computer

हाँगकाँगमधल्या या घरांना कॉफिन होम का म्हणतात? हाँगकाँगच्या डोळे दिपवणाऱ्या शहराचं वास्तव काय आहे?

हाँगकाँग देशाचे नाव घेतले की दिसतो एक प्रगत देश. या देशात असलेल्या टोलेजंग चमकत्या इमारती, चकचकीत रस्ते, सतत चढत जाणारी अर्थव्यवस्था पाहिले की वाटते अशा ठिकाणी राहता आले पाहिजे. इतक्या सुखसुविधा असणाऱ्या देशात कोणाला राहायला आवडणार नाही? पण या चकमकीमागे असणारे वास्तवही खूप भयानक असते. इथे जवळजवळ चिकटून असणारी छोटी घरं आणि त्याच्या किंमती पहिल्या तर तुम्हाला धक्का बसेल! याच कारणामुळे वाढणारे कोविडचे रुग्ण ही एक चिंतेची बाब बनली आहे. आज जाणून घेऊयात की सर्व सुविधांनी परिपूर्ण असणाऱ्या हाँगकाँगमधल्या अशा एका भागाबद्दल जेथे लोक अतिशय वाईट परिस्थितीत आयुष्य जगत आहेत.

हाँगकाँग हे सर्वात महागड्या शहरांपैकी एक मानले जाते. इथले राहणीमान खूप महाग आहे. इथे अत्याधुनिक सेवा मिळण्यासाठी पैसेही तितक्याच पटीत मोजावे लागतात. माणसाच्या मूलभूत गरजांपैकी घर हे एक असतेच.

हाँगकाँगमध्ये केवळ घर खरेदीच नाही, तर घरभाडेही खूप महाग आहे. इथे व्यवस्थित कमावणारे अनेकजण आहेत, पण इथल्या महागाईमुळे सगळेच घर विकत घेऊ शकत नाहीत. म्हणून इथले अनेकजण कॉफिन होम मध्ये राहतात. कॉफीन म्हणजे शवपेटी. इथल्या घरांचे आकार इतके लहान आहेत की एक माणूसच कसाबसा झोपू शकेल. म्हणजे एवढ्याश्या जागेत स्वयंपाक, टीव्ही, झोपणे आणि संडास. म्हणूनच अशा घरांना कदाचित कॉफिन हाऊसेस म्हटलं जातं.

शासकीय आकडेवारीपेक्षा प्रत्यक्षात खूप जास्त पटीने लोकं कॉफीन होम मध्ये राहतात. या अश्या घरांमध्ये २,००,००० पेक्षा जास्त लोक राहत आहेत. इथे पुरेसा प्रकाश नाही आणि उजेड नाही. अशा घरांची कल्पनाही करणं अवघड आहे न्यूयॉर्कपेक्षा इथली घरे चौपट किंमतीत विकली जातात आणि लंडनपेक्षा दुप्पट किंमतीत! इथे फक्त करोडपती आणि अब्जाधीश लोकं घर विकत घेऊ शकतात. इथले सरकार या श्रीमंत लोकांना जास्त प्रोत्साहन देते, परंतु सर्वसामान्य लोकांचा विचार होत नाही. शिवाय ही आकडेवारी लपवलीही जाते.

इथे इमारत बांधताना अशाच बांधल्या जातात की त्यात अनेक खोल्या निघू शकतील. ४०० चौरस फूट घराचे २० भागांत विभाजन करून खोल्या बांधल्या जातात. त्या आकाराने खूप लहान असतात. तिथे प्रवेश करणेही अवघड असले तरी तिथल्या मालकांना माहीत असते की येथे लोक राहायला येतीलच. अनेक खोल्या अशा आहेत की तिथे झोपल्यावर वळताही येत नाही. काही खोल्यांमध्ये पाय पसरताही येत नाही. २०,२५ जण मिळून एकच स्नानगृह , संडास वापरतात. त्यामुळे रोगराईही वाढते. प्रेताप्रमाणे हालचाल न करता लोक या खोल्यांमध्ये ज्या पद्धतीने जगतात, त्यामुळे याचे नाव कॉफिन होम असे ठेवले गेले. एवढे करूनही लोकांना येथे राहण्यासाठी भाड्याने सुमारे २५० अमेरिकन डॉलर्स द्यावे लागतात.

कॉफिन होमचा इतिहासही आहे. ही काही आजच्या काळातली सोय आहे असे अजिबात नाही. बर्‍याच वर्षांपूर्वी अनेक चिनी प्रवासी कामाच्या शोधात येथे आले तेव्हापासून ही सुरुवात झाली. त्यांच्या राहण्यासाठी जागा नव्हती आणि म्हणूनच त्यांच्यासाठी ही शवपेटीसारखी कॉफीन घरे प्रथम बांधली गेली. जरी त्या काळात ती घरे आकाराने थोडी मोठी असायची, परंतु परिस्थिती आजच्यापेक्षा वाईट होती. कारण तेव्हा हजारो चिनी प्रवासी येथे आले होते. अशा परिस्थितीत, त्यांच्या राहण्यासाठी जागा नव्हती. म्हणून लगेच बांधता येणारी ही कॉफीन घरे बांधली जायची. ती लोखंडाची बनलेली होती. उन्हाळ्यात त्या लोखंडी घरांना भट्टीचे स्वरूप यायचे, तर हिवाळयात अंग गोठवणाऱ्या बर्फाचे. कत्तलखान्यात बकऱ्या जशा पिंजऱ्यात ठेवल्या जातात, त्याच अवस्थेत स्थलांतरितांना येथे ठेवले जायचे.

आज या घरांत बरेच बदल झाले आहेत, परंतु इथल्या लोकांचे आयुष्य अजूनही तसेच आहे. मोकळा श्वास घ्यायलाही जागा नाही. आजही लोक जिवंत प्रेताप्रमाणे येथे राहत आहेत. कोविड काळात अशा ठिकाणी खूप वेगाने विषाणू पसरला गेला होता. अनेकजण मृत्युमुखी पडले. लवकर रुग्ण वाढत गेले, त्यामुळे खूप लवकर लॉकडाऊन लावावा लागला. आजही इथे कोविड लाट आल्यास नियंत्रण मिळवणे कठीण जाते.

असे असले तरी आजही इथे घरांसाठी प्रतिक्षायादी आहे. अनेकजण या प्रतीक्षेत आहेत की निदान डोक्यावर तरी छप्पर मिळेल. ज्या शहरात सर्वात मोठी, महागडी, अत्याधुनिक सोयी असलेली घरं बांधली जातात त्याच शहरात कॉफीन होमसारख्या घरांत बहुतांश लोकं राहतात. हा विरोधाभास खरंच वेदनादायक आहे.

 

लेखिका: शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required