नो कचरा, नो धूळ.. पंखे साफ, अगदी चकाचक!!

पंखे साफ करणं हे जगातल्या महाकटकटीच्या काही कामांपैकी एक! आधी स्टुलावर चढा, मग धूळ झटका आणि मग पंखे ओल्या कापडानं पुसून घ्या. अहं... खरोखरी काम करताना ती  इतकी सोपी प्रोसेस राहात नाही. झाडूनं धूळ झटकताना धुळीचे कण घरभर पसरतात. ते ही नेमके अशा ठिकाणी की तिथली साफसफाई नुकतीच झालेली असते आणि आपल्याला डबल काम लागतं. त्यात धूळ कधी कधी सोफ्याच्या खाचेत, इलेक्ट्रिक बटनं,  शोभेची फुलं अशा भयंकर ठिकाणी जाऊन पडते की कितीही साफ केलं तरी धूळ पूर्णपणे काही साफ होत नाही. वर धुळीमुळं घरात शिंका देणार्‍यांचं संमेलन भरतं ते वेगळंच.

हे सगळं टाळायचं तर पंखे साफ न करून पण चालत नाही. मग आम्हांला मिळाला इंटरनेटवर कमीत कमी वेळात आणि धूळ न सांडता पंखे चकाचक करण्याचा एक उपाय. आज तोच आम्ही आमच्या वाचकांसाठी घेऊन आलो आहोत. करायचं काय, तर एक जुना उशीचा अभ्रा म्हणजेच पिलो कव्हर घ्यायचं आणि त्याची पंख्याच्या पात्याला मस्तपैकी टोपी घालायची. मग पंख्याच्या बुडापासून टोकापर्यंत उशीच्या कव्हरने हळूहळू पातं पुसायचं. यात होतं काय, पंख्यावर कितीही धूळ साचली असली, तरी ती सगळी त्या उशीच्या खोळीत जाऊन पडते. या पद्धतीत एक पातं साफ करायला अर्धं मिनिट पुरतं. कोरडी धूळ उशीच्या खोळीत जमा झाली आणि  ओल्या कापडानं एकदा सगळी पाती पुसून घेतली की काम खल्लास!! मग ती खोळ उलटी करून कचर्‍याच्या डब्यात झटकून चांगली धुऊन घेतली तर पुढच्या वेळेसही पुन्हा कामाला येईल. 

चला तर मग...  शनिवार-रविवार तोंडावर आलाय आणि दिवाळी एक आठवड्यावर आलीय.  तेव्हा घरातल्या उशांच्या जुन्या खोळी शोधा आणि घरातल्यांना पंखे सफाईच्या कामाला लावा. 

सबस्क्राईब करा

* indicates required