computer

एफबीआयने एक खोटं शहर वसवलंय? ते आणि कशासाठी??

अमेरिकेतल्या या शहरात मागच्या ३० वर्षांमध्ये सगळ्या प्रकारचे गुन्हेगार निपजले आहेत. अगदी अंमलीपदार्थांच्या तस्कारांपासून ते बँकेत दरोडा घालणारे, चोर, लुटारू आणि दहशतवादी सुद्धा. या ठिकाणाला अमेरिकेतील गुन्हेगारांची राजधानी म्हटलं जातं...पण हे शहरात अमेरिकेच्या नकाशावर कुठेच दिसत नाही.

आम्ही बोलत आहोत अमेरिकेतील होगन्स अॅले बद्दल. या शहराची लोकसंख्या शून्य आहे. आता तुम्ही म्हणाल आम्ही आधी सांगितलं इथे गुन्हेगार राहतात आणि आता सांगतोय की इथे कोणीच राहत नाही. हा काय प्रकार आहे? तर, खरी गोष्ट म्हणजे हे एक खोटं शहर आहे.

अमेरिकेतील एफबीआयच्या पोलीस यंत्रणेच्या प्रशिक्षणासाठी व्हर्जिनिया येथे हे शहर तयार करण्यात आलं आहे. या शहरात अभिनेते/अभिनेत्री गुन्हेगार, बळी, सामान्य नागरिक अशी वेगवेगळी पात्रं वठवतात. या कलाकारांना घेऊन एक गुन्हा रचला जातो. मग एफबीआयचे शिकाऊ जवान तो गुन्हा सोडवतात. अगदी खऱ्या केसमध्ये केला जातो तसा तपास केला जातो, पुरावे गोळा केले जातात, संशयितांना प्रश्न विचारले जातात,आणि गुन्हेगारांना अटक पण केली जाते.

होगन्स अॅले शहर कधी अस्तित्वात आलं?

१९८६ साली एका घटनेने होगन्स अॅले शहराला जन्म दिला. ही घटना मायामी येथे घडली. बँकेत दरोडा घालून पाळणाऱ्या संशयित दरोडेखोरांना एफबीआय अधिकाऱ्यांनी रोखून धरलं होतं. पण या घटनेत दरोडेखोरांनी एफबीआय अधिकाऱ्यांवर मात केली. चकमकीत २ एफबीआय अधिकारी मारले गेले, तर ५ जण जखमी झाले. एफबीआयच्या एका स्पेशल एजंटने या दिवसाला ‘विनाशकारी दिवस’ म्हटलं होतं.

जर एफबीआयच्या अधिकाऱ्यांना ही परिस्थिती कशी हाताळावी याचं योग्य प्रशिक्षण मिळालं असतं तर ही दुर्दैवी घटना घडली नसती, हा विचार करून होगन्स अॅले शहर उभारण्यात आलं. तेव्हापासून एफबीआय व इतर एजन्सीजच्या शिकाऊ उमेदवारांना या खास शहरात आधी प्रशिक्षण देण्यात येतं आणि मग त्यांची रवानगी खऱ्या जगात होते..

होगन्स अॅले हे व्हर्जिनियाच्या क्वांटिको भागात ६० एकर जागेत पसरलं आहे. कोणत्याही शहरात असतील अशा सगळ्या गोष्टी या शहरात आहेत. हॉटेल, बँक, बार, सिनेमागृह, तलाव, घरं, दुकानं, गोदाम. इत्यादी. यातल्या बऱ्याचशा गोष्टींची नावे एफबीआयच्या इतिहासातून घेतलेली आहेत.

होगन्स अॅले हे नाव १८०० सालच्या ‘यलो कीड’ नावाच्या कॉमिक बुक मधून घेण्यात आलं आहे. हेच नाव का निवडलं? तर, त्यालाही मोठं कारण आहे. पुस्तकातील होगन्स अॅले शहरातपण गुन्हेगारी आणि क्रूरता दाखवण्यात आली होती.

सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे या शहरात अभिनेते/अभिनेत्री वेगवेगळी पात्र वठवतात.खरं वाटेल असे गुन्हे आणि त्यांची तपास मोहीम आखली जाते. होगन्स अॅलेचं एक वैशिष्ट्य म्हणजे दरवेळी प्रशिक्षणाची नवीन पद्धत आखली जाते. खऱ्या जगात घडणाऱ्या गुन्ह्यांशी हे गुन्हे मिळतेजुळते असतात. सर्व कारवाई संपल्यावर शिकाऊ जावांना प्रतिक्रिया आणि सूचना दिल्या जातात.

तर मंडळी, गुन्हे कमी करण्यासाठी आणि ते योग्य पद्धतीने हाताळण्यासाठी एफबीआय ने तयार केलेल्या होगन्स अॅलेची कल्पना तुम्हाला कशी वाटली ? तुमच्या प्रतिक्रिया नक्की द्या

सबस्क्राईब करा

* indicates required