रेल्वे स्टेशनवरचा हमाल ते कलेक्टर होण्याचा प्रेरणादायी प्रवास!! 'केल्याने होत आहे रे..'

'केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे' ही उक्ती सिद्ध करणारे अनेक यशस्वी लोक आपल्या आजूबाजूला दिसतात. प्रचंड कठीण परिस्थिती असताना ही लोक अशा ठिकाणी झेप घेतात जिथे सर्व सोयीसुविधा असूनही जाणे कित्येकांना साध्य झालेले नसते. आज आपण श्रीनाथ के. नावाच्या एकेकाळी रेल्वे स्टेशनवर हमाल म्हणून काम करणाऱ्या तरुणाची गोष्ट वाचणार आहोत. या अवलियाने किती मोठी झेप घ्यावी? तर थेट कलेक्टर होण्यापर्यंत...

केरळ येथील मुन्नार येथे राहणाऱ्या श्रीनाथ यांच्या घरात एकमेव कमावते व्यक्ती ते स्वतः होते. कुटुंब सुरळीत चालावे म्हणून त्यांनी एर्नाकुलम रेल्वे स्टेशनवर कुली म्हणून काम करण्यास सुरुवात केली. २०१८ साली त्यांनी ठरवले की जे दिवस आपण बघितले ते आपल्या मुलीच्या वाट्याला येऊ नयेत. त्यांनी आता थेट स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला.

स्पर्धा परीक्षा द्यायच्या म्हणजे वेळ आणि पैसा दोन्ही हवा. दिवसभर इतके मेहनतीचे काम करून अभ्यासासाठी वेळ काढणे तर कसेबसे शक्य होईल, पण कोचिंग क्लासची फी भरणे त्यांना शक्य नव्हते. यासाठी मात्र त्यांनी आगळावेगळा उपाय शोधून काढला. स्पर्धा परीक्षा पास व्हायचे म्हणजे परिक्षेची तयारी आपोआप होईल असा त्यांचा विचार होता. हार्डवर्कसोबतच स्मार्टवर्क तितकेच गरजेचे असते.

श्रीनाथ यांच्या मदतीला स्मार्टफोन धावून आला. रेल्वे स्टेशनवर काम करताना ते इंटरनेटवर असलेले मोफत क्लास करू लागले. रेल्वे ग्रुप डी पासून सर्व परीक्षा देण्याचा त्यांचा प्रयत्न होता. यातून पहिल्यांदा त्यांनी केरळ लोकसेवा आयोगाची परीक्षा पास केली. रेल्वे स्टेशनवर काम करणारा एक सामान्य कुली आता अधिकारी झाला होता.

तसे पाहायला गेले तर श्रीनाथ यांच्या आयुष्यातील अडचणी आता सुटल्या होत्या. पण इथेच थांबणे त्यांना पसंत नव्हते. त्यांनी आता यूपीएससीत धडक देण्याचा निर्णय घेतला. एकामागोमाग प्रयत्न सुरू होते पण यश काय दिसत नव्हते. शेवटी चौथ्या प्रयत्नात त्यांनी यूपीएससी पास करत भारतातील सर्वाधीक प्रतिष्ठीत परीक्षा पास करून दाखवली.

रात्रभर अभ्यास आणि दिवसभर भार वाहणे असे काम करून श्रीनाथ यांनी हा कलेक्टर होण्यापर्यंतचा प्रवास पूर्ण करून दाखवला आहे. श्रीनाथ यांच्याकडे बघून निश्चितपणे म्हणावे वाटते, "कौन कहता है आसमान मै सुराग हो नई सकता, एक पत्थर तो तबियत से उछालो यारों..."

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required