computer

जगातले सोन्याचा सर्वाधिक साठा असलेले १० देश! आपला भारत या यादीत कुठे आहे?

वैयक्तिक पातळीवरच नव्हे, तर देशाच्या आर्थिक संकटातसुद्धा "सोनं" महत्वपूर्ण भूमिका बजावतं. म्हणूनच प्रत्येक देश जमेल त्या प्रमाणात सोन्याचा साठा करून ठेवत असतो. देशाच्या मध्यवर्ती बँकेत हा सोन्याचा साठा केला जातो. राखीव ठेवींच्या व्यवस्थापनात ही मध्यवर्ती बँक महत्वपूर्ण भूमिका बजावते. देशातील सार्वजनिक बॅंकांनासुद्धा मालमत्ता म्हणून काही प्रमाणात सोनं देशाच्या मध्यवर्ती बँकेत जमा करावे लागते. म्हणजेच देशाची आर्थिक घडी नीट रहावी यासाठी सोन्याचा साठा असणं हे प्रत्येक देशासाठी महत्वाचं आहे. इतर कोणत्याही गुंतवणूकीच्या तुलनेत सगळ्यात जास्त महसूल हा सोन्यात गुंतवणूक केल्यामुळे मिळतो. त्यामुळे सोन्याचा साठा ही कोणत्याही देशासाठी महत्वाची संपत्ती आहे. असे अनेक देश या संपत्तीने समृद्ध आहेत. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने जगातील सोन्याचा सर्वाधिक साठा असलेल्या पहिल्या दहा देशांची यादी जाहीर केली आहे. मग बघायचं का आपला भारत त्या यादीत आहे की नाही?

१. अमेरिका : ८१३३.५ टन सोने


सोन्याचा साठा सर्वात जास्त असलेल्या देशांमध्ये अमेरिका हा देश तब्बल ८१३३.५ टन सोने इतक्या साठ्यासह अव्वल स्थानावर आहे. हा साठा "युनायटेड स्टेट्स बुलियन डिपॉझिटरी" नावाच्या इमारतीमध्ये असतो. त्याचे नाव "फोर्ट नॉक्स" असे आहे. अमेरिकेचे ट्रेझरी डिपार्टमेंट त्याचे व्यवस्थापन करते. या तिजोरीत सोन्याच्या साठ्यासोबतच सरकारच्या मालकीच्या किंवा त्याच्या ताब्यात असलेल्या इतर मौल्यवान वस्तूही आहेत. याची सुरक्षा कडेकोट असते.

२. जर्मनी : ३३६२.४ टन सोने

 

सोन्याचा साठा ठेवण्याच्या बाबतीत जर्मनी जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलनुसार जर्मनीकडे ३,३६२.४ टन सोने आहे. युरोपियन देशांबद्दल बोलायचं तर सोने साठवण्याच्या बाबतीत जर्मनी पहिल्या स्थानावर आहे. जर्मनीच्या मालकीचे सोन्याचे साठे हे फ्रँकफर्ट ॲम मेन येथील दॉइश बुंडेसबँक, फेडरल रिझर्व्ह बँकेची न्यूयॉर्क शाखा आणि लंडनमधील बँक ऑफ इंग्लंड येथे आहेत.

३. इटली : २४५१.८ टन सोने


गोल्ड रिझर्व्ह ठेवण्याच्या बाबतीत इटली तिसऱ्या क्रमांकावर आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलनुसार इटलीमध्ये २४५१.८ टन सोने आहे. इटलीच्या अधिकृत साठ्याचे व्यवस्थापन "बँक ऑफ इटली" ही बॅंक करते. देशाच्या अधिकृत परकीय चलन आणि सोन्याच्या साठ्याची सगळी जबाबदारी आणि हक्क हे "बँक ऑफ इटली"कडे आहेत. बहुतेक सोने हे बारच्या रुपात (एकूण ९५४९३ बार) आहेत, पण अचूक मोजमापासाठी काही नाणीही टाकली जातात.

४. फ्रान्स : २४३५.७ टन सोने


गोल्ड रिझर्व्ह ठेवण्याच्या बाबतीत फ्रान्स जगात चौथ्या क्रमांकावर आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या मते फ्रान्सकडे २४३५.७ टन सोने आहे. गेल्या काही वर्षांत फ्रान्सच्या मध्यवर्ती बँकेने फारच कमी सोने विकले आहे आणि ते पूर्णपणे बंद करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याचाच परिणाम म्हणून २४३५.७ टन सोन्याच्या साठ्यासह फ्रान्स यादीत चौथ्या स्थानावर आहे.

५.रशिया : २२९९.९ टन सोने


२०१८ मध्ये चीनलासुद्धा मागे टाकत वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने जाहीर केलेल्या यादीत रशियाने पाचव्या क्रमांकावर आपलं स्थान निश्चित केले आहे. २०१७ मध्ये रशियाने २२४ टन सोने खरेदी केले होते. गेल्या तीन वर्षांत रशियाने आक्रमकपणे आपला परकीय साठा अमेरिकन डॉलरमधून आणि सोने आणि इतर चलनांमध्ये हलवला आहे. गेल्या सात वर्षांपासून रशियन सेंट्रल बँक सोन्याची सर्वात मोठी खरेदीदार आहे.

६. चीन : १९४८.३ टन सोने


सोन्याच्या साठ्याच्या बाबतीत चीन सहाव्या क्रमांकावर आहे. जागतिक सुवर्ण परिषदेच्या मते चीनकडे १९४८.३ टन सोने आहे.

७. स्वित्झर्लंड : १०४०.०० टन सोने


जगातील सर्वात जास्त दरडोई सोन्याचा साठा असलेला स्वित्झर्लंड हा सातव्या क्रमांकावर आहे. इथे तब्बल १०४०.०० टन सोने आहे. दुसऱ्या महायुद्धादरम्यान मित्र राष्ट्र आणि विरोधी राष्ट्र या दोन्हींबरोबर तटस्थ भूमिका घेत स्वित्झर्लंड युरोपच्या सोन्याच्या व्यापाराचा केंद्रबिंदू बनला होता.

८.जपान : ७६५.२ टन सोने


जानेवारी २०२१ पासून फेब्रुवारी २०२२ पर्यंत जपानचा सोन्याचा साठा मोठ्या प्रमाणात घसरत होता. तरी सुद्धा जपान हा आठव्या क्रमांकाचा सर्वात मोठा सोन्याचा साठा करणारा देश ठरला आहे. जपान हा जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणाऱ्या देशांपैकी तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे.

९. भारत : ६७६.६१ टन


वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने जाहीर केलेल्या यादीत भारत जगात नवव्या क्रमांकावर आहे. भारताकडे तब्बल ६७६.६१ टन इतका सोन्याचा राखीव साठा आहे. भारतातील नागरिक आणि येथील मंदिरांमध्ये जास्त सोने आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा सोन्याचा आयातदार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या माहितीनुसार डिसेंबरमध्ये भारतातील सोन्याचा साठा १.००८ अब्ज डॉलरने वाढून ३७०२० अब्ज झाला आहे. भारतातील २०२० च्या चौथ्या तिमाहीत हा सोन्याचा साठा ६६८.२५ टन होता तो वाढून ६७६.६१ टन इतका झाला.

१०. नेदरलँड : ६१२.५ टन सोने


वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने जाहीर केलेल्या यादीत नेदरलँडकडे ६१२.५ टन इतके सोने आहे. सोन्याच्या राखीव साठ्यासह हा देश दहाव्या स्थानावर आहे. अपुऱ्या सुरक्षिततेच्या कारणास्तव त्यांच्या सोन्याच्या तिजोरी अ‍ॅमस्टरडॅम ते कॅम्प न्यू ॲमस्टरडॅम येथे हलवण्यात आल्या. हा साठा डच सेंट्रल बँकेच्या व्यवस्थापनाखाली येतो.

एकेकाळी सोन्याचा धूर निघणारा आपला भारत या यादीत असायलाच हवा होता, नाही का?

शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required