computer

एकच चूक तिघांनी केली आणि सिटी बँकेला मिळाला 6000 कोटी रुपयांचा झब्बू

'नजर हटी दुर्घटना घटी' हे वाक्य आपल्या परिचयाचं आहे. आज आम्ही तुम्हाला जी कहाणी सांगणार आहोत ती अशीच नजरचुकीची आहे ज्याची काही हजार कोटींची किंमत सिटी बँकेला भरावी लागली.

त्याचं झालं असं की २०१६ साली रेव्हलॉन नावाच्या सौंदर्य प्रसाधनं बनवणार्‍या कंपनीला मोठ्या कर्जाची गरज होती.रेव्हलॉन हे नाव तुमच्या आमच्या परिचयाचं आहेच त्यामुळे रेव्हलॉन बद्दल फारसं न सांगता पुढे काय झालं ते बघू या. एलीझाबेन आर्डेन नावाची दुसरी कॉस्मेटीक कंपनी विकत घेण्यासाठी रेव्हलॉनला १.८ बिलीयन डॉलरची गरज होती. रेव्हलॉन कंपनीची ख्याती मोठीचअसल्याने कर्ज देण्यासाठी अनेक कंपन्या पुढे आल्या. काही मॅनेजमेंट तर काही फायनास कंपन्या आणि धोका स्विकारायला नेहेमीच तयार असणारे काही हेज फंड पण पैसे गुंतवायला तयार झाले. अशा प्रकारच्या कर्जाच्या योजनेत एखदी वित्तीय संस्था किंवा बँक पुढाकार घेते आणि सगळ्यांच्या वतीने काम करते.

रेव्हलॉनला कर्ज देण्यासाठी जे सावकार पुढे आले त्यांचा मुखीया (लोन अ‍ॅडमिनिस्ट्रेटर) म्हणून त्यांनी सिटी बँकेची नेमणूक केली. सिटी बँकेनी रेव्हलॉनकडून वेळेवारी कर्जाचे आणि व्याजाचे हप्ते गोळा करायचे आणि सगळ्यांच्या खात्यात ते जमा करायचे अशी व्यवस्था केली गेली. सुरुवातीला सगळं काही 'आल इज वेल' होतं पण नवी कंपनी विकत घेतल्यावर रेव्हलॉनला अनेक अडचणी यायला लागल्या. साहजिकच पतपुरवठा करणार्‍या कंपन्या घाबरल्या. तरीसुध्दा सिटी बँक वेळेत वसूली करून पैसे गोळा करत होती. त्यात भर पडली कोव्हीडच्या महामारीची आणि सगळ्याच पतपुरवठा करणार्‍या वित्तीय संस्थांचे धाबे दणाणले.

पण.... पण .. आश्चर्याची गोष्ट अशी की ११ ऑगस्ट २०२० रोजी सगळ्या वित्तीय संस्थांच्या खात्यात रेव्हलॉनला दिलेले सगळे कर्ज व्याजासकट परतफेड झाले. घाबरलेल्या सावकारांनी सुटकेचा श्वास सोडला. पण दुसर्‍याच दिवसी सिटी बँकेचे प्राण कंठाशी आले कारण रेव्हलॉनने कर्जाची परतफेड केलीच नव्हती आणि सिटी बँकेने चुकून स्वतःच्या खात्यातूनच सगळे पैसे भरले होते. झालं होतं असं की रेव्हलॉनने दरमहा ठरलेला ७.८ मिलीयन डॉलरचा मासिक हप्ताच जमा केला होता पण सिटी बँकेच्या नजरचूकीने फक्त ७.८ मिलीयन डॉलरचे वाटप न करता सगळेच्या सगळे मुद्दल आणि व्याज परत करून टाकले. 

थोडक्यात बाकीचे भिडू सुटले पण सिटी बँकेला ८९४ मिलीयन डॉलरचा म्हणजे ६००० कोटी रुपयांचा झब्बू मिळाला.

आता चुकून १०० ऐवजी अंधारात ५०० रुपयांची नोट देणं अशा चुका तुम्ही आम्ही सर्रास करतो पण सिटी बँकेसारखी बँक अशी चूक करतेच कशी ? आता ही काँप्युटरची चुक होती की माणसाची की हा एखादा फ्रॉड आहे असा घोर बँकेच्या जीवाला लागला आणि शोधाशोध सुरु झाली. लक्षात आलं ते असं की ही चुक ' सहा डोळ्यांची' म्हणजे तीन अधिकार्‍यांची होती. त्यापैकी दोन अधिकारी 'विप्रो' या भारतीय कंपनीसाठी काम करत होते तर एक अधिकारी सिटी बँकेचा वरीष्ठ अधिकारी होता.
(एखादा आर्थिक व्यवहार तीन अधिकार्‍यांनी खात्री करून पूर्ण करणे याला 'सिक्स आईज सिस्टीम' असे म्हटले जाते)

आता या अमेरीकन बँकेत हे ' विप्रो'वाले आले कसे ?

सिटीबँकेची इ-मेल व्यवस्था आणि ट्रॅन्जॅक्शन मेल सांभाळण्याचे काम 'आउटसोर्स' पध्दतीने 'विप्रो' कडे देण्यात आले होते. अशा प्रकारचे आर्थिक व्यवहार 'फ्लेक्सक्युब' नावाच्या सॉफ्टवेअरच्या मार्फत केले जाते. कर्जदाराकडून हप्ते आले की व्याजाचे पैसे वित्तीय संस्थांकडे पाठवायचे आणि त्यातला मुद्दलाचा भाग सिटी बँकेच्या एका विशिष्ट खात्यात (वॉश अकाउंट) जमा करायचे अशी कामाची पध्दत होती. यासाठी कॉम्प्युटरच्या प्रोग्रॅममध्ये वेगवेगळे ऑप्शन दिलेले असतात. ते ऑप्शन काळजीपूर्वक वापरून पैसे ट्रान्सफर करायचे असतात. विप्रोचे दोन अधिकारी (म्हणजे चार डोळे) आणि निर्णायक पर्याय सिटीबॅंकेच्या अधिकार्‍याचा असतो. नेमकं काय घडलं हे कळंलच नाही आणि तिन्ही अधिकार्‍यांनी चूकीचा पर्याय वापरला आणि कर्जाची सगळीच रक्क्म बॅ़ंकेच्या खिशाला चाट लावून वित्तीय संस्थांकडे पोहचली.

हे सगळे झाले तरी बँक बेसावधच होती. बॅ़कांच्या सर्व अधिकार्‍यांना मेल पाठवण्यात आला की काहीतरी कॉम्प्युटरचा गोंधळ झाला आहे , सावध रहा इतकेच सांगण्यात आले. झालेला हजारो कोटीचा लोच्या निस्तरण्यासाठी सिटी बँकेचे अधिकारी कामाला लागले. त्यांनी वित्तीय संस्थांना कळवले की पैसे चुकून तुमच्या खात्यात जमा झाले आहेत आणि ते परत करण्यात यावेत. आता नैसर्गिक न्यायाने पैसे परत येणे अपेक्षित होते . त्याप्रमाणे काही संस्थांनी पैसे परत दिले पण काही सावकारांनी सिटी बॅकेला चक्क ठेंगा दाखवला. त्यांचे म्हणणे असे पडले की एवीतेवी पैसे आम्हाला मिळणार होतेच , पैसे परत मिळणे हा आमचा हक्कच आहे, आता मिळालेले पैसे आम्ही परत करणार नाही. आता सिटी बँकेला कोर्टात जावे लागले पण कोर्टाने पण त्यांच्या विरुध्द निवाडा दिला. सिटी बँक आता अपील करेल वगैरे जे काही होईल ते होईल पण आंतरराष्ट्रीय बँकींग वर्तुळात सिटी बँकेचा उडलेला फज्जा ही मोठ्ठा मनोरंजनाचा किस्सा झालाय हे खरं !

आपण काय शिकायचं ? बँक पण चुका करते , आपण सावध असलेलं नेहेमीच हिताचं असतं !

सबस्क्राईब करा

* indicates required