बिल गेट्स आणि जेफ बोझेस फिके पडतील इतका पैसा भारतात या कुटुंबाकडे होता.. पण मग कुठे आणि काय चुकलं?
एलॉन मस्क, बिल गेट्स, जेफ बोझेस... यांच्यात समान काय आहे? तर त्यांनी मिळवलेली अतिप्रचंड संपत्ती. तसे आपल्या भारतातले उद्योगपतीही मागे नाहीत, पण पैशाचा न आटणारा ओघ कुठे असेल तर तो या लोकांकडे. आपण उभ्या केलेल्या साम्राज्याच्या जोरावर ही मंडळी जगातल्या अतिश्रीमंत लोकांच्या यादीमध्ये टॉप पोझिशनला आहेत.
पण पूर्वी हा मान भारतानेही मिळवला आहे हे तुम्हाला माहीत आहे का?
भारताला पूर्वी 'सोने की चिडिया' असं म्हटलं जायचं. होय, भारत सांस्कृतिकदृष्ट्या जितका संपन्न होता, तितकाच भौतिक दृष्ट्याही श्रीमंत होता. मोजता येणार नाही इतकी अफाट संपत्ती असलेली अनेक भारतीय कुटुंबं पूर्वी भारतात नांदत होती. त्यांपैकीच एक म्हणजे जगत शेठ. शेठ कुटुंब जगातल्या सर्वाधिक श्रीमंत कुटुंबांपैकी एक म्हणून गणलं जात होतं. जगत शेठ यांचं मूळ नाव शेठ फतेहचंद होतं. दागदागिन्यांनी मढलेल्या त्यांच्या पोर्ट्रेटवरूनच त्यांच्या ऐश्वर्याची कल्पना येते.
फतेहचंद यांना 'जगत शेठ' ही उपाधी मुगल बादशाह मोहम्मद शाह याने १७२३ मध्ये दिली. त्यानंतर समाजातली त्यांची ओळख बदलली. त्यांच्या कुटुंबाला लोक जगत शेठचं कुटुंब म्हणून ओळखू लागले. अठराव्या शतकाच्या सुरुवातीला बंगालमधल्या अत्यंत श्रीमंत बँकर म्हणून प्रसिद्ध असलेल्या जगत शेठ यांना जगाचे बँकर म्हणून नावलौकिक मिळाला.
या घराण्याचे मूळ पुरुष शेठ माणिकचंद आहेत असा लोकांचा विश्वास आहे. जगत शेठ मेहताब राय यांचे पूर्वज मारवाडचे रहिवासी असल्याचे लोक मानतात. १६५२ मध्ये या कुटुंबातल्या हिरानंद साहू यांनी मारवाड सोडून पाटण्याची वाट धरली.
जगत शेठ यांची श्रीमंती समजण्यासाठी आपल्याला काही गोष्टी समजून घ्याव्या लागतील. काही उपलब्ध स्रोतांनुसार १७२० च्या सुमारास जगत शेठची संपत्ती ही तत्कालीन ब्रिटिश अर्थव्यवस्थेपेक्षाही अधिक होती. आजच्या हिशोबाने बोलायचं तर त्यांची एकूण मालमत्ता ९९ लाख कोटी रुपये किंवा त्यापेक्षा जास्त होती. ब्रिटिश कागदपत्रांनुसार त्या काळच्या सगळ्या ब्रिटिश बँकांमधील संपत्ती एकत्र केली तरी ती संपत्तीदेखील जगत शेठच्या संपत्तीपेक्षा कमीच होती. पण मुळात त्यांच्याकडे एवढी संपत्ती कुठून आली?
तर हिराचंदचा मुलगा माणिकचंद साहू याची बंगालचा पहिला नवाब मुर्शिद कुलीखान याच्याशी मैत्री होती. साहू किंवा शेठ कुटुंबाची स्वातंत्र्यपूर्व भारतातल्या प्रत्येक महत्त्वाच्या शहरात कार्यालयं होती आणि ही सगळी कार्यालयं आधुनिक बँकांच्या अतिशय जवळची होती. शिवाय विविध शहरांमधले व्यवहार पार पाडण्यासाठी त्यांच्याकडे संदेशवहन करणारी यंत्रणाही होती. परिणामी नवाब आणि ब्रिटिशांनीही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पैसा पाठवण्यासाठी साहूंच्या या यंत्रणेची मदत घ्यायला सुरुवात केली. याच्या जोडीला देशातील छोट्या राजसत्तांविरोधात पोर्तुगीज, ब्रिटिश, फ्रेंच लोकांना आर्थिक साहाय्य करूनही त्यांनी बरंच उत्पन्न मिळवलं.
या परिवाराचा शेवटचा काही काळ मात्र काहीसा विचित्र गेला. अनेक भारतीय राजे आणि ब्रिटिशांशी त्यांचे छुपे व्यवहार होते. त्यातूनच मीर कासीम याने मेहताब राय आणि त्याचा भाऊ स्वरूपचंद यांचं अपहरण केलं. तेही १७६४ मध्ये झालेल्या बक्सारच्या लढाईच्या तोंडावर. नंतर त्याने त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप ठेवून त्यांना गोळी मारून ठार केलं. मृत्यूसमयी मेहताब राय जगातला सर्वात श्रीमंत माणूस होता. या दोघांनी प्लासीच्या लढाईत दोन दगडांवर पाय ठेवला. एकीकडे त्यांनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला समर्थन दिलं, तर दुसरीकडे नवाबाच्या लष्कराला पैसा पुरवला. पण नवाबाला त्यांनी ब्रिटिशांविरोधात रणनीती वगैरे आखण्यात मदत केली नाही.
मेहताब राय आणि स्वरूपचंद यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या राज्याचे छोटे छोटे तुकडे झाले. त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या बऱ्याचशा जमिनीवरचा ताबा त्यांनी गमावला. दुसरीकडे ईस्ट इंडिया कंपनीने त्यांच्याकडून घेतलेली कर्जाची रक्कमही त्यांना परत मिळाली नाही. १८५७ च्या उठावाने त्यांचं कंबरडं मोडलं.
१९०० पर्यंत हे साम्राज्य लयाला गेलं. त्यांच्या खुणाही हळूहळू पुसल्या गेल्या. जनतेच्या नजरेतून सगळा परिवारच कुठे नाहीसा झाला. मुगलांप्रमाणेच त्यांचे वंशज आजही अज्ञात आहेत. ते कुठे असतात, काय करतात हे कोणालाही माहिती नाही. हजारदुआरी (१००० दरवाजे असलेला महाल) जवळ असलेलं शेठ यांचं निवासस्थान आता एक संग्रहालय बनलं आहे.
हव्यासापोटी, आपलं भलं करण्याच्या नादात दोन्ही दगडांवर पाय ठेवायला गेले नसते तर शेठ कुटुंबाचं चित्र कदाचित वेगळं दिसलं असतं... कुणी सांगावं?
स्मिता जोगळेकर




