ज्या बँकेत सफाई कामगार म्हणून सुरुवात केली, तिथेच मॅनेजर पदावर रुजू झालेल्या प्रतीक्षा तोंडवळकरांची प्रेरणादायी कहाणी..

आयुष्यात कधीकधी दुःखाचे आभाळ कोसळते. यातून सावरायचे म्हटले तरी ते सोपे नसते. पण यातून बाहेर पडून काही लोक हिंमतीने आयुष्याला सामोरे जातात आणि यशस्वी होऊन दाखवतात. आज एका महिलेच्या अशाच हिंमतीची गोष्ट तुम्हाला सांगणार आहोत.

प्रतीक्षा तोंडवळकर!! पुण्यात एका गरीब घरात जन्म, सोळाव्या वर्षी लग्न आणि अवघ्या विसाव्या वर्षी नवऱ्याचा मृत्यू होऊन विधवा होण्याचं दुर्दैव!!! नवरा गेला तेव्हा लहान बाळ सोबत होतं. अशा सर्व परिस्थितीत कोणीही खचून गेले असते. पण प्रतीक्षा यांनी आपल्या मुलासाठी हिंमतीने प्रवास सुरु केला. दहावी पास होण्याआधीच लग्न झाल्याने शिक्षणाचा विषयच नव्हता.

बँकेत सफाई कामगार म्हणून त्या रुजू झाल्या. पण म्हणतात ना, जिद्द असेल तर काहीही शक्य आहे. आज वयाच्या ३७ व्या वर्षी त्यांनी ज्या एसबीआयमध्ये सफाई कामगार म्हणून सुरुवात केली त्याच बँकेत त्या असिस्टंट जनरल मॅनेजर म्हणून रुजू झाल्या आहेत. प्रतीक्षा तोंडवळकर यांचा संपूर्ण प्रवास वाचला तर कुण्याच्याही अंगावर रोमांच आल्याशिवाय राहणार नाहीत.

अगदी कमी वयात त्यांचे लग्न एसबीआयमध्ये नोकरीला असलेल्या सदाशिव कडू यांच्यासोबत करण्यात आले. त्यांना एक लहान गोंडस बाळ झाले. त्याचे नाव विनायक असे ठेवण्यात आले. मुलगा झाला म्हणून देवाचे आभार मानण्यासाठी त्यांनी गावाकडे जाण्याचा निश्चय केला. पण हा प्रवास त्यांचे आयुष्य उलट्या बाजूने घेऊन जाणार याची त्यांना कल्पना नव्हती. या प्रवासात एका अपघातात त्यांच्या नवऱ्याचा मृत्यू झाला.

नुकताच जन्माला आलेला मुलगा आणि पतीचे झालेले निधन, अशा परिस्थितीत असणाऱ्या बाईची कल्पना करूनही त्रास होईल अशी सर्व परिस्थिती होती. लहान बाळासाठी आपण काहीही काम करून त्याला मोठे करू हा निश्चय करत त्या या दुःखातून बाहेर पडू बघत होत्या. नोकरी करावी तर शिक्षण नाही म्हणून अडचणी संपत नव्हत्या.

शेवटी त्यांनी ज्या एसबीआयमध्ये पतीने नोकरी केली तिथे सफाई कामगार म्हणून नोकरी सुरू केली. सकाळी २ तास पूर्ण ऑफीसची साफसफाई करायची आणि उरलेल्या वेळेत असेच कामे करून घराचा उदरनिर्वाह करायचा असा त्यांचा दिनक्रम सुरू झाला. पण मुंबईसारख्या शहरात आयुष्य काढायचे आणि मुलाला शिकवायचे म्हटले तर यावर काही होणार नाही हे त्यांना समजत होते.

आजूबाजूला सर्वजण ऑफिसला जाताना बघून त्यांना आपणही असे काहीतरी करायला हवे असे वाटत असे. त्यांनी मग बँकेत काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांना विनंती करून दहावी पूर्ण करण्यासाठी मदत मागितली. त्यांनी प्रतीक्षा यांना दहावी बोर्डाची परीक्षा फॉर्म भरण्यासाठी आणि परीक्षा देण्यासाठी प्रोत्साहन दिले, तसेच सुट्ट्या देखील मंजूर केल्या.

इच्छा तेथे मार्ग ही म्हण अशा लोकांकडे बघून किती खरी आहे याचा अनुभव येतो. दहावी पास होण्यासाठी गरजेची होती पुस्तके!! यासाठी त्यांनी नातेवाईक आणि हितचिंतकांची मदत घेतली आणि त्या ६०% मार्क्स घेऊन दहावी पास झाल्या. जे समजले नाही ते लोकांना लाज न बाळगता विचारून घेण्याचा स्वभाव असल्याने त्यांना गोष्टी शिकून घ्यायला सोपे जात होते.

शिक्षणाचा हा प्रवास आता सुरू झाला होता. तुटपुंज्या कमाईतून मुलाला वाढवणे आणि शिक्षण पूर्ण करणे असे दुहेरी काम त्यांना करायचे होते. मुलाला बिस्कीट घेऊन देण्यासाठी आधीच्या स्टॉपवर उतरून तिथून पायी चालून त्या पैसे वाचवत होत्या. यावरून किती अडचणींचा सामना करून त्या जीवन जगत होत्या याचा अंदाज येऊ शकेल.

बारावी पास करण्यासाठी त्यांना रात्रशाळेचा पर्याय समजला. विक्रोळी येथे त्यांनी मग रात्रशाळेत प्रवेश घेतला. इथंही सर्व जबाबदाऱ्या सांभाळत त्यांचा अभ्यास सुरूच होता. बारावी आणि पुढे मानसशास्त्रात पदवी घेत त्यांनी आयुष्याचा मोठा पल्ला पार केला होता.

 

ज्या परिस्थितीत त्या संघर्ष करत होत्या, ते बघितले तर कोणीही हात टेकू शकतो, आणि जे नशिबात आहे त्यातच आयुष्य जगण्याची शक्यता असते. पण म्हणतात ना, सबसे बडी योद्धा माँ होती है!!! त्यांनी मेहनत केली, स्वतःला सुख म्हणजे काय हे सुद्धा माहीत नसले तरी मुलाचे भविष्य सुखी व्हावे म्हणून त्या मेहनत घेत होत्या.

१९९३ साली त्यांनी दुसऱ्यांदा लग्न करण्याचा निर्णय घेतला. बँकेतच कामाला असलेल्या प्रमोद तोंडवळकर यांच्या सोबत त्यांनी आता नवा संसार सुरू केला. प्रमोद हे बायकोला पाठबळ देणाऱ्या स्वभावाचे होते. त्यांनी प्रतिक्षा यांना बँकेच्या परीक्षा देण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यांना दोन मुले झाली. प्रमोद यांनी प्रसंगी घरातली कामे सांभाळून आपल्या पत्नीला शिकण्यासाठी मदत केली.

पण प्रतिक्षा यांच्या सर्व समस्या सुटल्या होत्या असे काही नव्हते. त्यांना त्यांच्या सासू सासऱ्यांचे समर्थन काही मिळत नव्हते. अशावेळी परत नवरा पाठीशी खंबीरपणे उभा ठाकला. प्रमोद यांनी आईवडिलांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. १९९५ साल आले तेव्हा त्यांच्या मेहनतीला फळ मिळाले. प्रतीक्षा यांना बँकेत क्लर्क म्हणून नोकरी लागली.

या दाम्पत्याचा संघर्ष काय संपत नव्हता असेच चित्र सातत्याने होते. प्रमोद यांना मधल्या काळात पॅरालिसिसचा अटॅक येऊन गेला. याही परिस्थितीत त्यांनी आपल्या पत्नीला मदत केली. त्या अभ्यास करत असताना चहा आणून देण्यासारखे काम देखील ते करत होते. विनायक जसजसा मोठा होत गेला तसा त्याने आपल्या आईची मेहनत आणि संघर्ष बघितला होता.

आईला शिक्षण पूर्ण करण्यासाठी विनायक देखील वेळोवेळी प्रोत्साहित करत होता. २००४ येता येता प्रतिक्षा यांची बढती ट्रेनी ऑफिसर म्हणून झाली होती. त्यांनी अभ्यासाचा ध्यास कधीच सोडला नाही. शेवटी ज्या एसबीआयमध्ये त्यांनी सफाई कामगार म्हणून सुरुवात केली होती. त्याच बँकेत त्या असिस्टंट जनरल मॅनेजर या पदापर्यंत गेल्या.

प्रतिक्षा यांनी आपल्या आयुष्याचे ध्येय हे अभ्यास हेच बनवले आहे. त्यांनी गेल्या वर्षी न्यूरॉपॅथीचा कोर्स केला आहे. निवृत्त झाल्यावर या कोर्समध्ये मिळालेल्या अभ्यासाचा वापर करून अजून काहीतरी वेगळे करण्याचा त्यांचा मानस आहे.

आयुष्य तुमच्यापुढे वेळोवेळी अडचणींचा डोंगर उभा करत असतो. पण जिद्द आणि इच्छाशक्ती असली तरी उशिरा का होईना पण माणुस यशाला गवसणी घालू शकतो हेच प्रतिक्षा यांच्या उदाहरणावरून शिकण्यासारखे आहे.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required