computer

‘कट’, ‘कॉपी’ आणि ‘पेस्ट’ च्या संशोधकाबद्दल तुम्हाला हे माहीत आहे का?

जगात अशी बरीच माणसं असतात ज्यांचं नाव आपल्याला माहित नसतं, पण त्यांनी बनवलेल्या गोष्टी आपण रोजच वापरत असतो. लॅरी टेस्लर हे अशाच व्यक्तींपैकी एक. लॅरी टेस्लर यांनी तयार केलेली एक गोष्ट आपण दिवसातून निदान एकदा तरी वापरतोच वापरतो. आम्ही ‘कट’, ‘कॉपी’ आणि ‘पेस्ट’ बद्दल बोलत आहोत.

मंडळी, लॅरी टेस्लर यांनीच जगाला ‘कट’, ‘कॉपी’ आणि ‘पेस्ट’ ही कमांड दिली. त्यांनी केलेल्या कामाबद्दल जाणून घेऊया.

लॅरी टेस्लर हा महान अवलिया होता असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. त्यांनी आपल्या हयातीत ॲपल, याहू, अमेझॉन आणि आपल्या भारतीयांची आवडती कंपनी ‘झेरॉक्स’ यांसारख्या अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये काम केलं आणि जिथं जातील तिथं त्यांनी आपल्या कामाचं वेगळेपण दाखवून दिलं. 

तसं पाहता लॅरी टेस्लर यांचा जन्म १९४५ साली झाला. त्यांनी स्टॅनफर्ड विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं. त्यांची पहिली नोकरी ही ‘झेरॉक्स’ कंपनीत केली. झेरॉक्समध्ये ते संशोधक म्हणून काम करत होते. याच दरम्यान त्यांना ‘कट’, ‘कॉपी’ आणि ‘पेस्ट’ची कल्पना सुचली. याशिवाय त्यांनी  find & replaceचा पर्याय शोधून काढला. आज काँप्युटरवर काम करताना या सगळ्या गोष्टी न वापरता काही काम करायचं म्हटलं तर किती वेळ लागेल सांगा!!

झेरॉक्समध्ये असताना त्यांनी आणखी क महत्त्वाचं काम केलं. प्रिंट काढताना आपण वापरतो ती page layout system लॅरी टेस्लर यांनीच शोधून काढली. त्यांचा आणखी एक महत्त्वाचा शोध म्हणजे त्यांनी आजच्या लॅपटॉपचा खापरपणजोबा असलेल्या पहिल्या ‘luggable computer’ चं सॉफ्टवेअर त्यांनीच डिझाईन केलं होतं.

 ते फक्त झेरॉक्स कंपनीपुरते मर्यादित राहिले नाहीत.  पुढे ॲपल कंपनीत काम करताना त्यांनी ॲपलच्या नवीन उत्पादनात योगदान दिलं. ॲपलचा पहिला पर्सनल काँप्युटर- ॲपल लिसा, मॅकिंटॉश कॉम्प्यूटर आणि ॲपलचाच पर्सनल डिव्हाईस असिस्टंट ‘न्यूटन’ या तिन्हींच्या उत्पादन प्रक्रियेत लॅरी टेस्लर यांचा मोठा हात होता.आजच्या मोबाईलसारखं दिसणारं ‘ॲपल न्यूटन’ सुरुवातीच्या काळात तुफान चाललं.  पण या डिव्हाईसची OS महाग असल्याने ॲपलला ‘न्यूटन’चं उत्पादन बंद करावं लागलं होतं.

तर, ॲपल नंतर लॅरी टेस्लर यांनी अमेझॉन आणि याहूसोबतही काम केलं. शिवाय त्यांनी स्वतःच्या मालकीची कंपनीही सुरु केली. त्यांच्या वेबसाईटवर त्यांनी जो रिझ्युमे शेअर केला आहे त्यात या सगळ्या कामांची मोठी यादी दिली आहे.

तर मंडळी, आपल्या हयातीत जगातल्या मातब्बर कंपनीत काम करून मोठं योगदान देणारी माणसं जगात दुर्मिळ आहेत. लॅरी टेस्लर हे त्या दुर्मिळ लोकांमधले सर्वात वरचे होते म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

सबस्क्राईब करा

* indicates required