computer

लोड शेडींग पुन्हा आलंय? भारताला सतावणाऱ्या वीज टंचाई मागचे कारण समजावून घ्या!

अगदी एक-दोन तासांसाठी जरी घरातील लाईट गेली तरी आपली किती पंचाईत होते. पूर्वी जेव्हा भारनियमन म्हणजे शुद्ध मराठीत लोडशेडिंग केले जात असे तेव्हा आपल्याला लाईटशिवाय राहण्याची थोडीफार सवय झाली होती. पण ती सवय आता बरीच मोडलीय. त्यात आता सगळीच कामं फक्त लाईटवरच अवलंबून आहेत. तर अशाप्रकारे वीज किंवा लाईट ही आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग बनली आहे. समजा आता पुन्हा एकदा भारनियमन सुरु झालं तर काय होईल? ही कल्पनाच भयंकर असली तरी कदाचित येत्या काही दिवसात तुम्हा-आम्हांला पुन्हा एकदा ते दिवस अनुभवण्याची संधी मिळणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि याचे कारण म्हणजे वीजनिर्मिती करण्यासाठी जो कोळसा लागतो त्याची देशाला प्रचंड टंचाई जाणवत आहे. फक्त भारतच नाही, तर चीन आणि युरोपमध्येही सारखीच परिस्थिती निर्माण झाली आहे.

दिल्लीतील वीजनिर्मिती केंद्रात तर वीजनिर्मितीसाठी केवळ दोनच दिवस पुरेल एवढाच कोळसा शिल्लक आहे आणि दोन दिवसांत कोळसा उपलब्ध झाला नाही संपूर्ण दिल्लीवर अंधार दाटेल अशी शक्यता दिल्लीचे ऊर्जा मंत्री सत्येंद्र जैन यांनी व्यक्त केली आहे.
दिल्लीसह भारतातील कर्नाटक, तामिळनाडू या राज्यांनीही आपली परिस्थितीही दिल्लीहून भिन्न नसल्याचे म्हटले आहे. या दोन्ही राज्यांनीही त्याच्या वीजनिर्मिती केंद्राकडील कोळसासाठ संपत आल्याने वीज निर्मितीबाबातीत लाल सिग्नल दिला आहे. जर वेळेत या केंद्रांना कोळसा पुरवठा झाला नाही तर वीजनिर्मिती पूर्णतः ठप्प होईल आणि मग जे काही होईल त्याची कल्पनाही करवणार नाही.

अगदी महाराष्ट्र वीज वितरण मंडळानेही मुंबईला विजेचा कमीत कमी वापर करण्याविषयी सुचना दिल्या आहेत. कारण विजेची मागणी आणि वीजसाठा यांचा ताळमेळ घालता-घालता वीज महामंडळाला नाके नऊ आले आहेत.

देशातील अनेक ठिकाणी जिथे खनिज कोळसा वापरून वीजनिर्मिती केली जाते. अशा केंद्रांवरील कोळसा संपत आला आहे. अनेक वीजनिर्मिती केंद्रावर तर फक्त ३-४ दिवसच वीज निर्मिती करता येईल इतका कोळसा शिल्लक आहे. गेल्या दोन आठवडयांपासून ही केंद्रे सरकारकडे कोळसा पुरवठा करण्याची मागणी करत आहेत, पण कोळशाची आयातच बंद असल्याने याबाबत केंद्र सरकारही काही करू शकेल असे दिसत नाही.

भारतातील जवळपास ७०% वीज ही कोळशापासूनच निर्माण होते. त्यातही फक्त एक तृतीयांश कोळसा हा भारतातील खाणीतून मिळतो, तर उर्वरित कोळसा हा आयात करावा लागतो. भारतातील एकूण १३५ वीजनिर्मिती केंद्रापैकी १०७ केंद्रावरील कोळशाचा साठा हा जेमतेम आठवडाभर जाईल इतकाच आहे. काहीठिकाणी तर अवघ्या एक-दोन दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक आहे.

फक्त भारताचीच ही स्थिती आहे असे नव्हे. जगभरात खनिज कोळसा आणि नैसर्गिक इंधनाचा तुटवडा जाणवत असून यामुळे यांच्या दारातही वाढ झाली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर आता सर्वत्रच उद्योगधंदे सुरु होण्याच्या मार्गावर असल्याने सगळीकडेच विजेच्या वाढत्या मागणीने उचल खाल्ली आहे. सगळीकडचीच मागणी अचानक वाढल्याने त्यांचा तुटवडा जाणवत आहे.

जे देश इतर देशांना कोळसा किंवा नैसर्गिक वायू पुरवतात त्या देशांना मोठ्या प्रमाणावरील बाजारपेठेची मागणी पूर्ण करता येत नसल्याने सगळीकडेच अशी टंचाई निर्माण झाली आहे. त्यातच कोळशाचे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील भाव एकदम वाढल्याने भारतासारख्या देशाला हा कोळसा खरेदी करणे आवाक्याबाहेरचे होऊन बसले आहे.

भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा कोळसा उत्पादक आणि उपभोक्ताही आहे. भारताआधी यात चीनचा क्रमांक लागतो आणि गेले कित्येक दिवस चीनमध्येही प्रचंड वीज टंचाई जाणवत आहे.

भारतातील झारखंड, ओदिशा, छत्तीसगड या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कोळशाच्या खाणी आढळतात. उर्वरित देशाच्या तुलनेत ७०% कोळशाच्या खाणी या तीन राज्यांत आहेत. २०२० मध्ये देशातील खाणींमध्ये ३४४.०२ अब्ज टन इतका कोळसा शिल्लक होता. यातील बहुतांश कोळसा हा वीजनिर्मितीसाठीच वापरला जातो. भारताच्या मध्य आणि पूर्व भागात यावर्षी मोठा पाउस झाला. या पावसाने खाण परिसरात पूर आला आणि खाणकाम बंद पडले. अजूनही या खाणीच्या परिसरातील पाऊस सुरूच आहे ज्यामुळे खाणकाम सुरु करण्यास अडथळे येत आहेत. म्हणून सध्या या परिसरातील खाणकाम आणि वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली आहे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर देशाचे ऊर्जा मंत्री राज कुमार सिंघ यांनी पुढचे सहा महिने तरी भारतात ही परिस्थिती अशीच राहणार असल्याचे म्हटले आहे.

ज्या खाजगी वीज कंपन्यांना या खाणी दिल्या आहेत त्यांनी या खाणीतून मिळालेला ५०% कोळसा सरकारला द्यायचा असा नियम लागू करण्यात आला आहे.

या सगळ्या गदारोळात पुन्हा एकदा वीज दर वाढण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. आधीच लॉकडाऊन, कोरोना, खाद्यतेल, पेट्रोल, डीझेल यांची शुल्कवाढ, असा चोहोबाजूंनी घेरलेला सामान्य माणूस वीजटंचाई किंवा वीज दरवाढ यांच्याशी कसा जुळवून घेणार कुणास ठाऊक.

कोळसा उपलब्ध होत नाही तर किमान धरणाच्या पाण्याचा वापर करता येतो का याचा विचार सुरु आहे. तसेही यावर्षीच्या धो-धो पडलेल्या पावसामुळे धरणे तुडुंब भरली आहेतच याचा जर वापर वीजनिर्मितीसाठी झाला तर काही ठिकाणची वीज तुटवडा दूर होण्यास मदत होईल. आता यासाठी आपण कितपत तयार आहोत ते येत्या काळात दिसेलच.

वीज तुटवडा निर्माण झालाच तर अशा परिस्थितीत तुम्ही काय सुचवाल? कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा.

मेघश्री श्रेष्ठी

सबस्क्राईब करा

* indicates required