नातं टिकावं म्हणून त्यांनी हातांना बेड्या का ठोकल्या? ह्या जोडप्याने केलेला भन्नाट उपाय व्हायरल होतोय !!

आपल्याकडे लग्नात एक पद्धत आहे, नवरा नवरीची गाठ बांधली जाते. लग्नगाठ बांधल्यावर असं म्हणतात की ही गाठ कधीही सोडू नका, कायम एकत्र रहा, सुख-दुःखात एकमेकांची साथ देत संसार करा. मग फेरे घेतले जातात. म्हणजे ही प्रथा फक्त प्रतिकात्मक असते, खऱ्या आयुष्यात कोणी नवरा बायको खरंच एकमेकांना असे दोरीने बांधत नाहीत. पण एका नवरा बायकोच्या जोडीने एकमेकांना खरंच असं बांधलं आहे, आणि तेही चक्क बेड्या घालून.
युक्रेनची ही अजब जोडी आहे, अलेक्झांडर आणि व्हिक्टोरिया यांची. अलेक्झांडर हा ३२ वर्षांचा आहे तर व्हिक्टोरिया ही २८ वर्षांची आहे. १४ फेब्रुवारी म्हणजे ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी त्यांनी एकमेकांचे हात बेडीने बांधून घेतले. त्यांच्यात आधी सतत भांडण व्हायचे. मग वाद इतका विकोपाला जायचा की दोघे एकमेकांचे तोंड बघणेही टाळायचे. मग याचा शेवट ब्रेकअपने व्हायचा. काही दिवसांनी चूक कळली की परत एकत्र यायचे. शेवटी या सततच्या वादाला कंटाळून त्यांनी ठरवलं की एकत्रच राहायचं आणि एकमेकांना समजून घ्यायचं.
आणि आश्चर्य म्हणजे त्यांनी १४ तारखेला हातात घातलेली बेडी अजून एकदाही काढली नाही.सकाळी उठल्या पासून रात्री झोपेपर्यंत त्यांचे हात बांधलेले असतात. त्यांनी इंस्टाग्रामवर त्यांचे अनुभव जेव्हा पोस्ट करायला सुरुवात केली तेंव्हापासून आजपर्यंत त्यांचे फॉलोअर्स वाढले आहेत. स्वतःचे काही व्हिडीओही त्यांनी पोस्ट केले आहेत. एकत्र ब्राशिंग, स्वयंपाक करणे, जेवणे, बाजारात भाजी आणायला जाणे अशी अनेक कामं ते करताना पाहायला मिळतात. आधी अवघड जायचे पण आता त्यांना सवय होतेय आणि न बोलताही कामं होतात.
अर्थात भांडणं थांबली आहेत असं नाही. अजूनही वाद होतात, पण एकमेकांना समजून घेणं सोपं जातं, असं त्यांचं म्हणणं आहे. ३ महिने त्यांना हा प्रयोग करायचा आहे. आता एक महिना झालाय. पुढे २ महिने त्यांचं प्रेम अजून घट्ट होईल का अजून वाद वाढतील हे आपण भविष्यावरच सोडूया
तुम्हाला काय वाटतं? ही कल्पना कशी वाटली?
लेखिका: शीतल दरंदळे