९ जुलैला रविवारी पुण्यात लहान मुलांसाठी नदीकाठच्या गोष्टी- दत्तक घेऊया नदीकिनारा

नदी हा केवळ पाणी वाहून नेणारा प्रवाह नसतो , तर ती एका संस्कृतीला जन्म देते. प्राचीनकाळी पाणवठ्याच्या आसपास लोक वसले आणि   भारतीय संस्कृतीपासून इजिप्शियन संस्कृतींपर्यंत कितीतरी संस्कृती पाणीसाठ्याभोवती निर्माण झाल्या,  वाढल्या नि भरभराटीस आल्या.  नदी किंवा गावातला पाणवठा हा केवळ एक पाणी मिळण्याची जागा नसते, तर ते एक सांस्कृतिक केंद्र असते.  तिथं कपडे धुवायला येणाऱ्या बायकांकडून सुखदुःख वाटली जातात, लहान मुलं पाण्यात यथेच्छ खेळतात,  कोणी मासे मारत असतं, तर कोणासाठी नदी आध्यात्मिक/धार्मिक मार्गातील महत्त्वाचा घटक असते.  

आताच्या काळात मात्र महानगरांमध्ये नदी असून नसल्यासारखी होत चाललीय.  तिचा प्रवाह प्रदूषित आहे - इतका की अनेकदा त्या नदीला नाला म्हटलं जातं. खरंतर हा त्या मूळ नदीचा अपमान आहे.   

अशावेळी 'जिवीतनदी' नावाच्या गटाकडून पुण्यातील मुठा नदीला पुन्हा 'माणसात' आणण्याचे काम मोठ्या अनोख्या पद्धतीने होणार आहे.  या गटाचा पहिलावहिला प्रोजेक्ट  "दत्तक घेऊया नदीकिनारा"  'विठ्ठलवाडी' इथं मुठा नदीवर सुरू आहे. गेले ७ रविवार, नागरिक नेमानं तिथं येऊन काम करत आहेत.

आयोजक गटाच्या फेसबुक पानावर म्हटल्यानुसार आता यातील पुढील टप्पा म्हणून ९ जुलै ला सकाळी ६:३० ते ८:३० खास मुलांसाठी कार्यक्रम आयोजित केला आहे.  ज्या मुलांचं वय पाच वर्षांपेक्षा जास्त आहे, अशा मुलांना या कार्यक्रमात भाग घेता येणार आहे. यावेळी पक्षीतज्ज्ञ व वन्यजीव अभ्यासक धर्मराज पाटील नदीकाठच्या पक्ष्यांची ओळख करून देतील व नंतर The StoryStation तर्फे वैशाली कुलकर्णी मुलांना गोष्टी सांगतील.

नदी भोवती थांबणं,  भोवतालचे पक्षी विश्व अनुभवणं,  आपण ज्या परिसरात राहतो त्या परिसरातील,  शहरातील लोकांमध्ये सामायिक असणाऱ्या नदीसाठी थोडा वेळ काढणं या मुलांना नक्कीच काही तर देऊन जाईल

चला तर!  आपापल्या मुला-मुलींना नदीकाठावर घेऊन जाऊयात, शहराचे नदीशी तुटलेले नाते परत जोडूयात!

 

सबस्क्राईब करा

* indicates required