computer

एकच रंग एका देशात राजेशाही, दुसऱ्यात पॉर्न, तिसरीकडे मत्सर दाखवतो? जाणून घ्या इतरही रंगांबद्दल!

कंपनीचा लोगो कोणत्या रंगात असावा, ब्रँडिंगमध्ये कोणकोणते रंग असावेत, यावर तुम्हाला इंटरनेटवर बरंच काही सापडेल. अगदी व्हिडीओपासून ते फोटोज, लेख, सगळंच आहे. रंगाच्या बाबतीत आपण फारच काळजी घेत असतो, पण तुम्ही कधी विचार केला आहे का तुम्ही निवडलेला रंग इतर देशातील नागरिकांसाठी कोणत्या अर्थाचा असतो?

समजा एखाद्या कंपनीने पिवळा रंग निवडला, तर फ्रेंच आणि चिनी ग्राहकांसाठी ते साफ चुकीचा संदेश देणारं ठरेल. फ्रान्समध्ये पिवळा रंग म्हणजे मत्सर, विश्वासघात, कमजोरी आणि विरोधाचं प्रतिक आहे. चीनमध्ये हाच रंग आंबटशौकीनांचा रंग म्हणून ओळखला जातो. तिथे पिवळा रंग म्हणजे पोर्नोग्राफीशी जोडलेला आहे.

थायलंड आणि आफ्रिकन देशात मात्र पिवळ्या रंगाला राजेशाही मान आहे. राजघराण्यातील व्यक्ती आणि उच्चपदस्थ लोकांचा रंग म्हणून पिवळा रंग ओळखला जातो.
मंडळी, हे झालं एका रंगाबद्दल. आता आपण आणखी काही मजेशीर उदाहरणं बघूया.

जांभळा रंग :

पाश्चिमात्य देशात जांभळा रंग म्हणजे राजेशाही आणि अध्यात्मिक रंग आहे, पण ब्राझील आणि थायलंड देशात जांभळा रंग शोक आणि दुःखाचा रंग समजला जातो.

काळा रंग :

अमेरिकेत काळा रंग म्हणजे सुसंस्कृत आणि गंभीर रंग आहे, तर आफ्रिकेत प्रौढत्व आणि पुरुषत्वाचं प्रतिक आहे.

पांढरा रंग :

हॉलीवूडच्या सिनेमात पांढऱ्या वेशातील नवरी तुम्ही नक्कीच बघितली असेल. हा पांढरा रंग पश्चिमेकडे पावित्र्याशी निगडीत आहे. तोच चीन, कोरिया आणि काही आशियाई देशांमध्ये अपशकून, मृत्यू आणि दुःखाचा रंग म्हणून ओळखला जातो. मृत्युच्या वेळी पांढरे कपडे घालण्याची प्रथा भारत आणि इतर आशियाई देशात आहे.

निळा रंग :

पश्चिमेकडे हा रंग पुरुषांशी जोडलेला आहे, पण चीनमध्ये मात्र तो स्त्रीत्वाचं प्रतिक म्हणून ओळखला जातो.

गुलाबी :

गुलाबी रंग नेहमीच स्त्रिया आणि मुलींशी जोडला जातो. दक्षिण अमेरिकेत मात्र गुलाबी रंग खासकरून इमारतींना देण्यात येणारा रंग आहे. त्यामुळे तो स्थापत्यशास्त्राशी जोडला गेलाय. असं म्हणतात की चीनमध्ये तर गुलाबी रंग कोणाला माहितीच नव्हता. पश्चिमेकडच्या देशांच्या प्रभावातून हा रंग चीनमध्ये आला. आजही तिथे गुलाबी रंग म्हणजे परकीय रंग असाच समज आहे.

एकंच रंग किती वेगवेगळ्या अर्थाने जगभर असू शकतो हे बघणं गमतीदार आहे, पण डिझाईनर्स आणि मार्केटिंगमध्ये काम करणाऱ्यांसाठी ही डोकेदुखी ठरू शकते. ज्या कंपन्यांना आपला व्यवसाय जगभरात न्यायचा आहे त्यांच्यासाठी योग्य रंगाची निवड करण्याचं मोठं आव्हान असतं.

काही कंपन्यांना या एका गोष्टीमुळे नुकसान पण झालंय. उदाहरणार्थ, पेप्सी कंपनी. पेप्सीने ५० च्या दशकात आपल्या उत्पादनाचा गडद निळा रंग बदलून फिकट निळा केला होता. त्यावेळी आग्नेय आशियातील देशांमध्ये पेप्सीचा खप कमी झाला होता. आग्नेय आशियात या रंगाचा अर्थ मृत्यू असा होतो.

पॅरीस येथील डिस्नेलँडला आपल्या ब्रँडिंगमधला जांभळा रंग काढून टाकावा लागला, कारण कॅथलिक युरोपियन लोकांमध्ये जांभळा रंग ख्रिस्ताच्या क्रुसावर चढवण्याशी जोडला गेला आहे.

 

आहे ना या रंगांची गंमत!! म्हणजे घरात जो गुण असतो तो अंगणात अवगुण असू शकतो.

 

आणखी वाचा :

रंग आधी की फळ ? 'ऑरेंज' नावाबद्दल ही गोष्ट माहित आहे का तुम्हाला ?

सबस्क्राईब करा

* indicates required