्हणत दुकानदार गिर्‍हाईकांना फसवतात. एका शालीला किमान १०,००० रूपये मोजायचे म्हटल्यावर ग्राहक थोडा विचार करायला लागतोच. तेव्हा मग या शालीसोबत कॉम्प्लिमेंटरी म्हणून बेडशीट्स, उशांचे अभ्रे वगैरे माल फुकट ऑफर केला जातो. विश्वास बसणार नाही, पण लोक या ऑफर्सना बळी पडतात. काहीजण तिथेच खरेदी करतात, काहीजण काही स्पारू खरेदी तर करतातच, वरती होम डिलिव्हरी पाठवा म्हणून पुढचे पैसेही भरून येतात. अर्थातच, त्यांच्या होम डिलिव्हरीज पूर्ण येत नाहीत आणि पावत्यांवर लिहिलेले फोन नंबर्सपण चालू नसतात!!

याच्याही पलिकडे जाऊन काही दुकानदार आणखी मोठ्या भूलथापा मारतात. कोणत्या? वाचाच मग--

१. ही शाल आम्ही तुम्हांला डिस्काऊंटमध्ये इतक्या कमी किमतीला विकतोय. खरंतर ही भारत सरकारची स्कीम आहे. आम्ही तुम्हाला स्पारू विकत नाही देत आहोत, तर भाड्याने देत आहोत. या स्पारूची लोकर तुम्ही ही शाल वापराल तेव्हा तुमच्या शरीरातल्या उष्णतेने आणखी चांगली होईल. मग पाच किंवा सात वर्षांनी भारत सरकार या शाली तुमच्याकडून परत घेईल आणि काश्मिर-लडाखमधल्या सैनिकांसाठी पाठवेल. इतकंच नाही तर तुम्हांना तुमच्या शालीची ७५% रक्कम परत मिळेल. 

२. शालीची किंमत डिस्काऊंटमुळे कमी आहे आणि ती तुम्हांला भाड्यानं दिली आहे एवढा भाग इथंपण सारखा आहे. पुढं जाऊन ते असंही म्हणतात की तुमच्या नावाची इथल्या बँकेत फिक्स्ड डिपॉझिट म्हणजे शुद्ध मराठीत एफ.डी. तयार केली जाईल. ५ वर्षांनी तुमच्याकडे शॉल पण असेल आणि एफ. डी. च्या मॅच्युरिटीचे पैसे पण. "सारी उंगलीयॉं घी में"!! ते तुम्हांला बँकेच्या मॅनेजरचा नंबरपण देतात. काही लोकांनी लागलीच दुकानात असतानाच त्या बँकेत फोन केला तर त्या मॅनेजरकडे या ग्राहकांचा पावती नंबर आणि इतर तपशीलही होते. म्हणजे अजून तुमचं बिल चुकतं होऊन दोन मिनिटं झाली नाहीत तोवर बॅंकेत सगळी माहिती पोचलीसुद्धा?? अशा फाष्ट बँका आपल्याला कशा सापडत नाहीत? 

थोडा विचार केला तर वरच्या दोन्ही स्कीम्समध्ये घोटाळे आहेत हे सहज लक्षात येईल. या शाली खरंच इतक्या दुर्मिळ असत्या तरी यात सरकार कशाला मध्ये कडमडले असते. आणि जर हे खरं असतं, तर पूर्ण कुलू-मनाली सिमल्यामध्ये या स्कीमचे सरकारी आवाहनाचे बोर्ड लागले असते. तसंच कुठलीच बँक अशा ग्राहकांच्या खरेदीच्या पावत्या स्वत:कडे ठेवत नाही. पण नाही, या लबाडीला बळी पडणार्‍या लोकांची संख्या बर्‍यापैकी मोठी आहे. बरेचदा लोक फसवणूक होऊ नये म्हणून सरकारी दुकानातून वस्तू विकत घेतात. इथं नावावरून सरकारी वाटणारी म्हणजेच ’नॅशनल हँडलूम ऍंड क्राफ्ट्स’ अशी दुकानंही इथं चिक्कार आहेत.

स्त्रोत

नक्की आहेत काय मग ही ब्लँकेट्स?

एका केमिस्ट्रीमध्ये रस असणार्‍या  माणसानं या शालींचे धागे प्रयोगशाळेत तपासले. आणि ही ब्लँकेट्स प्राण्यांच्या लोकरीची नाहीत, तर कृत्रिम धागे वापरून बनवली आहेत असं सिद्ध झालंय. चिंगू किंवा स्पारु म्हणून गुगल केलेत तर तुम्हांलाही याबद्दल लोकांनी लिहिलेले बरेच अनुभव सापडतील. 

बळी कसे ओळखायचे?

पण गंमत माहित आहे, या फसवणूकीला कोण बळी पडलंय हे तुम्हांला सहज ओळखता येईल. सहज  चिंगू./स्पारू आणि त्यासोबत मिळणार्‍या फुकटच्या गिफ्ट्सचा आकार इतका मोठा असतो की तो तुमच्या बॅगेत बसत नाही. म्हणून ते दुकानदारच तुम्हाला तुमच्या खरेदीची वळकटी बांधून देतो. मनालीहून येणार्‍याकडे अशी वळकटी दिसली, की यांना उल्लू बनवलं हे आपण समजून जायचं!! हा स्पारू/चिंगू प्रकार काही लोकांनी आपल्या शिर्डी देवस्थानाच्या इथे पण अनुभवलाय. 

ही स्पारू सोडली तर पुरूषांच्या कानात हळूच येऊन ’शिलाजीत.. शिलाजीत’ फुसफुसणारे, बायकांना केशराचे आमिष दाखवणारे हे ही भेटतील. अर्थातच, या वस्तू नक्कीच ओरिजिनल नसतात.  फक्त मनालीच नव्हे, तर एकूणात सगळीकडेच या असल्या लबाड्यांना अंत नाही.  तेव्हा मेंदूला कधीही आराम न देता समजून उमजून नीट खरेदी करा, इतकंच आम्ही सांगू शकतो. 

सबस्क्राईब करा

* indicates required