computer

एलिझाबेथ होम्सचा एकेकाळची सिलिकॉन व्हॅली स्टार ते फसवणूकीच्या गुन्ह्यात दोषी हा प्रवास!!

श्रीमंत होण्याची स्वप्नं सर्वांनाच पडतात. काहीजण हे स्वप्नं सत्यात उतरवण्यात यशस्वी होतात, पण प्रत्येकाचे स्वप्न दीर्घकाळ टिकेलच असे नाही. यशस्वी होणे आणि ते यश टिकवून ठेवणे ही एक तारेवरची कसरत असते. ही कसरत सर्वांनाच जमेल असे नाही. ३० व्या वर्षी फोर्ब्जच्या श्रीमंत महिलांच्या यादीत स्थान मिळवणाऱ्या एलिझाबेथ होम्सची ही कथा हेच सांगते.

लहानपणापासूनच श्रीमंत होण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या एलिझाबेथ होम्सने कमी वयात आपले हे स्वप्न साकार केले. स्टँनफर्ड विद्यापीठात प्रवेश घेतल्यापासूनच आपले हे स्वप्न साकार करण्यासाठी ती धडपडू लागली. १९ व्या वर्षीच तिने आपले एक नवे संशोधन जगासमोर मांडले. या संशोधनाद्वारे तिने असा दावा केला होता की रक्त चाचणी करण्यासाठी सिरींज भरून रक्त काढण्याची काही गरज नाही. अवघ्या काही थेंबांची चाचणी करूनही आपण रक्त तपासणी करू शकतो आणि यासाठी एक नवी मशीन तिने बनवली होती. फक्त काही थेंबांची चाचणी केल्यानंतर रुग्णाच्या रक्ताविषयी सगळी माहिती एकाच दमात मिळणे ही आरोग्य क्षेत्रातील एक मोठी क्रांतीच होती. तिच्या या कल्पनेची भुरळ अनेकांना पडली. ही कल्पना अगदी सामान्य रुग्णापासून ते मोठमोठ्या दवाखान्यापर्यंत सगळ्यांच्याच सोयीची आणि फायद्याची होती.
रक्तातील साखरेपासून ते कॅन्सरच्या निदनापर्यंत अनेक आजारांमध्ये रक्तचाचणी ही एक अनिवार्य बाब आहे. यासाठी लागणारी यंत्रणा आणि वेळ या सगळ्यांचीच बचत होत असेल तर ते सर्वांनाच हवे होते. अशा या आगळ्यावेगळ्या कल्पनेसह आरोग्य क्षेत्रात काम करण्यास उतरलेल्या एलिझाबेथ होम्सने मोठमोठ्या गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यात यश मिळवले.

वयाच्या तिसाव्या वर्षी तिने थेरॉंस नावाची स्वतःची कंपनी सुरू केली. अवघ्या एका वर्षात कंपनीला अब्जावधी रुपयांचा नफा झाला. यासोबतच एलिझाबेथ होम्स सिलिकॉन व्हॅलीतील यशस्वी चेहरा म्हणून पुढे आली. फोर्ब्ज आणि टाइम्ससारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रथितयश मॅगझीन्सच्या मुखपृष्ठावर तिचे फोटो प्रसिद्ध होऊ लागले. पोलोनेक-कॉलरचा काळा टी-शर्ट घालून झळकणाऱ्या एलिझाबेथचे फोटो पाहून स्टीव्ह जॉब्जची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. प्रत्यक्षात एलिझाबेथकडे स्टीव्हपेक्षाही अधिक दूरदृष्टी असल्याचा अनेकांनी दावा केला.

ज्या वेगाने एलिझाबेथने हे साध्य केले त्याच वेगाने ती वादाच्या भोवऱ्यात अडकली गेली. अधिकाधिक गुंतवणूकदरांना आकर्षित करण्याच्या नादात तिने काही चुका केल्या ज्या तिला आता चांगल्याच भोवल्या आहेत.

तिची पहिली चूक म्हणजे थेरॉन्सच्या छापील रिपोर्ट्सवर तिने फायझर आणि शेरिंग-प्लफसारख्या औषधनिर्माण क्षेत्रातील बड्या कंपन्यांचे लोगो छापले, तेही त्यांच्या परवानगीशिवाय. यातून थेरॉन्सविषयीची विश्वासार्हता दृढ करणे हा जरी तिचा हेतू असला तरी तिची पद्धत चुकीची होती. न विचारता लोगो वापरल्याच्या कारणावरून या दोन्ही कंपन्यांनी तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला.
तिची दुसरी चूक म्हणजे तिने बनवलेल्या मशीन्स तिच्या दाव्यांची पूर्तता करत नव्हत्या. त्यातील त्रुटी भरून काढण्याऐवजी तिने या त्रुटी जगापासून लपवून ठेवून आहे त्याच पद्धतीने काम सुरू ठेवले. यामुळे दवाखाने, डॉक्टर आणि रुग्ण अशा सर्वांचीच मोठी फसवणूक झाली.

याच दोन चुकांमुळे तिच्यावर कोर्टात जाण्याची वेळ आणि आज ती कोर्टासमोर दोषी ठरली आहे. खरे तर केलेल्या दाव्यांची पूर्तता न होणे, ग्राहकांची फसवणूक केली जाणे, अशा गुन्ह्यांत सिलिकॉन व्हॅलीतील अनेक मोठमोठे उद्योगपती अडकलेले आहेत. पण या एकटी एलिझाबेथ होम्सच न्यायालयाच्या चौकशीत दोषी सापडली. खरे तर या यादीत अनेक मोठमोठी नावे येतात, पण त्यांची चौकशी सोडा.. त्याचा गवगवादेखील होत नाही.

एका स्त्रीने अल्पावधीत कमवलेले हे यश अनेकांना खटकल्यामुळे तिच्यावर ही नामुष्कीची वेळ आली असाही कयास बांधला जात आहे. अर्थात फक्त स्त्री आहे म्हणून तिच्या चुका दुर्लक्षित करणे कितपत योग्य आहे. पण एलिझाबेथप्रमाणेच खोटेनाटे दावे करून पैसा उभा करणाऱ्या पुरुष उद्योगपतींच्या बाबतीत मात्र इतक्या तत्परतेने कारवाई होताना दिसत नाही. याचा अर्थ उद्योग जगत आणि सिलिकॉन व्हॅलीदेखील लिंगभेदाच्या सदोष दृष्टीने ग्रस्त आहे असा घ्यावा का?

एलिझाबेथप्रमाणेच ज्या-ज्या इतर उद्योगपतींनी अशी खोटीनाटी आश्वासने देऊन आणि मोठी स्वप्ने दाखवून सामन्यांची जी लुबाडणूक आणि फसवणूक केली आहे, त्या सर्वांचीच अशी तत्परतेने चौकशी होणे गरजेचे आहे.

गुंतवणूकदारांसाठी देखील एलिझाबेथ होम्सची ही कथा एक मोठा धडा ठरणार आहे, यात शंका नाही. नवनव्या कल्पनांना डोक्यावर घेण्याआधी त्यातील तथ्य पडताळून पाहण्याची आवश्यकता आता तरी या गुंतवणूकदारांना कळली असेल. एलिझाबेथच्या या अक्षम्य गुन्ह्यांसाठी तिच्यावर फसवणूक, लबाडीसह गुन्हेगारी कलमे लावून त्या अंतर्गत तिला दोषी करार देण्यात आला आहे.

आपल्या हव्यासापोटी एलिझाबेथने अनेकांच्या आरोग्याशी खेळण्याचा गुन्हा केला आहे. तिला तर धडा मिळालाच, पण अशाप्रकारे सामान्य लोकांच्या मजबुरीचा फायदा घेत त्याचा असा धंदा मांडणाऱ्या वृत्तीला यातून एक चपराक बसली असेल अशी आशा बाळगायला हरकत नाही.

मेघश्री श्रेष्ठी

सबस्क्राईब करा

* indicates required