computer

ग्राहकांच्या सोयीसाठी १ ऑक्टोबरपासून डिजिटल ऑटो पेमेंट नियमांत हे बदल झाले आहेत..

बोभाटा नेहमी आपल्या वाचकांना बँका किंवा कुठल्याही अर्थविषयक होणाऱ्या नवीन नियम आणि बदलांविषयी माहिती देत असतो. येत्या १ ऑक्टोबरपासून सुद्धा काही महत्वाचे बदल होणार आहेत. हे नियम डिजिटल पेमेंट संबंधित आहेत. सध्या डिजिटल पेमेंट करणे सोपे झाले आहे. यासंबंधी काही तक्रारी वाढल्यास RBI नवे नियम लागू करते. त्यामुळे हे नियम समजून घेणे गरजेचे आहे.

पुढील महिन्यापासून म्हणजेच १ ऑक्टोबरपासून ऑटो डेबिट पेमेंट सिस्टीममध्ये मोठा बदल होणार आहे. नवीन नियमानुसार, पेटीएम-फोन पे (Bank, paytm ,phone pay,g pay) सारख्या बँका आणि डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्मला प्रत्येक वेळी हप्ता (ईएमआय हप्ता) किंवा बिलाचे पैसे कापण्यापूर्वी परवानगी घ्यावी लागेल. म्हणजे तुमच्या क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डमधून जे ऑटो डेबिट होते, ते आता तुमच्या परवानगीशिवाय होणार नाही.

फोनच्या ॲपमध्ये बरेचदा ऑटो डेबिट मोडमध्ये वीज, गॅस, एलआयसी, टिव्ही रिचार्ज याचे खर्च ठेवले जातात. म्हणजे एका विशिष्ट तारखेला दिलेल्या खात्यातून पैसे आपोआप कापले जातात. पण आता नव्या नियमानुसार त्याची प्रक्रिया खालील प्रमाणे बदलणार आहे.

५०००रुपये आणि त्यापेक्षा जास्त ऑटो पेमेंटच्या व्यवहारांच्या २४ तास आधी बँका एसएमएस, ईमेल इत्यादीद्वारे ग्राहकांना सूचना पाठवतील. त्यासाठी तुमचा सक्रिय मोबाईल क्रमांक बँकेत अपडेट करणे आवश्यक आहे. त्याचसोबत तुम्हांला आणखी काही माहिती द्यावी लागेल. माहितीमध्ये व्यवहाराची रक्कम, डेबिटची तारीख, ती का डेबिट केली जाते, कोणाकडे हे घडत आहे यासारखे तपशील असतील.

ग्राहकाला व्यवहार मंजूर किंवा नाकारण्याचा पर्याय असेल.

जेव्हा ग्राहक दिलेल्या प्रक्रियेचे पालन करून पेमेंटला मान्यता देईल तेव्हाच पैसे कापले जातील.

वरची प्रक्रिया म्युच्युअल फंडांच्या एसआयपीचे ऑटो पेमेंट, विम्याचे प्रीमियम इत्यादींवर लागू होणार नाही. यासाठी बँक नोंद ठेवणार आहे. एकदा परवानगी दिल्यावर प्रत्येक वेळी पैसे आपोआप कापले जाऊ नयेत, यासाठी बँकाना त्यांच्या व्यवस्थेत बदल करावे लागणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) यापूर्वी म्हटले होते की, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, युनिफाइड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) किंवा इतर प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्स (पीपीआय) वापरून वारंवार होणाऱ्या व्यवहारांसाठी अतिरिक्त फॅक्टर ऑथेंटिकेशन (AFA) आवश्यक असतील.

आरबीआयने बँकिंग ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी हे महत्वाचे नियम केले आहेत. सध्याच्या प्रणालीनुसार डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म किंवा बँका ग्राहकांकडून परवानगी घेतल्यानंतर कोणतीही माहिती न देता दर महिन्याला ग्राहकांच्या खात्यातून वजा करतात. यामुळे अनेकदा तक्रारी येतात. त्यामुळे ग्राहकांची सुरक्षा लक्षात घेऊन हे बदल करण्यात येणार आहेत.

यामुळे खिशातली रक्कम कापली जाईल, पण ती तुम्ही मान्यता दिल्यावरच. हा बदल खूप महत्वाचा होता. १ ऑक्टोबर पासून हा लागू होणार आहे. त्यामुळे सतर्क रहा आणि व्यवहार करताना जागरूक रहा.

शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required