computer

आता एकाच अधिकृत ॲप मध्ये राहणार आधारकर्ड, पॅॅनकार्ड ते ड्राईव्हिंग लायसन्स पर्यंतची सगळी कागदपत्रे !!

समजा तुम्ही रेल्वेने प्रवास करताय आणि तिकीट चेकरने तुमच्याकडे आधार कार्ड मागितले. तुमचे पाकीट घरी विसरले असेल तर? अश्या वेळी काय कराल?  रस्त्याने वाहन चालवताना ट्रॅफिक पोलिसांनी तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स मागितले आणि तुम्ही ते घरीच ठेवले असेल तर?

मंडळी, अश्या वेळी एक तर दंड भरावा लागतो किंवा संबंधित अधिकाऱ्यांच्या हातापाया पडावे लागते. पण आता असे करण्याची गरज अजिबात नाही…  यावर आम्ही तुम्हाला सांगू एक उपाय… डिजीलॉकर!

डिजीलॉकर (DigiLocker) हे एक मोबाईल ॲप्लिकेशन आहे जे तुमची सर्व महत्वाची कागदपत्रे मोबाइल मध्ये डिजिटल स्वरूपात सुरक्षित सांभाळून ठेवते. हे ॲप ‘डिजिटल इंडिया’ अंतर्गत खुद्द भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (MeitY) यांनी बनवले आहे. त्यामुळे तुमची माहिती चोरीला जाण्याचा अजिबात धोका नाही बरं का. तुम्ही अगदी निश्चिंतपणे याचा वापर करू शकता. 

जाणून घेऊया डिजीलॉकर नेमके काय आहे?

भारत सरकारने जेव्हा पेपरलेस यंत्रणा राबविण्याचा विचार केला तेव्हा या ॲपची संकल्पना समोर आली. 23 डिसेंबर 2015 रोजी लाँच झालेले हे ॲप अजूनही बऱ्याच जणांना माहीत नाही. सरकार तर्फे मिळालेली वेगवेगळी ओळखपत्रे, सर्टिफिकेट्स, महत्वाची कागदपत्रे इत्यादी डिजिटल स्वरूपात तुमच्या मोबाईल अथवा लॅपटॉप मध्ये एकाच ठिकाणी या ॲपमध्ये जतन करता येतात. आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, व्हेईकल रजीस्ट्रेशन, सनद आणि वेळोवेळी मिळालेली सर्टिफिकेट इत्यादी कागदपत्रे त्या त्या डिपार्टमेंट तर्फे या ॲप मध्ये सिंक्रोनाईज केली जाऊ शकतात. या ॲपला सरकारी मान्यता असल्याने गरज असेल तेव्हा तुमची कागदपत्रे तुम्ही डिजिटल स्वरूपात सादर करू शकता. डिजीलॉकर अँड्रॉइड, आयोएस आणि वेब वर उपलब्ध आहे. सरकारी वेबसाईटच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत 17 मिलियन लोकांनी डिजीलॉकर वर रजीस्ट्रेशन केले आहे. आता तर रेल्वे सुद्धा या प्रकारे सादर केलेली सॉफ्ट कॉपी स्वीकारत आहे. त्यामुळे प्रवासात कागदपत्रे बाळगण्याची आणि ती गहाळ होण्याची अथवा चोरीला जाण्याची भीती उरली नाही. 

पाहूया डिजीलॉकरचा वापर कसा करायचा…

तुम्हाला प्ले स्टोअर वरून हे ॲप डाउनलोड करून घ्यावे लागेल. एकदा ॲप डाउनलोड झाले की सुरुवातीला त्यावर रजीस्ट्रेशन करावे लागते. तुमचा मोबाईल नंबर किंवा इमेल हा युजर आयडी म्हणून वापरता येतो. त्यानंतर एक पासवर्ड सेट करावा लागतो जो तुमचा हा सर्व डेटा सुरक्षित ठेवेल. अधिक सुरक्षेसाठी म्हणून आणखी एक चार अंकी पिन वापरण्याचा सुद्धा पर्याय यात आहे. आता तुम्ही डिजीलॉकर वापरण्यास सज्ज झाला आहात. आता तुम्हाला तुमची कागदपत्रे डिजीलॉकर मध्ये घेता येऊ शकतात. प्रत्येक डॉक्युमेंट साठी पर्याय दिलेले आहेत त्यावर क्लिक करून संबंधित डिपार्टमेंट कडून तुमची माहिती ॲप वर सेव्ह होते. यात तुम्ही स्वतः वेगवेगळे फोल्डर तयार करून तुमच्या सोयीनुसार कागदपत्रे त्यात ठेऊ शकता. वापरण्यास अत्यंत सोपे असलेले हे ॲप फारच उपयुक्त ठरते. 

काही ठिकाणी याचा स्वीकार केला जात नाही असे आढळून आले आहे. दिल्ली ट्रॅफिक पोलीस आणि एअरपोर्ट अधिकाऱ्यांनी डिजीलॉकर नाकारल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यावर स्पष्टीकरण देताना डिजीलॉकरचे अधिकारी म्हणतात की, आम्ही सर्व अधिकाऱ्यांच्या मिटिंग आणि वर्कशॉप घेऊन त्यांना असे न करण्याबाबत सूचना देत आहोत. लवकरच सर्व ठिकाणी डिजीलॉकर अधिकृत मानले जाईल. 

आता या ॲप मध्ये आणखी नवनवीन सुधारणा होत आहेत. याच्या निर्मात्याच्या सांगण्यानुसार लवकरच डिजिलॉकर मध्ये फीडबॅक सुविधा देण्याचा विचार सुरू असल्याचे समजते. 

तर मंडळी, कशी वाटली ही माहिती? तुम्हीही आता असंख्य कागदपत्रे बाळगणे टाळून डिजीलॉकर वापरायला सुरुवात करणार ना? आम्हाला कमेंट्स मध्ये जरूर कळवा आणि सर्वांनाच ही माहिती समजावी म्हणून पोस्ट जास्तीत जास्त शेअर करा.

सबस्क्राईब करा

* indicates required