computer

धनराज महल - वाचा नागा महंतांच्या सावकारीच्या पैशांवर बांधलेल्या या किंमती वास्तूमागची खरी कहाणी...

घड्याळाचं भूत मानगुटीवर बसवून घेतेलेले  मुंबईकर आजूबाजूला न बघताच रोज अनेक ऐतिहासिक वास्तुंसमोरून येतजात असतात. कधीकधी बराच वेळ हाताशी असताना रमतगमत निघाल्यावर एखादी जुनी वास्तू खुणावते आणि मग थोडी शोधाशोध केली तर त्या वास्तूबद्दल अनेक मनोरंजक किस्से आणि कहाण्या उलगडून समोर येतात. अशीच एक वास्तू आहे ‘धनराज महल’! 

गेट वे ऑफ इंडिया बघायला गेल्यानंतर आपण एका टोकाला असलेला गेट वे ऑफ इंडिया आणि दुसऱ्या टोकाला असलेलं ताजमहाल हॉटेल इतकंच बघतो, पण तिसरं टोक आपण फारसं बघतही नाही. हे तिसरं टोक म्हणजेच ‘धनराज महल’. 

या महालाशी खूप लोक जोडले गेले आहेत. म्हणजे पाहा, आधी तर हा महाल बांधला गेला होता एकेकाळच्या सुप्रसिद्ध अभिनेत्री झुबेदा बेगम यांच्यासाठी. या झुबेदा बेगमने ‘आलम आरा’ या भारतातल्या पहिल्या बोलपटात काम केलं होतं. या झुबेदाने हैद्राबादच्या राजा धनराजगीर यांच्यासोबत लग्न केलं होतं. या दोघांना दोन मुलं झाली-   हुमायून धनराजगीर  आणि दुर्रेश्वर धनराजगीर. पैकी हुमायून धनराजगीर यांनी औषधनिर्मिती क्षेत्रात बरंच नांव कमावलं आणि त्यांनी  ग्लॅक्सो-कॅलिडासारख्या  जगप्रसिद्ध औषधनिर्मिती कंपन्यांचे अध्यक्षपद त्यांनी संचालकपद भूषवलं होतं. मुलगी दुर्रेश्वरनं स्वत: काही विशेष केलं नसलं तरी संजय दत्तची पहिली बायको रिया पिल्लई या दुर्रेश्वरची मुलगी होती.  हे हुमायून आणि दुर्रेश्वर- रिया पिल्लई या धनराजगीर महालात राहिलेच, पण त्यांच्या पुढच्या पिढ्या म्हणजे सध्याचा आरोहण-तेरह पन्ने सारख्या मालिकांतून पुढे आलेला अभिनेता-निर्माता तरुण धनराजगीर आणि १९७८ साली ‘मिस इंडिया’ किताब पटकावलेली सबिता धनराजगीर-उमरीगर हे दोघेदेखील या वास्तूशी जोडले गेले आहेत. पण हे सगळं सोडा.. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही इमारत दशनामी नागा साधूंच्या वैभवशाली आणि समृद्ध इतिहासाचं प्रतीक आहे हे तुम्हाला माहिती आहे का? कसं ते वाचा.

(झुबेदा बेगम)

नागा साधूंचे दहा प्रकार आहेत. त्यातल्या काही नागा साधूंना गोस्वामी किंवा गोसांइही म्हटलं जात असे. कालांतराने हे त्यांचे संप्रदाय विस्तारत गेले आणि त्यांचे  ‘मठ’ बनले.  या मठाच्या अधिपतींना ‘महंत’ म्हटलं जात असे. आधीतर या महंतांनी मठांच्या संरक्षणासाठी शस्त्रधारी तुकड्या उभ्या केल्या. हळूहळू हे इतके बलाढ्य झाले की ते   साधू-सैनिकांच्या तुकड्या चक्क वेगवेगळ्या राजांना भाड्याने देऊ लागले. अठराव्या शतकात या गोस्वामी साधूंकडे इतके पैसे होते की ते सावकारी करायला लागले. त्यांचे क्लायंटपण अगदी मोठे लोक असत.  पहिल्या बाजीराव वारला तेव्हा सन १७४० साली बाजीरावांनी या गोस्वामी महंतांकडून फार मोठी रक्कम कर्जाऊ घेतेलेली दिसते, म्हणजे बघा!! 

या गोस्वामी सावकारांमध्ये हैदराबादचे गोस्वामी  सर्वात श्रीमंत आणि बलाढ्य होते. त्यातही  राजा नरसिंगगीर आणि त्यांचे वारसदार धनराजगीर यांचा  मठ सगळ्यात समर्थ मठ होता.  हा गीर परिवार इतका श्रीमंत आणि इतका बलाढ्य होता की त्यांना ‘दख्खनचे रॉथ्सचाइल्ड’ म्हणून ओळखले जात असे. ‘रॉथ्सचाइल्ड’ हे नाव युरोपियन बँकिंगवर अंकुश ठेवणाऱ्या सुपरिचित सावकार घराण्यावरून आले होते.  या नरसिंगगीर यांनी   निजामाला हैदराबादेत रेल्वेचे जाळे निर्माण करण्यासाठी  आर्थिक साहाय्य केलं होतं. तशा त्यांनी त्यांनी निजामशाहीतल्या अनेक सरदारांना मोठमोठ्या कर्जाऊ रकमा दिल्या होत्या आणि या अपार संपत्तीच्या संरक्षणासाठी अरब सैनिकांची तुकडी ही बाळगली होती.  त्यांच्या या भरघोस आर्थिक सहाय्यामुळे निजामाने त्यांना ‘राजा’ हा किताब दिला होता. त्यानंतर असाही एक काळ आला होता जेव्हा निजामाने त्याच्या राज्याचा एक भाग म्हणजे  वऱ्हाड प्रांत या गोस्वामी राजांकडे गहाण ठेवला होता.  

राजा नरसिंगगीर यांचे वारसदार धनराजगीर यांनी काळाची पाऊले अचूक ओळखली आणि सावकारीसोबतच औद्योगिक क्षेत्रांतही पाऊल ठेवलं. त्यांनी मुंबई आणि सोलापूर इथे कापडगिरणी उभारली. त्यापुढे जाऊन भविष्याचा वेध घेत भारतातील पहिली ब्रॉडकास्टिंग कंपनी स्थापन केली होती.  राजा धनराजगीर यांनी मुंबईतल्या अपोलो बंदरावर गेट वे ऑफ इंडिया जवळ ‘धनराज महल’ नावाची एक भव्य वास्तू उभारली. ही वास्तू त्याकाळात शहरातली सर्वात महाग निवासी वसाहत होती.   १९३० मध्ये राजा धनराजगीर यांनी झुबेदा यांच्याशी विवाह केला होता. या आंतरधर्मीय विवाहाला गीर परिवाराचा विरोध होता म्हणून धनराजगीर यांनी झुबेदाला धनराज महलच्या सर्वात वरच्या मजल्यावर १५,००० चौरस फुटांचे पेंटहाऊस बांधून दिले.

‘ग्यानबाग पॅलेस’

तेव्हासुद्धा प्रचंड किंमत असलेली ही धनराज महलची वास्तू मुळात बांधली गेली होती ती नागा साधूंच्या सावकारीच्या पैशांतून. साधू निर्लेप असावेत, त्यांना ऐहिक सुख-संपत्तीचा लोभ असू नये असं मानणाऱ्या भारतीय वातावरणात या नागा साधूंनी मोठमोठे महाल बांधले, काहींच्या भिंतीत आणि तळघरात अतोनात पैसा दडवून ठेवला. सध्या धनराज महाल वारसांच्या आंपसातल्या खटल्यांमुळे विभागला गेलाय. आजही ब्रिटिश काळातल्या मोटारगाड्या धनराज महालमध्ये उभ्या आहेत. धनराजगीर यांचा हैद्राबाद येथील महाल ‘ग्यानबाग पॅलेस’ अशाच कोर्ट कचेरीत अडकला आहे. 

तर ही कथा आहे धनराज महालची!! सर्वस्व त्यागणारे साधू संसाराच्या रहाटगाडग्यात कसे गुंतून जातात याचं हे उदाहरण.

सबस्क्राईब करा

* indicates required