क्रूर सिरियल किलर्स: वधूवेषातल्या २० तरूणींच्या मृत्यूस कारणीभूत असलेला सायनाईड मोहन!!

आजवरच्या सिरीयल किलर लोकांच्या गोष्टी वाचून एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल, अनेक वेळेस या लोकांना गुन्हेगारी पार्श्वभूमी नसते. पण यांची गुन्हेगारी कृत्ये मात्र एखाद्या सराईत गुन्हेगाराला सुद्धा जमणार नाहीत इतके नृशंस आणि थंड डोक्याने केलेली असतात. बहुतांश सिरीयल किलर्सचा प्रवास हा थोडाबहुत सारखाच असतो. 

एखाद्या सिनेमाला शोभावी अशीच कहाणी असते. म्हणूनच या लोकांवर अनेक सिनेमे येत असतात. नेटफ्लिक्सने तर एकामागून एक अशा सिरीज या लोकांवर तयार करण्यास सुरूवात केली आहे. आज आपण सायनाईड मोहन नावाच्या सिरीयल किलरची गोष्ट वाचणार आहोत. २००३ ते २००९ असे सहा वर्षे एकामागून एक खून करत त्याने अनेक निष्पाप लोकांचे प्राण घेतले होते. 

या सर्व प्रकाराची सुरुवात झाली ती 2003 साली. दक्षिण कर्नाटकातील एका शहरात महिला पब्लिक टॉयलेट बाहेर महिलांची रांग लागली होती. पण दरवाजा आतून बंद होता. आत कोण आहे, याबद्दल कुणाला काहीही खबर नव्हती. शेवटी पोलीस बोलविण्यात आले. आतील दृश्य बघून सर्व हादरले. त्यात एका महिलेचा मृतदेह होता. जवळपास ३० वर्षे वयाची महिला एखाद्या समारंभात जाण्यासाठी तयार झाली असेल असा तिचा अवतार होता. पण अंगावर एकही दागिना नव्हता. 

पोलिसांनी शोध घेण्याचा प्रयत्न तर केला. पण कुठूनही काही हाती लागत नव्हते. असेच काही दिवस गेले. त्याच शहरात दुसऱ्याच एका टॉयलेटमध्ये आणखी एक मृतदेह सापडला. दोन्ही मृत्यूंमध्ये बरेच साधर्म्य दिसून येत होते. वर्ष उलटत गेले. पण दर महिन्यांनी कुठल्या तरी एका टॉयलेटमध्ये मृतदेह सापडत होता. २००९ साल येता येता असे २० महिलांचे मृतदेह पोलिसांना सापडले. 

सगळ्या खुनात साम्य होते. ही खून झालेली प्रेते बसस्टँड नजिक एखाद्या टॉयलेटमध्ये सापडत. तसेच त्यांचे वय २५ ते ३० दरम्यान असे. त्यांच्या अंगावर चांगली साडी असे, पण दागिने नसत. पोलिसांना यातून या सर्व हत्यांमागील व्यक्ती एकच असेल याचा अंदाज आला होता. पण त्याला कसे शोधायचे हे मोठे आव्हान त्यांच्यासमोर होते. 

२००९ साली एक २२ वर्षीय मुलगी बेपत्ता झाली. या गोष्टीवरून समाजात अनेक अफवा पसरल्या आणि दोन समुदायांत तंग वातावरण तयार झाले. पोलिसांनी आता कसून चौकशी सुरू केली. बेपत्ता झालेल्या युवतीचे कॉल तपासण्यात आले. यात अजून एक मुलगी बेपत्ता झाल्याचे समजले. पोलिसांनी सर्व १९ मृत तरुणींची यादी तयार केली. त्यांच्या एकमेकांशी काही संबंध आहे का हे तपासण्यात आले. यावरून पोलिसांना एक सूत्र सापडले. या सर्व मुलींना कर्नाटकातील मंगलोर येथील एका गावातून कॉल गेले होते. सुरुवातीला पोलिसांना या गावातून एखादे रॅकेट चालवले जात असल्याचा अंदाज आला. 

पोलिसांचा तपास सुरूच असतो. तेवढ्यात एका बेपत्ता मुलीचा फोन खणाणतो. समोरून कोणीतरी हॅलो म्हणतो. समोरून बोलणाऱ्याला पकडण्यात येऊन त्याची चौकशी होते. त्यात समजते की या मुलाला त्याच्या काकाने हा फोन दिला आहे. त्याचा काका मोहन याला आता अटक करण्यात येते. पोलिसांना आपण ही केस सोडविण्याच्या अगदी नजिक पोहोचल्याचा अंदाज आलेला असल्याने मोहनची कसून चौकशी होते आणि मोहन जे काही सांगतो त्याने अवघा देश सुन्न होतो.

 

आनंद मोहन नावाचा हा व्यक्ती लग्न न झालेल्या तरुण मुली हेरून त्यांच्याशी मैत्री करायचा आणि नंतर त्यांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेऊन त्यांना पळून जाऊन लग्न करण्यासाठी राजी करायचा. यासाठी या तरुणींना तो चांगले दागिने आणि साडी घालून येण्याचे सांगायचा. पुढे दागिने लुटून खून करणे ही त्याची पद्धत होती. 

आनंद मोहन या मुलींना हासन जिल्ह्यातील एका बस स्टँडनजिक भेटून तिथेच त्यांना एखाद्या हॉटेलमध्ये घेऊन जात असे. सकाळी आपण मंदिरात लग्न करू असे सांगून त्यांच्यासोबत रात्री शारीरिक संबंध करून सकाळी लवकर एका कामानिमित्त जातोय सांगून निघून जात असे. सकाळी महिला सजून त्याने सांगितल्या ठिकाणी येत असे. तिथे आनंद त्यांना गर्भनिरोधक गोळ्यांच्या नावाखाली एक गोळी देत असे ज्यात सायनाइड असे. 

त्या मुलीला ते टॅबलेट खाण्यासाठी टॉयलेटला पाठवत असे. त्याआधी तिच्याकडील दागिने तो काढून घेत असे. टॉयलेटमध्ये गेल्यावर ती महिला सायनाईडमुळे मृत्युमुखी पडत असे आणि मोहन ते दागिने घेऊन दुसऱ्या तरुणीच्या मागे लागत असे. असा त्याचा खुनी प्रवास तब्बल ६ वर्षे सुरू होता. पुढे त्याला २०१३ साली या कृत्यांबद्दल फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. 

सायनाईड वापरल्यामुळे त्याचे नाव सायनाईड मोहन असे नाव पडले. सुरुवातीला एक साधारण प्राथमिक शिक्षक असलेला हा आनंद मोहन नावाचा हा व्यक्ती इतका नृशंस खुनी होईल असा विचार कुणीही केला नव्हता. 

सबस्क्राईब करा

* indicates required