computer

१८५७ च्या पहिल्या स्वातंत्र्यसमरातील एका भारतीय गुप्तहेराची कहाणी!!

ही कहाणी एका गुप्तहेराच्या आयुष्यातील शेवटच्या रात्रीची आहे. उजाडणार्‍या दिवशी सकाळी त्याला फाशी देण्यात येणार होती. ही कथा अलीकडल्या काळातील नाही. ही कथा १८५७ च्या पहिल्या स्वातंत्र्ययुद्धात हेरगिरी करणार्‍या एका भारतीयाची आहे. ही कहाणी कानपूरच्या गाजलेल्या आणि इतिहासात अजूनही बरीच चर्चा होत असलेल्या 'बिबीघर' हत्याकांडाच्या बर्‍याच प्रश्नांची उत्तरे देते. पण हे आम्ही म्हणत नाही, तर तो हेर ज्या ब्रिटिश अधिकार्‍याच्या ताब्यात होता त्याच्या आत्मवृत्तात हा वृतांत आहे. चला तर वाचूया त्या रात्री काय घडले होते...

१८५८ साली कॉलीन कँपबेल लखनऊचा वेढा ऊठवण्यासाठी निघाला होता. तीस हजार सैनिक आणि दिडशे तोफा घेऊन निघालेल्या या सैन्याची छावणी ऊन्नावला पडली होती. कॉलीन कँपबेलच्या हाताखाली जे अधिकारी होते त्यापैकी एक अधिकारी फोर्ब्ज मिशेल (मिचेल) याने Reminiscences of the Great Mutiny: 1857-59 या पुस्तकात या भारतीय गुप्तहेराची कहाणी सांगितली आहे. त्याच्याच शब्दात ही कहाणी पुढे वाचूया! 

"एक दिवस सकाळी विशेष काम नसल्यामुळे विलायतेची काही वर्तमानपत्रे मी वाचत होतो. तेव्हा चहाबरोबर खाण्याच्या प्लम केक विकणारा फेरीवाला छावणीत आला. तो रुपाने तरुण, दिसण्यात सुरेख, वर्णाने गौर, कपाळ उंच, काळ्याभोर वळवलेल्या मिशा, डोळे पाणीदार, देशी सैन्यातील अधिकारी वाटावा असा होता. त्याच्या मागे एक उग्र चेहेर्‍याचा, तोंडावर देवीचे वण असलेला काळाकभिन्न मुसलमान हारेकरी डोक्यावर केकचा हारा घेऊन उभा होता.

मी त्याला विचारले, "कसे आहेत रे केक?"

त्यावर तो म्हणाला, "साहेब , खाऊन बघा. मग पैसे द्या."

"तू छावणीत फिरतो आहेस, परवाना आहे का तुझ्याकडे?", मी विचारले.

(फोर्ब्ज मिशेल)

उत्तरार्थ त्याने अ‍ॅड्रीयन या अधिकार्‍याने दिलेला पास दाखवला. तो परवाना रितसर होता. त्यावर त्याचे नाव जेमी ग्रीन असे लिहिले होते. थोडावेळ बसून त्याने माझ्याशी गप्पा मारायला सुरुवात केली. 

आमची फौज किती आहे? विलाययतेतील लोक या बंडाबद्दल काय म्हणतात? आमच्या फौजेला लखनऊचा उन्हाळा मानवेल का? अशा बर्‍याच चौकशा त्याने अस्खलीत इंग्रजीत विचारल्या. एक फेरीवाला इतके शुध्द इंग्रजी बोलताना बघून मी त्याला विचारले,

"तू इतके सफाईदार इंग्रजी कसे बोलू शकतोस?"

त्यावर तो म्हणाला, "माझा बाप युरोपियन लष्करात खानसामा होता. मी लहानपणी रेजिमेंटच्या शाळेत जात असल्याने मला इंग्रजी येते."

थोड्यावेळाने केक विकायला तो निघाला तेव्हा जाताना त्याने इंग्रजी वर्तमानपत्रे मागून नेली. 

पुढच्या छावणीत म्हणजे होप ग्रँटच्या छावणीत पोहचल्यावर तो हेर आहे हे लक्षात आले. त्याला आणि त्याच्या हारेकर्‍याला अटक करण्यात आली. त्यांचे ताबडतोब कोर्ट मार्शल करण्यात आले आणि फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. रात्र झाल्याने त्या दिवशी शिक्षा अंमलात आणणे शक्य झाले नाही. दुसर्‍या दिवशीच्या सकाळपर्यंत त्या हेराचा म्हणजे जेम्स ग्रीनचा ताबा मिशेलकडे देण्यात आला. सकाळी जो आकर्षक व्यक्तिमत्वाचा फेरीवाला आपल्याकडे आला होता आणि अगदी काही वेळातच मित्र बनलेला जेम्स ग्रीन हेर निघाल्याचे समजल्यावर फोर्ब्ज मिशेलला वाईट वाटले. नाव जेमी ग्रीन असले तरी तो मुसलमान होता हे समजल्यावर फोर्ब्जला आणखीनच धक्का बसला. 

 

त्या काळी हेराला फाशी द्यायची असेल त्या हेराला धर्मभ्रष्ट करून त्याची विटंबना करण्याची प्रथा ब्रिटिश सैन्यात होती. त्यानुसार काही सैनिक डुकराचे मटण आणण्यास धावले तेव्हा फोर्ब्जने त्यांना तसे करण्यास मनाई केली. हे बघितल्यावर जेम्स ग्रीनचा फोर्ब्जबद्दलचा आदर फारच वाढला. फोर्ब्ज मिशेलने त्या कैद्याची ही शेवटची रात्र आहे असा विचार करून संध्याकाळच्या नमाजानंतर त्यांच्यासाठी मिठाई मागवली. त्यांच्या बेड्या थोड्या सैल केल्या. उरल्या रात्रीच्या काही तासांत त्या हेराने त्याच्या आयुष्याची कहाणी सांगितली ती त्याच्याच शब्दात आता वाचूया!

साहेब, मला एखादा हेर किंवा क्षुद्र चहाडखोर मनुष्य समजू नका. बेगमेच्या फौजेतला मी वरिष्ठ दर्जातला ऑफिसर आहे. लष्करी चीफ इंजिनीअरचे माझे काम असून लखनौला वेढा घालणाऱ्या तुमच्या सैन्याची बारीकरीतीने पाहणी करण्याकरिता मी आलो होतो, पण वेळ वाईट म्हणून दुर्दैवाने तुमच्या हाती पडलो. माझे खरे नाव महम्मद आली खान. जेमी ग्रीन हे माझे खरे नाव नाही. मी विलायतेतील लंडन व एडिंबरो पाहिले आहे.

(रुरकी कॉलेज)

रोहिलखंडच्या उच्च सरदार घराण्यात माझा जन्म झाला. रुरकीच्या कॉलेजमध्ये मी इंजिनियर झालो. अयोध्येचा नबाब नासिरूद्दीन यांच्याकडे नोकरी करावी असा माझा बेत होता. इतक्यात नेपाळच्या जंगबहादूर बरोबर त्याचा खाजगी चिटणीस म्हणून विलायतेस जाण्याचा माझा योग जमून आला. एडिंबरोला ९३ हायलॅन्डर पलटणीने मोठी परेड करून स्वागतार्थ सलामी दिली होती. दुर्दैवाने त्याच पलटणीच्या हाती सापडून मी हेर म्हणून फाशी जातो आहे.

(९३ हायलॅन्डर पलटण)

विलायतेत काही दिवस राहिल्यानंतर मी हिंदुस्थानात परत आलो. अनेक राजदरबारी काम केले. १८५४ साली नानासाहेबांचे वकील अजीमुल्ला खान यांच्यासोबत पुन्हा विलायतेस गेलो. विलायतेत मोठमोठ्या लोकांच्या ओळखी झाल्या, पण नानासाहेबांच्या पेन्शनच्या कामाचे मुळीच जमले नाही. आम्ही विलायतेत याकरिता ५०,००० पाउंड खर्च केले. नंतर मी इस्तंबूल मार्गे १८५५-५६ च्या दरम्यान परत आलो. क्रिमीयात रशियाविरुद्ध लढत असलेली इंग्रज व फ्रेंच फौज किती भिकार आहे, हे पाहून मला नवल वाटले. याच वास्तव्यात रशियातर्फे काही बडे व्यक्ती आम्हास येऊन भेटल्या व हिंदुस्थानात आम्ही बंड उभारले तर रशियाकडून फार मोठी मदत मिळेल असे त्यांनी खात्रीपूर्वक वचन दिले. तेव्हा आम्ही हिंदुस्थानात कट करण्याचा बेत केला. खुदाच्या दयेने यशही आले. तुम्ही आज जी वर्तमानपत्रे मला दिली त्यावरून दिसते की कंपनी सरकारची लुटारुपणा करण्याची सनद पूढे चालू राहणार नाही. हिन्दुस्थान जरी आम्ही स्वतंत्र करू शकलो नाही, तरी आमच्या हातून देशहित घडले. राणी सरकारच्या हाताखाली कंपनी सरकारपेक्षा अधिक बरे दिवस येतील अशी आशा वाटते, पण ते दिवस पाहण्यास मी राहणार नाही. 

(अजीमुल्ला खान)

बंडात जे अमानुष अत्याचार झाले ते मनात आले, की शरम वाटते. या छावणीत मी आलो ते इंग्रजांविरुद्ध द्वेष आणि शत्रुत्व बाळगून, पण तुम्ही जी माणुसकी मला दाखवली त्याने मी लाचार झालो. गंगेच्या घाटावर असेच उदाहरण घडले. नदीवरची देवळे नेपिअर उडवून देत असताना काही ब्राह्मणांनी विनंती केली की देवळांचे रक्षण करा. त्यावर नेपिअर म्हणाला की, "इंग्रज बायका मुलांचा कानपुरात घात होत असताना तुमच्यापैकी एकाने जरी त्याविरुद्ध प्रयत्न केला असला किंवा नापसंती दर्शवली असली तर पुढे येऊन सांगा. म्हणजे मी देऊळ सोडून देईन." हे शब्द ऐकण्यास मी समक्ष तिथे होतो. नामुष्कीची गोष्ट अशी की एक देखील ब्राह्मण तसे म्हणणारा पुढे आला नाही.

यानंतर रात्रभर जेमी ग्रीन उर्फ महम्मद अली खान विल्यम फोर्ब्ज मिशेल याच्याशी बोलतच राहिला. ते संभाषण आपण पुढच्या भागात वाचूया.

सबस्क्राईब करा

* indicates required